कोन्या : प्राचीन आयकोनियम. तुर्कस्तानातील याच प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,००,७६० (१९७०). हे अंकाराच्या दक्षिणेस २३४ किमी., समुद्रसपाटीपासून १,०२५ मी. उंचीवर असून अंकारा, इस्तंबूल, इझमिर, बगदाद यांच्याशी लोहमार्गाने जोडलेले आहे. येथे गालिचे, कातडी सामान, सुती व रेशमी कापड, लोकर, ‘मोहेर’ यांचा व्यापार चालतो. परिसरातील गहू, बार्ली, राय, भाजीपाला येथील बाजारात येतात. मूळचे फ्रिझियन शहर इ.स.पू. तिसऱ्या शतकात ग्रीकांनी घेतले. इ.स. तिसऱ्या शतकात हे चांगले भरभराटलेले होते. रोमनांकडून सेल्जुक तुर्कांनी हे १०७२ मध्ये घेतले. त्यांनी १०९९ मध्ये यास रूम (रोमचा अपभ्रंश) नाव देऊन तेथे आपली राजधानी स्थापली. त्यानंतर त्याची आणखी भरभराट झाली. प्रसिध्द सूफी कवी जलालुद्दीन रूमी (१२०७–७३) याची ही कर्मभूमी. अनेक सत्तांतरांनंतर कोन्या ऑटोमन तुर्कांकडे आले. हमरस्ता उत्तरेकडून गेल्याने कोन्या मागे पडले होते. परंतु १८९६ नंतर लोहमार्गांनी जोडल्यामुळे त्यास ऊर्जितावस्था आली.
कुमठेकर, ज. ब.