क्यूबा : रिपब्लिका द कूबा. कॅरिबियन समुद्रातील ग्रेटर अँटिलीस किंवा वेस्ट इंडीज द्वीपसमूहापैकी सर्वांत मोठे बेट व साम्यवादी देश. शेजारच्या लहानमोठ्या बेटांसह क्षेत्रफळ १,१०,९२२ चौ. किमी. लोकसंख्या ८५,२३,२९२ (१९७०). याची पूर्वपश्चिम लांबी सु. १,२०० किमी., दक्षिणोत्तर रुंदी ४० ते २९० किमी. व किनारा सु. ३,५०० किमी. आहे. हे अमेरिकेच्या फ्लॉरिडा द्वीपकल्पाच्या दक्षिणेस सु. १५० किमी., मेक्सिकोच्या आखाताच्या तोंडाशी, १९° ४९’ उ. ते २३° १५’ उ. व ७४° ८’ प. ते ८४° ५७’ प. यांच्या दरम्यान असून, याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर व त्यातील फ्लॉरिडाचे द्वीपकल्प आणि बहामा बेटे, पूर्वेस विंडवर्ड पॅसेज व त्यापलीकडे हैती, दक्षिणेस कॅरिबियिन समुद्र व त्यातील जमेका वगैरे बेटे आणि पश्चिमेस मेक्सिकोचे आखात व यूकातान खाडीपलीकडे मेक्सिकोचे यूकातान द्वीपकल्प आहे. मेक्सिको आणि पनामा यांच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे क्यूबाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. याची राजधानी हाव्हॅना आहे.
भूवर्णन : क्यूबाचे मूळचे खडक शिस्ट, स्लेट, संगमरवर व ग्रॅनाइट इ. रूपांतरित व अग्निजन्य असून त्यांवर वलीकरण, विभंग, उत्थान, अधोगमन, क्षरण इ. क्रिया अनेक वेळा झालेल्या आहेत. काही ठिकाणी तीव्र वलीकरणामुळे जुने खडक वर व नवीन खडक खाली असेही झाले आहे. येथील भूमी अद्यापही काही अंशी अस्थिर असून मधूनमधून भूकंप होत असतात. निमज्जन वगैरेंमुळे किनाऱ्यावर गोमुखाच्या आकाराची अनेक उत्तम नैसर्गिक बंदरे तयार झालेली आहेत. येथील मृदा मुख्यतः चुनखडक व चिकणमाती यांची बनलेली असून येथील तांबूस रंगाची मॅटान्झास मृदा उसाच्या पिकाला फारच चांगली आहे. अरुंद नदीखोऱ्यांतील जलोढमृदा फार सुपीक आहे. क्यूबाची सु. ४०% भूमी डोंगराळ असून ती तीन विभागांत केंद्रित झाली आहे. पूर्वेकडे ओरिएंटे व कामाग्वे प्रांतांत दक्षिण किनाऱ्यावर सिएरा माएस्ट्रा व त्याला समांतर पूर्वपश्चिम पर्वतराजी असून त्यात १,९७३ मी. उंचीचे क्यूबाचे सर्वांत उंच शिखर पीको तूर्किनो हे आहे. या भागात लोखंड, तांबे, निकेल, मँगॅनीज, क्रोमियम इत्यादींच्या खाणी आहेत. आग्नेयीकडील बराच प्रदेश ६०० मी. उंचीचा, तर कामाग्वे भाग ३०० मी. उंचीचा आहे. मध्य क्यूबाच्या दक्षिण लास व्हीयास भागातील त्रिनिदाद पर्वताची जास्तीत जास्त उंची १,१५८ मी. आहे. उत्तर किनाऱ्याजवळील पिनार देल रीओची उंची ७२८ मी. आहे. क्यूबाची सरासरी उंची १०० मी. असून पश्चिमे कडील सिएरा दे लोस ऑर्गानोसची उंची ७६२ मी. पेक्षा जास्त नाही. पूर्व, पश्चिम व मध्य क्यूबातील या पर्वत केंद्रांदरम्यानची क्यूबाची ऊर्मिल भूमी सौम्य उताराची असून ती लागवडीच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने फार उपयोगी आहे. किनारा दलदलीचा आणि प्रवाळभित्तियुक्त असून त्याच्याजवळ अनेक द्वीपे व द्वीपसमूह आहेत. क्यूबात मोठ्या नद्या अथवा सरोवरे नाहीत. सु. दोनशे छोट्या नद्या दक्षिणेकडे व उत्तरेकडे मिळून वाहतात. त्यांच्या मुखाशी रुंद खाड्या असून त्यांतून अंतर्भागात अगदी थोडेच अंतर वाहतूक होऊ शकते. सर्वांत मोठी नदी कॉटो सु. २४९ किमी. लांब असून ती पश्चिम ओरिएंटे प्रांताच्या मैदानी प्रदेशातून वाहते.
क्यूबाचे हवामान उपोष्णकटिबंधीय आहे. समुद्र सान्निध्यामुळे आणि व्यापारी वाऱ्यांमुळे ते बरेच सौम्य झालेले आहे. जानेवारी – फेब्रुवारीचे सरासरी तापमान २१·१° से. तर जुलै-ऑगस्टचे २७·२° से. असते ३२° से. पेक्षा जास्त १०° से. पेक्षा कमी तापमान सहसा आढळत नाही. उंच डोंगरावर मात्र पाणी गोठण्याइतके तपमान उतरू शकते. वार्षिक सरासरी तपमानकक्षा लहान असल्यामुळे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू विशेषसे जाणवत नाहीत. उंचीचा परिणाम मात्र तपमानावर झालेला दिसतो. सरासरी पर्जन्यमान १३७ सेंमी. आहे. पिनार देल रीओच्या डोंगराळ भागात ते १६५ सेंमी., तर ओरिएंटेच्या वातपराङ्मुख दक्षिण किनाऱ्यावर ७५ सेंमी. पर्यंत असते. क्वचित अवर्षणही येते. १९६७-६८ चे अवर्षण सु. दीड वर्ष टिकले होते. मेपासून ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते एप्रिल कोरडा ऋतू असतो. उष्णकटिबंधीय आवर्तांचा तडाखा मात्र क्यूबाला पुष्कळदा बसतो. त्यावेळी वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि मोठमोठ्या सागरी लाटा यांमुळे मालमत्तेची व क्वचित जीविताचीही बरीच नुकसानी होते.
ऊस, कॉफी, कोको व केळी यांच्या बागा होण्यापूर्वी क्यूबाचे मैदानी प्रदेशही अरण्यमय होते. आता फक्त पर्वतीय प्रदेशातच अरण्ये दिसतात. उष्ण कटिबंधीय वर्षावने थोडीच आहेत. पावसाच्या बदलत्या प्रमाणानुसार पानझडी झाडे अनेक प्रकारची आहेत. पाइन, सीडार, ओक, मॉहॉगनी, एबनी, अकाना, साबिको इ. इमारती व लाकूडसामान उपयोगी वृक्ष आहेत. डिंक, राळ, औषधी, रांग इ. उपयोगाचे वृक्षही पुष्कळ आहेत. २५ मी. पर्यंत उंच वाढणारा रॉयल पाम हा राष्ट्रीय वृक्ष असून त्याचे सर्व भाग उपयोगी येतात. सीबा हा रेशमासारखा मऊ, शेवरीसारखा कापूस देणारा सुंदर वृक्षही ३० मी. पेक्षा उंच वाढतो. नारळ व इतर ३०–४० प्रकारचे ताडजातीचे वृक्ष येथे पुष्कळ आहेत. क्यूबाच्या सु. चौथ्या भागात प्रथम सॅव्हाना गवत होते. हल्ली कामाग्वे, पश्चिम लास व्हीयास व दक्षिण पिनार देल रीओ येथे निकृष्ट मृदेमुळे गवत, ताड व झुडपे आढळतात. किनारी भागात, विशेषतः दक्षिणेकडे, कच्छ वनश्री आढळते. सफरचंद, सीताफळ, ॲव्होकॅडो व पपई ही येथील प्रमुख फळे होत.
क्यूबात पृष्ठवंशी व मोठे प्राणी क्वचितच दिसतात, विविध प्रकारचे व छोटे प्राणी विपुल आहेत. वटवाघळे तसेच बिळवासी आणि कीटकभक्षी प्राण्यांच्या पुष्कळ जाती आहेत. वटवाघळांपासून ग्वानो हे खत मिळते. नदीमुखांजवळ मॅनेटी दिसतो. स्थलांतरी व मूळचे पक्षी विपुल आहेत. सरपटणारे व उभयचर प्राणी थोडेच आहेत. मगरी, इग्वानो, कासवे आहेत. विषारी सर्प नाहीत. गोगलगायी खूप आहेत. मत्स्यधन विपुल आहे. मृदुकाय प्राण्यांच्या व कीटकांच्या हजारो जाती येथे आढळतात. पीत ज्वरवाही डासांचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे हे विशेष होय.
इतिहास : १४९२ मध्ये कोलंबसास क्यूबा सापडले व १५११ पर्यंत स्पॅनिशांनी त्यावर आपले पाय पक्के करून त्यास अमेरिकेवरील आक्रमणाचे मुख्य ठाणे केले. त्यानंतर उत्तम बंदरामुळे त्या खंडातील लूट घेऊन येणाऱ्या स्पॅनिश जहाजांचे संकलनकेंद्रही क्यूबाच झाले. त्याचमुळे फ्रेंच व इंग्रज चाच्यांच्या छापामारीचे ते वारंवार भक्ष्य झाले. समृद्ध व मोक्यावर असलेल्या या बेटाचे यूरोपीय राज्यकर्त्यांना नेहमीच विलोभन असे. सतराव्या शतकातील क्यूबाचा इतिहास त्यांच्या आणि फ्रेंच व इंग्रज चाच्यांच्या विध्वंसक हत्यांनी भरलेला आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी स्पेनचे साम्राज्य कोसळून लॅटिन अमेरिकेत अनेक गणराज्ये स्थापन झाली पण क्यूबामध्ये स्वातंत्र्याचे वारे पोहोचले नाही १८१०–१८५१ दरम्यान मिळमिळीत उठाव झाले, ते दाबण्यात आले. क्यूबाचे प्रतिनिधी स्पेनच्या सल्लागार मंडळात घेत असत. ही सवलतही १८१० मध्ये रद्द झाली आणि त्यामुळे अशा उठावांना विशेष कारण सापडले. याच सुमारास अमेरिकेच्या दक्षिण संस्थानांनी गुलामांची सोयीस्कर बाजारपेठ म्हणून क्यूबा घेण्याचा असफल प्रयत्न केला. या प्रकारांनी अस्वस्थ होऊन स्पॅनिश राज्यकर्त्यांनी क्यूबास अधून मधून सुधारणा करण्याची अभिवचने दिली व मोडली. याचा परिणाम म्हणून अखेर क्यूबात मोठा उठाव झाला, पण तो फसला. हा उठाव ‘दशवार्षिक युद्ध’ (१८६८–७८) म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रथमतः स्वतंत्र क्यूबा हे निग्रोंचे राज्य होईल किंवा फ्रान्स वा ब्रिटन यांच्या आधीन जाईल वा विरोधकांना तेथे आश्रय मिळेल, अशा धास्तीने तेथील स्वातंत्र्यलढ्याशी अमेरिकेने असहकार केला. १८९२ साली होसे मार्ती याने अमेरिकेत क्यूबा क्रांतिकारी पक्ष स्थापन केला. त्यांनी क्यूबात १८९५ मध्ये मोठा उठाव केला, पण तो अयशस्वी झाला. १८९८ साली अमेरिका-स्पेन युद्ध सुरू झाल्याने क्यूबास स्वातंत्र्य मिळणे सोपे गेले. स्पेनशी केलेल्या पॅरिस येथील तहात अमेरिकेने क्यूबाचे स्वातंत्र्य मान्य करून घेतले. १८९९ ते १९०२ क्यूबा अमेरिकन लष्करी संरक्षणाखाली होते. १९०२ साली अमेरिकेचे लष्करी संरक्षण गेले, पण प्लॅट अमेंडमेंटमुळे मुलकी संरक्षण राहिलेच. तसेच शांततेकरिता क्यूबाच्या अंतर्गत कारभारात हात घालण्याचा अधिकारही राहिला.
अमेरिकन ‘संरक्षण’ काळात क्यूबाची आर्थिक व आरोग्यविषयक स्थिती सुधारली. विशेषतः पीतज्वर व हिवताप यांचे निर्मूलन ही मोठीच कामगिरी झाली. १९०१ साली संविधान बनविले गेले आणि १९०२ साली पाल्मा पहिला अध्यक्ष निवडला गेला. परंतु अमेरिकेच्या साखरेच्या गरजेकरिता क्यूबाची शेती राबवण्यात येऊन विस्तीर्ण ऊसमळे निर्माण झाले. देशात नवा श्रीमंत वर्ग निर्माण झाला. बहुतेक मळे, तेलशुद्धी कारखाने, रेलमार्ग आणि इतर उद्योग अमेरिकी भांडवलाच्या ताब्यात जाऊन अनुपस्थित मालकीचे अनिष्ट परिणाम क्यूबाच्या आर्थिक जीवनात दिसू लागले. १९०५ मध्ये निवडणुकीच्या मतभेदामुळे बंड झाले व शांतता प्रस्थापनाचा हक्क बजावून अमेरिकेने पुन्हा क्यूबावर लष्करी अंमल बसविला (१९०६). आपल्या देखरेखीखाली निवडणुका झाल्यावर लष्कर परत गेले (१९०९) परंतु १९१२ मध्ये निग्रो उठाव झाल्याने पुन्हा परतले. थोड्याच काळात पहिले महायुद्ध झाले आणि क्यूबाच्या साखरव्यापारात भरमसाट तेजी आली. क्यूबात शांतता राहिली परंतु युद्ध संपल्याबरोबर अमेरिकेतील आणि यूरोपातील बीट साखर बाजारात येऊन क्यूबावर मंदीची लाट ओढवली. यामुळे उठाव, खोट्या निवडणुकी, अंदाधुंदी, लाचलुचपत, रक्तपात व हुकूमशहा यांची मालिका लागली. अमेरिकेत फ्रँकलिन रूझवेल्ट अधिकारावर आला. त्याने क्यूबाच्या अंतर्गत कारभारात हात घालण्याचा हक्क १९३४ साली सोडून दिला. परंतु ग्वांतानामो उपसागरातील नाविक तळ मात्र ठेवला. अद्याप हा तळ अमेरिकेच्याच ताब्यात आहे. आपण खरे स्वतंत्र झालो या समाधानापलीकडे याचा काही फायदा झाला नाही. मोरालीस हा १९२५–३३ पर्यंत हुकूमशहा होता. १९३४ मध्ये छोटी क्रांती होऊन सरकार बदलले. सैन्याच्या बळावर बातीस्ताने अनेक राष्ट्राध्यक्ष नेमले व शेवटी १९४० मध्ये तो स्वतःच हुकूमशहा बनला. बातीस्ताने स्थैर्य आणले, मजूर वा शेतकरी यांचे जीवनमान उंचावले, परंतु अधिकार- रक्षणाकरिता त्याने रानटी उपायांचा अवलंब केला. व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट झाले, मतस्वातंत्र्य दडपले गेले, प्रतिस्पर्ध्यांचा छळ व कत्तली सुरू होत्याच. शासनही अप्रामाणिक, लाचखाऊ व बेभरवशी झाल्याने १९५८ मध्ये फिडेल कास्ट्रोच्या नेतृत्वाखाली पुन्हा क्रांती होऊन जानेवारी १९५९ मध्ये बातीस्ता परागंदा झाला. २६ जुलै १९५३ रोजीचा फिडेल कास्ट्रोचा उठाव अयशस्वी झाला होता. म्हणून त्याने आपल्या चळवसीस ‘२६ जुलै चळवळ’ असेच नाव दिले. चे गेव्हारा (१९२८–६७) हा त्याचा सहकारी होता.
फिडेल कास्ट्रोच्या नेतृत्वाखालील ही क्रांती इतिहासात लोकक्रांती समजली जाते. सर्व उदारमतवादी जगास ही क्रांती व तिचा तरुण नेता याबद्दल सहानुभूती होती. परंतु लोकशाही प्रघातांचे पुनर्वर्धन, जमीन वाटप सुधारणा, शिक्षण प्रसार, कामकरी शेतकऱ्यांस मदत वगैरे क्रांतिपूर्व आश्वासने कास्ट्रोस प्रत्यक्षात उतरवता आली नाहीत. शिक्षणप्रसार झाला व मोठ्या जमिनी आणि धंदे सरकारी झाले. कामकरी शेतकरी यांचे जीवन कमी असह्य झाले. १९६० पासून क्यूबाचे अमेरिकेशी संबंध तणावले. १९६१ साली कास्ट्रोने मार्क्सवादी शासनपद्धतीची घोषणा केली. उत्पादन, वाटप, दळवळण यांचे राष्ट्रीयीकरण केले. रशियाच्या धर्तीवर योजना आखल्या. प्रतिस्पर्ध्यांचा छळ, कैद वा कत्तल केली. हजारो निर्वासित झाले. त्यांत बरेच कास्ट्रोचे क्रांतिकारी सहकारीही होते. त्यांनी अमेरिकेच्या सहकार्याने ७ एप्रिल १९६१ रोजी क्यूबावर अयशस्वी स्वारी केली. याचा परिणाम क्यूबाचे राजकारण अमेरिकेपासून आणखी दूर व रशियाच्या अधिक जवळ जाण्यात झाला. १९६२ च्या मध्यास रशियाने क्यूबामध्ये आण्विक क्षेपणास्त्रांचा तळ उभारला. याचा सुगावा लागून अमेरिकेने रशियास निर्वाणीचा खलिता पाठवला, क्यूबाची नाकेबंदी केली आणि स्वतः युद्धाची तयारी केली. परिणामतः रशियाने माघार घेऊन अणुयुद्धाचे संकट टाळले. तथापि क्यूबाला रशियाची मदत अव्याहत चालूच असून क्यूबा अमेरिका खंडातील साम्यवादाचा आधार समजला जातो. लॅटिन अमेरिकेतील अनेक साम्यवादी उठावांना क्यूबापासून स्फूर्ती आणि साहाय्य मिळाले आहे.
राजकीय स्थिती : १९०२ च्या संविधानानुसार देशात राष्ट्राध्यक्ष, वरिष्ठ व कनिष्ठ सभागृहे, राज्यपाल, महापौर इत्यादींची दर चार वर्षांनी निवडणूक होई. १९४० साली नवीन आणि जास्त लोकशाहीनिष्ठ संविधान बनविले गेले. तथापि बातीस्ताच्या हुकूमशाही राजवटीत त्याचा अंमल नीट झाला नाही. १९६१ मध्ये क्यूबात एकपक्ष राजवट जाहीर झाली. मात्र १९४० चे संविधान रद्द झालेले नाही. त्या अन्वये राष्ट्रपती, ७२ सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ आणि १९५ सदस्यांचे विधिमंडळ ४ वर्षांकरिता सार्वत्रिक मतदानाने निवडले जाते. विधिमंडळातील निम्म्या सदस्यांची द्विवार्षिक निवडणूक होते. स्त्रियांना मताधिकार आहे. पंतप्रधान राष्ट्राध्यक्षाची नेमणूक करतो आणि २० मंत्र्यांच्या साहाय्याने राज्य कारभार चालवितो. राष्ट्राध्यक्ष आपले मंत्रिमंडळ निवडतो. १९५९ पासून डॉ. तोराडो राष्ट्राध्यक्ष असून कास्ट्रो पंतप्रधान व पक्षाचा सचिव आहे. शासनासाठी क्यूबाची सहा प्रांत व १२६ नगरपालिकांत विभागणी केली आहे.
एक सर्वोच्च न्यायालय, सात फेरविचार न्यायालये आणि दुय्यम जिल्हा न्यायालये आहेत. १९५९ मध्ये ग्रामसुधार व नगरसुधार कायदे करून यांचे अधिकार खच्ची करण्यात आले आहेत. याशिवाय व्यापक अधिकाऱ्याच्या क्रांतिन्याय सभाही स्थापन झाल्या आहेत.
नोव्हेंबर १९६३ पासून लष्करी नोकरी सक्तीची आहे. फिडेल कास्ट्रो सेनेचा मुख्य असून रशियाच्या मदतीने सेनादल आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज बनविले आहे.
कास्ट्रो राज्यक्रांती होण्यापूर्वी कम्युनिस्ट राष्ट्रांशी क्यूबाचे संबंध नव्हते. त्यानंतर सर्वांशी राजनैतिक संबंध जोडण्यात आले. यांत रशिया व चीन प्रमुख होत. क्यूबा संयुक्त राष्ट्रांचा व इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.
आर्थिक स्थिती : क्यूबाची भूरचना, मृदा निरनिराळी पिके काढण्यास अनुकूल आहे. तथापि अठराव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेला साखरेचा पुरवठा करणारा देश अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस हेच मुख्य पीक होऊन क्यूबाचे आर्थिक जीवन एकावलंबी झाले. यात नंतर कॉफीची भर पडली. परंतु आर्थिक जीवनातील असंतुलन सावरले नाही. १९२० साली बीट साखरेच्या स्पर्धेमुळे साखरेच्या किंमती घसरल्या व एकाच पिकाच्या धोक्यामुळे उत्पादनात विविधता आणण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. कास्ट्रो क्रांतीनंतर साखरेच्या मिठीतून क्यूबाची सुटका करण्याचा प्रयत्न झाला, पण अद्यापही (१९७१) निर्यातीचा ८५% हिस्सा साखर व तद्भव पदार्थ यांचाच आहे. या खालोखाल तंबाखू व क्यूबाचे प्रसिद्ध हाव्हॅना चिरूट आणि मांस यांची निर्यात आहे. १९३४ पासून क्यूबाची साखर अमेरिका विशेष दराने विकत घेत असे व एक अब्जाहून अधिक रुपये दरवर्षी जादा मिळत असत. कास्ट्रो क्रांतीनंतर क्यूबामध्ये अमेरिकेविरुद्ध कठोर प्रचार सुरू झाला. जून १९५९ मध्ये कास्ट्रोने जमीन कायद्यात सुधारणा करून ४०२.७ हेक्टरवरील सर्व जमिनी ताब्यात घेतल्या व प्रत्येकी २६.७ हे. अशा तीन लाख भूमिहीनांस वाटल्या.ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्यांना ४ टक्के व्याजाची रक्कम क्यूबातच गुंतवणे सक्तीचे केले. तसेच परकीय नागरिकांस जमिनी विकत वा कारखाने घेणे बेकायदा झाले. या कायद्याने अमेरिकेच्या नागरिकांच्या ६४,७५,२०० हे. जमिनी सरकाराधीन झाल्या. एप्रिल १९६० मध्ये अमेरिकेने क्यूबाचा साखरेचा आयात वाटा रद्द केला व ऑक्टोबरमध्ये त्यावर निर्यात बंदी घालून त्याची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. तथापि जानेवारी १९६० पासून रशिया व इतर साम्यवादी राष्ट्रांशी व्यापार, कर्जे व तांत्रिक सल्ला इत्यादींचे करार करून क्यूबाने नव्या बाजारपेठा मिळविल्या व ती बंदी सह्य केली.
जमीन कायद्यामुळे साखर उत्पादन घटले, पण भात आणि मांस यांत क्यूबात स्वयंपूर्ण होत आहे. १९६७ मध्ये क्यूबा ७१,७२,००० गुरे, ३,३१,४०० डुकरे, ६,९७,७०० घोडे, ३,३१,३०० मेंढ्या आणि ४,६८,१०० शेळ्या होत्या. ऊस, कॉफी, कोको, केळी यांच्या बागांशिवाय तंबाखू, तांदूळ, फळे, भाजीपाला यांचे मोठे उत्पन्न आहे.
सर्व जमीन राष्ट्रीय मालकीची असून राष्ट्रीय जमीनसुधार संस्थेकडे तिची देखभाल आहे. हिच्यामुळे भात उत्पन्न ६० टक्क्यांनी वाढले आहे व पशुसंवर्धनही वाढले आहे. या संस्थेत सर्व माल विकावा लागतो. जमीन कोणास गहाण किंवा खरेदी देता येत नाही. १९६२ साली कास्ट्रोने १९७० पर्यंत दरवर्षी एक कोट टन धान्याचे लक्ष्य ठरविले. १९६७-६८ मध्ये दुष्काळ पडूनही १९७० साली ८५ लक्ष टन धान्य उत्पादन झाले.
क्यूबातील उद्योगही राष्ट्रीय मालकीचे आहेत. साखर व तद्भव पदार्थांचे दीडशेहून अधिक कारखाने असून मांस पदार्थांचे कारखाने आणि दूध व खाद्यपदार्थ डबाबंद करण्याचे उद्योग वाढत आहेत. सिगार व सिगारेटचे उद्योग २,००० वर आहेत. औद्योगिक रसायने, लाकूडकाम, रंग, कातडी वस्तू, सिमेंट, विटा, प्लॅस्टिक, निकेल यांचे कारखाने वर येत आहेत. क्यूबाचा व्यापार रशिया, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, बल्गेरिया, हंगेरी, चीन, कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन, पूर्व जर्मनी, स्पेन वगैरे देशांशी चालतो. क्यूबाचा ९८% तेलपुरवठा पूर्व यूरोपीय देशांतून होतो. १९६६ च्या सुमारास एकूण आयात ८० कोटी पेसोंची आणि निर्यात ६० कोटी पेसोंची होती.
बहुतेक शहरे रेलमार्गावर असून लहान मोठे मिळून त्यांची लांबी १८ ते १०० किमी. भरेल. शिवाय ८०० किमी. हून अधिक राजरस्ते आहेत. इतर रस्ते ५,१०० किमी. आहेत. हाव्हॅना, सांत्यागो दे कूव्हा, न्वेवीटास, मातँझास, स्येनफ्वेगोस, माऱ्येल व इतर २१ बंदरे असून हाव्हॅनास मोठा विमानतळ आहे. दूरध्वनी व तारखाते सर्व मोठ्या शहरांत आहेत. १०३ आकाशवाणी व ६ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत.
क्यूबाचे मुख्य नाणे पेसो होय. त्याची किंमत १ अमेरिकन डॉलर बरोबर आहे.
लोक व समाजजीवन : मध्य अमेरिकेतील देशांमध्ये क्यूबाचे वैशिष्ट्य असे होते, की तेथील ७३% लोक गोरे-स्पॅनिश, निग्रो १२% व मिश्रवंशीय १५% होते. क्रांतीनंतर बरेच लोक देशांतर करून गेले. ९९% लोक क्यूबातच जन्मलेले असून ६०% लोक शहरात राहणारे आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ६८ होती (१९६८ अंदाज). लोक शेतीवर किंवा खेड्यांतून राहतात.
क्यूबाच्या स्वातंत्र्यनेत्यांत कॅथलिकविरोधी भावना असल्याने बहुसंख्य लोक त्या पंथाचे असूनही १८९५ पासून त्याचे वर्चस्व कमी होत आहे. शासन धर्मातीत आहे व कास्ट्रो क्रांतीनंतर धर्मविरोधास धार चढली आहे, धर्मगुरू व भिक्षुणींचे सामाजिक आणि सांस्कृतिक वर्चस्व नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तथापि ग्रामीण भागात कॅथलिक आचारविचार व संस्कृतीची पकड अद्याप पूर्ण खिळखिळी झाली नाही.
इतर लॅटिन अमेरिकनांच्या तुलनेने क्यूबातील आरोग्यव्यवस्था पुढारलेली आहे. १९५९ च्या क्रांतीनंतर बाल संगोपन, गरजू अपत्यांस दूध, पक्षाघात, क्षय इत्यादींच्या प्रतिबंधक लसी, नवी रुग्णालये अशा सोयी होत आहेत. वैद्यकीय पदवीधरांस खेड्यांतून कामास पाठविण्यात येते. १९६६ साली दर १,००० लोकांमागे ५·५ खाटांची व १०,००० लोकांमागे ८·९ डॉक्टरांची सोय होती.
क्यूबाची भाषा स्पॅनिश आहे, पण इंग्रजी बरीच प्रचारात आहे. साहित्य, संगीत व कला यांची प्रेरणा निग्रो समाजाकडून आली आहे. त्यांच्या लोकगीतांतून व नृत्यांतून नवे संगीत आणि रंबा, सांबा, कोंबा, मांबो अशी नृत्ये जगास मिळाली आहेत. शिल्पकलेबद्दल क्यूबाचे कलाकार विख्यात असून त्यांत सावेद्रा अजरामर आहे.
क्यूबात उत्कृष्ट ग्रंथालये व संग्रहालये असून १७२८ साली हाव्हॅना येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे. याशिवाय सांत्यागो दे कूव्हा व सांता क्लारा येथे विद्यापीठे आहेत. बातीस्ता व कास्ट्रो यांनी शाळा वाढवून क्यूबातील साक्षरता कॅरिबियन देशांत सर्वोच्च केली. १९६४ साली अधिकृतपणे देशात निरक्षरता नव्हती. साहित्य व कलाक्षेत्रात होसे हेरेदिया (१८०३–३९) हा कवी महत्त्वाचा असला, तरी होसे मार्ती (१८६३–९५) हा श्रेष्ठ देशभक्त, कवी व लेखक समजला जातो. यांशिवाय कास्तेल्यानोस, ट्रेलेस, ऑर्टीस इ. लेखक व मेलेरो, मारेल, आंजेलो, वाल्डारामा हे चित्रकार उल्लेखनीय आहेत.
उत्तम हवा, ऐतिहासिक इमारती, गड व स्थळे, सोयीस्कर पुलिने यांनी क्यूबा पर्यटकांना आकर्षित करीत असे, परंतु कास्ट्रो क्रांतीनंतर यांवर निर्बंध पडले आहेत.
हाव्हॅना ही राजधानी असून क्यूबाच्या औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचे केंद्र आहे. हे मेक्सिकोच्या आखातावरील उत्तम नैसर्गिक बंदर असून वेस्ट इंडीजमध्ये सर्वांत मोठे शहर आहे. येथे विद्यापीठ, ग्रंथालय आणि अनेक कारखाने असून ते प्रवाशांचे आकर्षण आहे. याच्या आसपासच्या प्रदेशात तांबे, तेल वगैरे खनिजे सापडतात.
मातँझास, कार्डेनास, ग्वांतानामो, सांत्यागो दे कूव्हा, न्वेवीटास स्येनफ्वेगोस ही महत्त्वाची बंदरे व औद्योगिक केंद्रे आहेत. ग्वानाबाकोआ येथे तांबे, औषधी झरे व कारखाने आहेत. मार्यानाओ येथे विटा, कौले, सिमेंट, बीअर इ. होतात. रेग्ला हे हाव्हॅना बंदराच्या आग्नेय किनाऱ्यावर जहाजे, गुदामे इत्यादींचे केंद्र व तेलशुद्धीकरण, साबण, पादत्राणे इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.
संदर्भ :
- Goldenberg, B. The Cuban Revolution and Latin America, New York, 1965.
- Mills, C. W. Castro’s Cuba, London, 1961.
- Thomas, H. Cuba or the Pursuit of Freedom, London, 1971.
लेखक : शहाणे, मो. ज्ञा.