कोरोमंडलचे क्रिटेशस थर : क्रिटेशस कल्पाच्या मध्याच्या सुमारास (सु. १२ कोटी वर्षांपूर्वी) पृथ्वीवरील सर्व खंडांच्या किनाऱ्यांवर सागराचे अतिक्रमण झाले होते व किनाऱ्यांलगतच्या सखल जमिनींवर समुद्राचे पाणी पसरले होते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनाऱ्यांवरही त्या काळी समुद्राचे आक्रमण झाले होते. त्यांपैकी भारताच्या कोरोमंडल किनाऱ्यावर झालेल्या सागरी आक्रमणाची माहिती येथे दिलेली आहे. त्या आक्रमणाच्या काळी भारताच्या आग्नेय किनाऱ्यालगतचा बराचसा प्रदेश समुद्राच्या पाण्याखाली होता. त्या समुद्राचे पाणी टिकून होते तोपर्यंत त्याच्या तळावर वाळू, चिखल इत्यादींचे थर साचत होते. नंतर समुद्राचे पाणी ओसरून गेले व किनाऱ्यालगतच्या भागाची फिरून जमीन झाली. समुद्राचे पाणी ओसरून गेल्यावर त्याच्या तळावर जे गाळांचे थर साचले होते ते तसेच राहिले. समुद्र ओसरून गेल्याने जी जमीन उघडी पडली तिच्यात सागरी आक्रमणाच्या वेळी तयार झालेले थर पहावयास मिळतात.
सागरी आक्रमणाच्या काळी तयार झालेल्या खडकांचे अवशिष्ट भाग पाँडिचेरीपासून तो तंजावर यांच्यामध्ये असलेल्या किनाऱ्यालगतच्या भागात आढळतात. त्या खडकांच्या पृष्ठावर अनेक जागी आधुनिक जलोढ (पाण्याने वाहून आणलेले गाळ) साचले आहेत. त्यामुळे त्यांचा सलग पट्टा न दिसता ते तुटक तुटक आढळतात. त्यांच्यापैकी सर्वांत विस्तृत क्षेत्र असणारे खडक म्हणजे त्रिचनापल्ली जिल्ह्याच्या ईशान्येस असणारे खडक होत. त्यांचे क्षेत्र सु. ५०० ते ७५० चौ. किमी. भरते. या दृश्यांशाच्या ईशान्येस या खडकांनी व्यापिलेली आणखी दोन लहानशी क्षेत्रे आहेत.
पूर्वीच्या काळातील सागरी प्राण्यांचे उत्कृष्ट स्थितीत राहिलेले जीवाश्म (अवशेष) या खडकांत आढळत असल्याने पुराप्राणिविज्ञानाच्या (प्राण्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) एक हजाराहून अधिक जातींचे जीवाश्म या खडकांत आढळलेले आहेत. मॉलस्कांपैकी नॉटिलसाच्या २२, बेलम्नाइटाच्या ३, सामान्य ॲमोनाइटाच्या ९३, उलगडलेले कवच असणाऱ्या ॲमोनाइटाच्या ३०, शंखाच्या व शिंपाच्या प्रत्येकी २४० पेक्षा अधिक जातींचे जीवाश्म या खडकांत सापडलेले आहेत. प्राण्यांच्या इतर गटांतल्या जीवाश्मी जातींच्या संख्या अशा आहेत : प्रवाळ ६०, एकिनॉइडे ४२, पॉलिझोआ २५, ब्रॅकिओपोडा २०, मत्स्य व काही सरीसृप (सरपटणारे प्राणी) यांचेही थोडे जीवाश्म आढळलेले आहेत. इतक्या विविध प्रकारचे आणि चांगले जीवाश्म या खडकांत आढळत असल्यामुळे हे खडक असलेल्या क्षेत्राला टी. एच्. हॉलंड यांनी ‘पुराप्राणिविज्ञानाचे संग्रहालय’ असे म्हटलेले आहे.
या क्षेत्रात आढळणाऱ्या क्रिटेशस खडकांचे पुढील चार विभाग केलेले आहेत : (१) उतातूर, (२) त्रिचनापल्ली, (३) अरियालूरव (४) निनियूर. यांपैकी उतातूर हा सर्वांत जुना असून बाकीचे उत्तरोत्तर नवे आहेत. या चार विभागांपैकी निनियूर विभागात ॲमोनाइटांचे जीवाश्म आढळत नाहीत. त्याच्या खालच्या तीन विभागांत ते विपुल आढळतात.
या खडकांवरून क्रिटेशस काळातील भूगोल कळून घेण्यास फार मदत होते. त्रिचनापल्लीच्या क्षेत्रावर सागरी आक्रमण होऊन वरील खडक तयार झाले त्याच काळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही, नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या मुखाजवळील भागात सागरी आक्रमण झाले होते व त्या भागातही सागरी गाळांचे थर [→ बाघ थर] तयार झाले. पण त्या खडकांत आढळणारे जीवाश्म त्रिचनापल्लीजवळच्या थरात आढळणाऱ्या जीवाश्मांहून अगदी वेगळे आहेत. बाघ थर साचले त्यासमुद्रातले प्राणी त्रिचनापल्लीवर पसरलेल्या समुद्रातल्या प्राण्यांहून अर्थात अगदी भिन्न होते. म्हणजे पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील समुद्र त्या काळी एकमेकांस जोडले गेले नव्हते. त्रिचनापल्लीसारखेच जीवाश्म असणारे थर आसामात व त्या दोहोंसारखे जीवाश्म असणारे थर मॅलॅगॅसीत (मादागास्करात) व आफ्रिकेत आहेत. भारतापासून आफ्रिकेपर्यंत गेलेली एक जमीन त्या काळी असावी व ती मधे आल्यामुळे नर्मदेच्याखोऱ्यालगतचा समुद्र व द्वीपकल्पाच्या पूर्वकिनाऱ्याचा समुद्र अलग झाले असावेत.
पहा : खंडविप्लव गोंडवनभूमि पुराभूगोल .
केळकर, क. वा.
“