गनचरॉव्ह, इव्हान अल्यिक्सांद्रव्ह्यिच : (१८ जून १८१२–२७ सप्टेंबर १८९१). रशियन कादंबरीकार. जन्म सिम्बिर्स्क (आताचे उल्यानफस्क) येथे एका श्रीमंत कुटुंबात. मॉस्को विद्यापीठातून पदवी घेऊन (१८३४) सरकारी नोकरीत प्रवेश. १८५२–५४ ह्या काळात त्याने जपानचा प्रवास केला.
अबिक्नोव्हेन्नाया इस्तोरिया (१८४७, इं.भा. अ कॉमन स्टोरी, १९१७), अब्लोमव्ह (१८५९) आणि अब्रीव्ह (१८६९, इं.भा. द प्रेसिपिस, १९१५) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. ह्या तिन्ही कादंबऱ्यांतून क्रियाशील, उद्योगी व्यापारी वर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नाळू आणि निरुद्योगी रशियन सरंजामदारांच्या जीवनाचे चित्रण केले आहे. उद्योगशील, तंत्रकुशल आणि प्रागतिक असे पश्चिमी देश व जुन्या परंपरांनी बंदिस्त झालेले एकोणिसाव्या शतकातील रशियामधले जीवन यांच्यातील संघर्ष त्यांतून प्रत्ययास येतो. त्यामुळे तत्कालीन सामाजिक संदर्भात ह्या कादंबऱ्यांचे मोल मोठे आहे. रशियन साहित्याच्या इतिहासातही त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: अब्लोमव्ह ह्या कादंबरीचा समावेश श्रेष्ठ रशियन कादंबऱ्यांत केला जातो. गनचरॉव्हने काही समीक्षणात्मक निबंधही लिहिले आहेत. सेंट पीटर्झबर्ग येथे तो निवर्तला.
पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)