गटिफेरी : (कोकम कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज आणि द्विदलिकित) काही वनस्पतींच्या या कुलाचा समावेश ‘गटिफेरेलीझ’ या गणात केला आहे (हचिन्सन यांनीही या कुलाचा अंतर्भाव तसाच केला असला, तरी त्याला ‘क्लुसिएसी’ हे नाव दिले आहे). ⇨डायलेनिएसी, ⇨थीएसी आणि ⇨डिप्टेरोकार्पेसी  ही इतर प्रमुख कुले या गणातच आहेत शिवाय चार कमी महत्त्वाची अशी एकूण आठ कुले समाविष्ट केली जावी अशी आधुनिक विचारसरणी आहे. अरसमात्र, द्विलिंगी व अवकिंज पुष्पे, बहुसंध, क्वचित सुटी अशी अनेक केसरदले [→ फूल] आणि अंतराकोशिकी (पेशींच्या मधून विखुरलेल्या) स्त्रावकनलिका असलेली काष्ठमय क्षुपे (झुडपे) किंवा वृक्ष इ. लक्षणे या गणाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतात. त्याचा उगम ⇨रॅनेलीझ या प्रांरभिक गणातून झाला असावा (हचिन्सन यांच्या मते मॅग्नोलिएलीझ गणातून असावा). गटिफेरी कुलात एकूण ४६ वंश व सु. १,००० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांतप्रामुख्याने आढळतो आफ्रिकेत फार कमी पण अमेरिका व आशियात अधिक. भारतात सु. २५ वंश व २५० जाती आहेत. यांपैकी महाराष्ट्रात सु. पाच वंश व दहा जाती सामान्यतः आढळतात. या कुलातील बहुतेक वनस्पती सदापर्णी क्षुपे आणि वृक्ष असून थोड्या ⇨ ओषधी  आहेत. सालीवर खाच पाडल्यास आतून चिकट हिरवट वा पिवळट राळयुक्त डिंक किंवा बाष्पनशील (उडून जाणारा) तेलयुक्त राळ-डिंकमिश्रित चिकट द्राव पाझरतो व हवेने घनबिंदूंच्या रूपात चिकटून राहतो. त्यावरून गटिफेरी (गट = बिंदूप्रमाणे चिकट पदार्थ फेरोस = धारण करणे) हे लॅटिन नाव सार्थ वाटते. पाने साधी, संमुख (समोरासमोर), क्वचित एकांतरित (एकाआड एक), चिवट फुले द्विलिंगी क्वचित एकलिंगी, एकाकी (एकेकटी) किंवा फुलोऱ्यात असून कधी विभक्तलिंगी (एकलिंगी) असतात. संदले व प्रदले २–६, सुटी व परिहित केसरदले अनेक, बहुधा बहुसंघ, क्वचित सुटी, कधी काही वंध्य किंजदले ३–५, क्वचित कमी वा जास्त व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ, ३–५ कप्प्यांचा बीजके अधोमुख किंवा तिर्यङ्‌मुख, एक ते अनेक अशी प्रत्येक कप्प्यात असतात [→ फूल]. फळ बहुधा शुष्क बोंडाप्रमाणे तर कधी मांसल असते. बी अपुष्क, अनेकदा बीजोपांगयुक्त [→ फळ] गर्भ सरळ व मोठा. परागण (परागसिंचन) बहुधा कीटकांद्वारे होते. कोकम व त्याच्या वंशातील इतर जाती अनेक असल्याने त्याचे मराठी नाव या कुलास (कोकम कुल) दिलेले आढळते. गँबोज नावाचे रंगद्रव्य [→ कोकम (आमसूल)], उत्तम लाकूड [→ नागचाफा मॅमेॲपल उंडण सुरंगी इ.], फळे [→ मँगोस्टीन मॅमेॲपल] यांमुळे या कुलाला महत्त्व आहे.

महाजन, मु. का.