गडकरी, राम गणेश : (२६मे १८८५–२३ जानेवारी १९१९). एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी. कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने. जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे. शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन पहिल्या वर्षापर्यंत (१९१२). त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांत कामे करणाऱ्या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर ह्या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली (१९०९–१०). तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. १९१० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला.
वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेले मित्रप्रीती हे त्यांचे पहिले नाटक अनुपलब्ध आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यांवर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना आपले गुरू मानीत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उताऱ्यांचे आहे (१९०७). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ १९०६–०७) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकऱ्यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी पूर्ण केले व ते १९२३ मध्ये प्रकाशित झाले. काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. ह्याच मासिकातून १९१३–१५ मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमि ह्या मासिकात ‘सवाई नाटकी’ ह्या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करीत असत.
प्रेमसंन्यास (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची नाटके अशी : पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण). वाग्वैजयंती (१९२१) ह्या नावाने त्यांच्या कविता संगृहीत केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यांशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे ह्यांनी संपादित केले आहे. गडकऱ्यांच्या लेखनसंकल्पांची त्यावरून कल्पना येते.
मृत्युसमयी ते विदर्भातील सावनेर ह्या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. भावबंधन ह्या नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गडकऱ्यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतींतून नाट्यात्मतेबरोबर ठिकठिकाणी काव्यात्मतेचा साक्षात्कार होतो आणि त्यांचे विनोदी लेखन उपहासापेक्षा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आढळते. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहेत. करूण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिति त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांची कल्पनाशक्ती उच्छृंखल आहे कलादृष्ट्या प्रस्तुताप्रस्तुताचा विवेक करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी तितकेसे नाही तिचा स्वाभाविक कल अतिशयोक्तीकडे आहे परंतु असे असूनही त्यांच्या सर्वच लेखनात वाचक-प्रेक्षकांच्या मनांची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य अवतरलेले आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म आहे. कल्पनेची झेप अशी, की तिच्या हाती अनेकदा लागतात ती मती गुंग करणारी विचारमौक्तिके. गडकऱ्यांचे यश ह्या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम भावबंधनातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा प्रेमसंन्यासमधील गोकुळ पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ह्या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत.
संदर्भ : १. अत्रे, प्र. के. संपा. अप्रकाशित गडकरी, मुंबई, १९६२.
२. कोल्हटकर, चिं. ग.राम गणेश गडकरी, मुंबई, १९५९.
३. खांडेकर, वि. स.गडकरी, व्यक्ति आणि वाङ्मय, पुणे,१९३२.
४. वाळिंबे, रा. शं.गडकऱ्यांचे अंतरंग, पुणे, १९५१.
५. सरदेशमुख, त्र्यं. वि.गडकऱ्यांची संसारनाटके, मुंबई, १९७०.
कुळकर्णी, वा. ल.
“