गरुड -२ : ॲक्सिपिट्रिडी पक्षिकुलातील मोठ्या पक्ष्यांना इंग्रजी भाषेत ‘ईगल’ म्हणतात. मराठी भाषेत गरुडाचे जे सामान्य वर्णन– मोठा आकार, उडण्याचा प्रचंड वेग, तीक्ष्ण आणि मजबूत चोच, मोठ्या अणकुचीदार नख्या, सर्पभक्षण आणि मोठाले प्राणीसुद्धा भक्ष्य म्हणून उचलून नेण्याची शक्ती इ.– पुष्कळ ठिकाणी दिलेले आढळते ते ईगल पक्ष्यांच्या वर्णनाशी जुळणारे असल्यामुळे ज्यांना पक्षिविज्ञानात ‘ईगल’ म्हणतात तेच गरुड पक्षी होत असे म्हणावयास हरकत नाही. गरुड या नावाने ओळखले जाणारे चारपाच पक्षी भारतात आहेत. यांपैकी सुप्रसिद्ध ‘सोनेरी गरुड’ हा एक आहे. याचे शास्त्रीय नाव ॲक्विला क्रायसॅईट्स आहे. हा आशिया, यूरोप आणि उत्तर अमेरिकेच्या पर्वतमय प्रदेशांत राहतो. या पक्ष्याच्या भारतात (हिमालयात) आढळणाऱ्या प्रजातीचे नाव ॲक्विला क्रायसॅईट्स हॉग्सनाय असे आहे. भारतात आढळणाऱ्या इतर काही गरुडांची नावे : पिंगट गरुड (ॲक्विला रॅपॅक्स) शिखाधारी गरुड (स्पायलॉर्निस चीला) मत्स्याहारी गरुड (हॅलिईट्स ल्युकोरिफस).
सोनेरी गरुड : हिमालयी सोनेरी गरुड यूरोपातील सोनेरी गरुडापेक्षा मोठा व काहीसा फिक्कट असतो. तो मध्य आशियात आणि हिमालयात (अफगाणिस्तानापासून आसामपर्यंत) राहतो. हिमरेखेपासून (ज्या उंचीच्या वरील भागात वर्षभर बर्फ असते अशा उंचीपासून) खाली सु. २,१२५ मी. पर्यंत तो आढळतो याच्या खाली (हिवाळ्यात देखील) तो क्वचितच दिसून येतो. हिमालयात जरी तो मोठ्या प्रमाणात नसला, तरी तो विरळा आहे असेही म्हणता येणार नाही.
हा फार मोठा व सामर्थ्यवान पक्षी असून त्याचा रंग दाट धुपेली (चॉकलेटी) तपकिरी असतो डोके व मान सोनेरी किंवा पिंगट तांबूस रंगाची मांड्या, शेपटीची खालची बाजू आणि पंखांच्या वरच्या कडा यांवर फिक्का तांबूस तपकिरी रंग पंख रुंद असून आकाशात वर उडताना पाठीच्या वर अशा तर्हेने धरलेले असतात की, त्यांची V अशी आकृती तयार होते. नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. हे पक्षी एकेकटे किंवा जोडीने राहतात.
चकोर, हिमकुक्कुट, मोनाल आणि महोका यांवर हे उपजीविका करतात. कधीकधी ससाण्याप्रमाणे हा भक्ष्याचा वेगाने पाठलाग करून त्याला पकडतो पण सामान्यत: उंचावरून हा आपल्या भयंकर वेगाने झेप घेऊन मागच्या बोटावरील तीक्ष्ण नखीने त्याच्यावर जोराने प्रहार करतो व त्याचे अंग फाडून काढतो. पुष्कळदा नर आणि मादी एकमेकांच्या मदतीने शिकार करतात. एक भक्ष्याला हुसकून जेरीस आणतो आणि दुसरा भक्ष्यावर झडप घालून त्याला गारद करतो. काही ठिकाणचे सोनेरी गरुड मुख्यत्वेकरून कावळ्यांवरच उदरनिर्वाह करतात. प्राय: हे पक्षी कोकरे, खोकड आणि कस्तुरी मृग व इतर मृगांची पिल्ले उचलून नेतात. कुजणाऱ्या प्रेताच्या मांसाला हे चुकूनही स्पर्श करीत नाही.
यांच्या प्रजोत्पादनाला मार्च किंवा एप्रिलपासून सुरुवात होते. घरटे खडकाच्या कड्यावर किंवा उंच झाडावर असते. ते फार मोठे, माचासारखे सपाट असून काटक्यांचे केलेले असते. मादी दोन पांढरी अंडी घालते, त्यांच्यावर तांबूस तपकिरी डाग असतात. सामान्यत: दोहोंपैकी एकच अंडे फुटून पिल्लू बाहेर पडते. पिल्लाचा रंग तकतकीत तपकिरी काळा असून त्याचे डोके आणि मान पिंगट रंगाची असते.
पिंगट गरुड : भारताच्या बहुतेक भागात आणि हिमालयाच्या १,२२० मी. उंचीपर्यंत आणखी एका जातीचा गरुड आढळतो. रंगावरून त्याला पिंगट गरुड म्हणतात. साध्या घारीपेक्षा हा मोठा असून शरीर भव्य असते. शरीर एकाच रंगाचे नसते सामान्यतः ते तपकिरी असते पण पुष्कळदा रंग मळकट पिवळसर तपकिरी किंवा तांबूस तपकिरी असतो. शेपूट गडद करड्या तपकिरी रंगाचे असते. माथा बसका चोच जाड, मजबूत, टोकाशी वाकडी व तीक्ष्ण असते. पाय बोटांपर्यंत पिसांनी झाकलेले असतात. मादी नरापेक्षा मोठी पण दिसायला सारखीच असते. हे एकेकटे किंवा जोडीने राहतात.
आकाशात घिरट्या घालीत हे भक्ष्याची टेहेळणी करीत असतात. हा गरुड अतिशय धीट असून ससे, घुशी, उंदीर, साप, सरडे , मोठे पक्षी, कोंबड्या व त्यांची पिल्ले पायात घट्ट पकडून उचलून नेतो.
यांचा प्रजोत्पादनाचा काळ नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत असतो. घरटे बरेच मोठे व सपाट माचासारखे असून उंच झाडाच्या शेंड्यावर असते. ते काटक्यांचे केलेले असून त्यावर गवत अंथरलेले असते. मादी दोन-तीन पांढरी अंडी घालते. मादी अंडी उबवते पण बाकीची सगळी कामे दोघेही करतात.
शिखाधारी गरुड : पिंगट गरुडापेक्षा काहीसा मोठा असलेला एक गरुड भारतात आढळतो. हिमालयाच्या सु. २,१३५ मी. उंचीपासून खाली सबंध भारताच्या झाडी असलेल्या प्रदेशात तो आढळतो. याचे शरीर गडद तपकिरी रंगाचे असते खालचा भाग पिवळसर तपकिरी आणि त्यावर वाटोळे पांढरे ठिपके आणि काळ्या व पांढर्या बारीक रेषा असतात. मानेच्या काट्यावर पांढरे आणि काळे आडवे पट्टे असलेला उघडता व मिटता येणारा मोठा तुरा शेपटीवर खालच्या बाजूने दिसणारा पांढरा पट्टा असेच दोन पट्टे प्रत्येक पंखावर डोळे पिवळे चोच मजबूत, काहीशी लांब व टोकाशी तीक्ष्ण आकडी असलेली असते. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. हे एकेकटे किंवा जोडीने राहतात.
मुबलक पाणी आणि दाट झाडी असलेल्या डोंगराळ किंवा सपाट प्रदेशात हा राहतो. एखाद्या मोठ्या झाडावर उंच ठिकाणी बसून किंवा झाडाभोवती घिरट्या घालीत हा भक्ष्याची टेहळणी करीत असतो. साप, सरडे आणि बेडूक हे याचे मुख्य भक्ष्य होय. क्वचित रानकोंबडी आणि मोर यांनाही हा उचलून नेतो.
यांच्या प्रजोत्पादनाचा काळ डिसेंबरपासून मार्चपर्यत असतो. घरटे अरण्यातील अतिशय उंच झाडाच्या शेंड्याजवळ असते. ते फार मोठे, काटक्यांचे बनविलेले आणि सपाट असून त्याच्यावर हिरव्या पानांची बिछायत असते. मादी दर खेपेस एकच अंडे घालते. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असून त्यावर तांबूस तपकिरी चकदळे असतात.
मत्स्याहारी गरुड : माशांवर उदरनिर्वाह करणारा एक गरुड भारतात आढळतो. तो उत्तर भारत, बंगाल व आसाम या प्रदेशांत राहतो. हा घारीपेक्षा मोठा असतो. गडद तपकिरी रंगाच्या या गरूडाचे डोके फिक्कट सोनेरी तपकिरी असते. शेपटीवर आडवा, रुंद पांढरा पट्टा असतो. उडत असताना हा पट्टा स्पष्ट दिसतो. नर व मादी दिसायला सारखीच असतात पण मादी नरापेक्षा मोठी असते. या पक्ष्यांचे जोडपे नेहमी नद्या आणि तलाव यांच्या जवळपास आढळते. नदीतील किंवा तलावातील माशांवर झडप घालून तो त्यांना आपल्या नख्यांनी पकडतो. माशांखेरीज साप, उंदीर, खेकडे वगैरेही हा खातो. प्रजोत्पादनाचा काळ नोव्हेंबर-मार्च हा असतो. पाण्याजवळ असणार्या एखाद्या झाडावर हा काटक्यांचे माचासारखे घरटे बांधतो. ते फार मोठे व झाडाच्या शेंड्यावर असते. मादी त्यात तीन अंडी घालते. नर व मादी दोघेही पिल्लांची जोपासना करतात.
कर्वे,ज.नी.
गरुड – पौराणिक उल्लेख : देशोदेशींच्या पुराणकथांमध्ये गरुडाला स्थान मिळाले आहे. भारतीय पुराणकथांच्या परंपरेनुसार हा पक्षिश्रेष्ठ कश्यप व विनता यांचा अंडज-पुत्र. सूर्य-सारथी अरुणाचा हा धाकटा भाऊ. सर्पाची माता कद्रू आणि विनता या सवती. कद्रूचे पुत्र सर्प यांच्याशी गरुडाचे हाडवैर होते. गरुडाने स्वर्गातून अमृतकलश आणला व तो मातेला दिला. त्याच्या मातृभक्तीने विष्णू प्रसन्न होऊन त्यास अमरत्वाचा व स्वत:हूनही उंच जागी विराजमान होण्याचा असे दोन वर दिले. विष्णूची सेवा म्हणून विष्णुवाहन होण्याचे आणि त्याच्या ध्वजावर बसण्याचे गरुडाने मान्य केले. पुराणांत गरुडाविषयी अनेक कथा आहेत.
भारतात दोन, चार व आठ हात असलेल्या अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपातील गरुडमूर्ती अनेक ठिकाणी आढळतात. तसेच शरीर मानवी आणि पंख व चोच पक्ष्याचे अशा नमस्कार मुद्रेतील गरुडमूर्तीही अनेक मंदिरांत आहेत.वैष्णव पंथात गरुडाचे माहात्म्य फार मोठे आहे. शिवापुढे जसा नंदी तसाच विष्णूपुढे गरुड असतो.काही मंदिरांत ‘गरुडखांब’ असतो.चतुर्भुज गरुडाला ‘वैनतेय’ म्हणतात.
गरुड व नाग ह्या परस्परांशी हाडवैर असलेल्या पाताळातील दोन जमाती होत्या असा महाभारतात उल्लेख आहे. अठरा महापुराणांपैकी गरुडपुराण हे एक असून विष्णूच्या आज्ञेवरून ते गरुडाने रचले अशी कथा आहे.
सुर्वे, भा. ग.
“