क्राइस्टचर्च : न्यूझीलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आणि कँटरबरी प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,१३,२१० (१९७३). न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील बँक्स द्वीकल्पावर हे १८५० च्या सुमारास वसले. चौकोनाचौकानात रेखीवपणे वसलेली ही उद्याननगरी शिक्षण, दळणवळण आणि उद्योगांचे केंद्र समजली जाते. शहराला मध्यवर्ती ७२ मी. उंचीचा गॉथिक शैलीतील कॅथीड्रल असून ११ किमी. आग्नेयीस लिटलटन हे गजबजलेले बंदर व १० किमी. वायव्येस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कँटरबरी विद्यापीठ (स्था. १८७३) व ख्रिस्त महाविद्यालय यांच्या इमारती अतिशय सुरेख असून अनेक नामवंत शिक्षणसंस्था, कलावीथी आणि संग्रहालये येथे आहेत. कृषिसंपन्न मैदानी पृष्ठप्रदेश, आर्टेसियन विहिरींतून मुबलक पाणी पुरवठा, स्वस्त जलविद्युत् व अद्ययावत दळणवळणाच्या सोयी यांमुळे येथे २,२०० वर कारखाने उभे राहिले असून न्यूझीलंडमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक शहर समजले जाते.
शाह, र. रू.