कोयना प्रकल्प : पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रचंड जलविद्युत् प्रकल्प. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमाजवळच कोयना नदीचा उगम आहे. कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. कोयना मात्र उत्तर-दक्षिण दिशेने ६४ किमी. जाऊन व प्रतापगडला वळसा घालून हेळवाकजवळ पूर्वाभिमुख होते. तेथून ५६ किमी. वरील कराडजवळ कोयनेचा कृष्णेशी संगम (प्रीतिसंगम) झाला आहे. कोयनेच्या ८९२·० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या खोऱ्यात सु. ५०८ सेंमी. पाऊस पडतो. कोयना खोरे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून ४२७ मी. उंच आहे. या ठिकाणी जलविद्युत् प्रकल्प उभारण्याच्या योजनेस १९५४ च्या जानेवारीत प्रारंभ झाला.
मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्यातील एक स्थापत्यविशारद बिल यांनी १९०८-०९ साली महाराष्ट्रात दौरा करून तत्कालीन सरकारला निरनिराळ्या ३२ पाटबंधारे योजना सुचविल्या. त्यांत कोयना पाटबंधारे योजनेचा समावेश होता. परंतु त्याबाबतीत सरकारने कार्यवाही केली नाही. जमशेटजी टाटा यांनी १९२०–२५ सालांत पूर्ण केलेल्या मुळशी योजनेनंतर कोयना धरण योजना हाती घेण्याचा संकल्प सोडला होता; परंतु मुळशी धरणाविरुद्ध सेनापती बापट यांनी उभारलेल्या सत्याग्रहामुळे टाटांची योजना बारगळली. अखेरीस स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात जागतिक बँकेने दिलेल्या १२ कोटी रु. किंमतीच्या परदेशी हुंडणावळीच्या साहाय्याने कोयना प्रकल्पास सुरुवात झाली.
हेळवाकजवळील देशुमुखवाडी येथे बांध घालून पाणी अडविलेले आहे. हे अडविलेले पाणी डोंगर पोखरून पश्चिमेस नेणारा कालवा (इन्टेक चॅनेल) नवजे येथे असून त्या पाण्यावर वीजनिर्मिती चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे होत आहे. धरणाने अडविलेले पाणी नवजापासून डोंगरात भुयार काढून पोफळी भागापर्यंत डोंगरातूनच नेले आहे. धरण बांधताना सिमेंट, रेती व मोठे दगड एकत्र करून तयार केलेल्या काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. कोयना प्रकल्प मुख्यत्वेकरून बोगद्यांनी भरलेला आहे. कोयना खोऱ्याच्या पश्चिम कुशीला धबधब्याच्या जागी ४५७ मी. ते ५४८ मी. उंचीची एक प्रचंड आखबंद कातळाची टेकडी आहे. खालच्या दरीतून वाहणाऱ्या वैतरणी आणि पंचधरा या दोन छोट्या नद्यांच्या दुआबात ती टेकडी उभी आहे. कोयनेच्या जलसंचयातील पाणी पश्चिम घाटात वीज उत्पादनासाठी ४ किमी. लांबीच्या बोगद्यात सोडण्याची व्यवस्था आहे. या बोगद्यास ‘आवाही कुल्या बोगदा’ (हेडरेस टनेल) अशी संज्ञा असून तो ६·४ मी. व्यासाचा आहे. टर्बाईन्स व ८ जनित्रे सांभाळणारे शक्तिगृह ‘रोहित्र दालन’, ‘झडपघर’ ही सारी जलविद्युत् केंद्राची योजना त्या आखबंद टेकडीच्या पोटात खोदलेल्या बोगद्यात तयार केलेली आहे. अशी योजना आशिया खंडात सध्या तरी अन्यत्र कोठेही नाही.
कोयना प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण होणार असून पहिला टप्पा १९६२-६३ मध्ये पूर्ण झाला, तेव्हा प्रकल्पाची विद्युत्शक्ती २ लक्ष ४० हजार किवॉ. होती. पहिल्या टप्प्यात ६३·५ मी. उंचीचे शिवाजीसागर धरण उभारण्यात आले आणि प्रत्येकी ६० मेगॅवॉट शक्तीची ४ जनित्रे सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचे काम संपल्यानंतर प्रकल्पाची विद्युत् निर्माणशक्ती ५ लक्ष ४० हजार किवॉ. पर्यंत वाढली. या टप्प्यात जलसंचयाची शक्ती २७७·५ कोटी घ.मी. पर्यंत वाढविण्याचे आणि ७५ मेगॅवॉट शक्तीची आणखी ४ जनित्रे उभारण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई-पुणे व कोयनानगरलगतच्या प्रदेशात प्रचंड प्रमाणावर विद्युत् पुरवठा होऊ लागला आहे.
तिसऱ्या टप्प्याचे काम पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस (१९७४–७९) पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या टप्प्यात ‘गुरूत्वधरण’ ८० मेगॅवॉट शक्तीची आणखी ४ जनित्रे, ११·२ किमी. लांबीचे व २२० किलोव्होल्टचे प्रेषण मार्ग आणि तीन बोगदे यांची उभारणी करण्याचे काम चालू आहे. धरण ७५·३४ मी. उंच व ७५३·४ मी. लांबीचे होईल. हे काम संपले की आणखी ३ लक्ष २० हजार किवॉ. विद्युत् निर्मिती होईल. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील मुख्यत्वेकरून ऊस पिकविणाऱ्या ६५,१५७ हे. जमिनीस पाण्याचा पुरवठा होणार आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस ५६·४४ कोटी रु. खर्च झाले असून तिसऱ्या टप्प्यासाठी ३१·८९ कोटी रु. मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू करणारा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणारा हा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतीस व उद्योगधंद्यास एक वरदानच ठरत आहे.
कोयना प्रकल्पाच्या परिसरात ११ डिसेंबर १९६७ रोजी तीव्र स्वरूपाचा भूकंपाचा धक्का बसला आणि पोफळी येथील सर्व जनित्रे बंद पडली. परंतु काही दिवसांतच जनित्रे पूर्ववत सुरू करण्यात आली.
लेखक : भेण्डे, सुभाष