कोरेली, मारी : (? १८५५ – २१एप्रिल १९२४). इंग्रज कादंबरीकर्त्री. जन्म लंडनमध्ये. तिचे खरे नाव मेरी मकाय. आधी पियानोवादक. त्यानंतर कादंबरीलेखनास वाहून घेतले. अ रोमान्स ऑफ टू वर्ल्ड्स (१८८६), बरॅब्बस (१८९३), सॉरोज ऑफ सेटन (१८९५), द माय्टी ॲटम (१८९६), द मास्टर ख्रिश्चन (१९००), टेंपोरल पॉवर (१९०२), द यंग डायना (१९१७ )आणि द सिक्रेट पॉवर (१९२१) ह्या तिच्या काही कादंबऱ्या. आलंकारिक पण कृत्रिम भाषा, भडक वर्णने, संविधानकाची अतिनाट्यात्मक मांडणी, नैतिकता आणि धर्मभावनेचे भरपूर प्रदर्शन ह्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांमुळे व्हिक्टोरियन कालखंडाच्या उत्तरार्धातील मध्यमवर्गीयांच्या मनाची पकड ह्या कादंबऱ्यांनी घेतली व कोरेलीला त्या काळी अमाप कीर्ती मिळाली. बरॅब्बस व सॉरोज ऑफ सेटन ह्या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय ठरल्या. स्ट्रॅटफर्ड येथे ती निधन पावली.
बापट, गं. वि.