क्रायोलाइट : (ग्रीनलंड स्पार आइस स्टोन). खनिज. स्फटिक एकनताक्ष प्रचिनाकार. स्फटिक क्वचित व छद्मघनाकार रूपात आढळतात. जवळजवळ काटकोनात असलेल्या विभाजनतलांमुळे स्फटिक छद्मघनीय दिसतात [→ स्फटिकविज्ञान]. हे नेहमी संपुंजित रूपात आढळते. कठिनता २·५. वि. गु. २·९५-३. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी ते ग्रीजासारखी. रंगहीन, कधीकधी पांढरे, क्वचित उदसर, लालसर किंवा काळसरही. क्रायोलाइटाचा प्रणमनांक (वक्रीभवनांक, १.३३८) जवळजवळ पाण्याइतकाच असल्याने त्याचा चुरा पाण्यात टाकल्यास दिसत नाही. रा. सं. Na3AlF6. याच्याबरोबर सिडेराइट, स्फॅलेराइट, गॅलेना इ. खनिजे असतात. मुख्यतः ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील ईव्हिगतूत या ठिकाणी ग्रॅनाइटातील एका मोठ्या शिरेमध्ये हे आढळते. हे स्पेन व कोलोरॅडोतही थोडसे सापडते. पूर्वी हे ॲल्युमिनियम मिळविण्यासाठी वापरीत. हल्ली सोडियम लवणे, विशिष्ट काच व पोर्सलीन, कीटकनाशके इ. बनविण्यासाठी व अभिवाह (घन पदार्थ लवकर वितळविण्यासाठी त्यात मिसळण्यात येणारा पदार्थ) म्हणून क्रायोलाइट वापरतात. बर्फाप्रमाणे दिसत असल्यामुळे गोठलेले दव व दगड या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून क्रायोलाइट हे नाव पडले.
ठाकूर, अ. ना.
“