क्रॅस्नोदार : कॉकेशसच्या उत्तरेकडील क्रॅस्नोदार क्राय या रशियातील एका विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५,०५,००० (१९७३). हे रॉस्टॉव्हच्या दक्षिणेस २१३ किमी. कूबान नदीकाठी आहे. कूबान खोरे शेती उत्पादनाकरिता प्रसिद्ध असून क्रॅस्नोदार परिसरात कोळसा व तेल खाणी आहेत, म्हणूनच हे कॉकेशस विभागातील महत्त्वाचे औद्योगकि व सांस्कृतिक केंद्र बनले आहे. येथे खनिज तेलशुद्धी, कृषी अवजारे, यंत्रे व त्यांचे सुटे भाग, पोलाद, कातडी, मांस, आटा, लोणी वगैरे महत्त्वाचे उद्योग आहे. येथे मृदा, वैद्यक, कृषी आणि अन्नोद्योग यांची शिक्षणकेंद्रे तसेच कृषी व खनिज तेल इत्यादींवर संशोधनकेंद्रे आहेत. शहरात अनेक चित्रपटगृहे व संग्रहालये आहेत.

लिमये, दि. ह.