गटापर्चा : विषुववृत्ताच्या दक्षिणेस व उत्तरेस ६० पर्यंत आणि ९०० ते ११९० पूर्व रेखांश या टापूत, मुख्यत्वे बोर्निओ, सुमात्रा व मलाक्का द्वीपकल्प (मलेशिया) यांमध्ये सापडणाऱ्या पुष्कळ वनस्पतींपासून मिळणाऱ्या व बाष्पीभवन केलेल्या दुधाळ द्रवाला वा चिकाला गटापर्चा म्हणतात. सॅपोटेसी कुलातील पल्ला (पॅलॅक्वियम गटा) व पॅलॅक्वियम ऑब्लाँगिफोलिया या दोन वृक्षांपासून उत्तम मलायी गटापर्चा मिळतो. पॅलॅक्वियम वंशातील इतर जातींपासून मिळणारा गटापर्चा हलक्या प्रतीचा असतो. वरील वृक्षांच्या ⇨ मध्यत्वचेतील वृत्तचितीय (दंडगोलाकार) वाहिन्यांत किंवा कोशिकांत (पेशींमध्ये) चीक स्त्रवत असतो. तो किंचित करडा व दुधी असतो. तसेच तो पानांतही आढळतो. योग्य विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) वापरून तो पानांच्या चूर्णापासून मिळविता येतो. तथापि ही पद्धत आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. वृक्षाच्या सालीला खाचा पाडल्यास चीक बाहेर पडतो पण तो रबराच्या चिकासारखा वाहत राहत नाही. म्हणून मलायी लोक चीक गोळा करण्यासाठी वृक्ष तोडतात व फांद्या छाटून सालीमध्ये बऱ्याच ठिकाणी सु. २·५ सेंमी, रुंद खाचा पाडतात. अशा तऱ्हेने त्यांची एक दंडगोलाकार पन्हळ तयार होते. दोन खाचांतील अंतर ३० सेंमी. ठेवतात. चीक स्त्रवून ह्या पन्हळीत साचतो. तो गोळा करून, उघड्या भांड्यात घालून व जाळावर उकळून त्याचे गटापर्चात रूपांतर करतात. हे काम साधारणतः पावसाळ्यात करतात. कारण तेव्हा चीक भरपूर निघतो व तो जास्त पातळ असतो. चीक फारच घट्ट असेल तर, उकळण्यापूर्वी त्यात पाणी घालतात. पूर्ण वाढ झालेल्या वृक्षापासून ०·९–१·३ किग्रॅ. गटापर्चा मिळतो.
बाजारात मिळणाऱ्या गटापर्चाच्या करड्या खड्यांना लाल छटा असते. तो कठीण असून अप्रत्यास्थ (लवचिक नसलेला), नखाने ओरखडा उठेल इतपत मऊ व सामान्य तापमानास टणक असतो. वृक्षापासून मिळालेला ताजा गटापर्चा स्फटिकरूप (आल्फा) धारण करतो, परंतु एकदम थंड केल्यास तो भिन्न प्रकारच्या स्फटिकरूपात (बीटा) जातो. तो सु. ५६º से. ला वितळतो. बीटारूप अस्थिर असून थोड्याशा उष्णतेने त्याचे आल्फारूपात रूपांतर होते. सामान्य तापमानाला गटापर्चाचा सु. ६०% भाग स्फटिकी व उरलेला भाग चूर्णरूप असतो.
हायड्रोकार्बन गट हा गटापर्चाचा प्रमुख घटक असून त्याचे अनुभवसिद्ध सूत्र C5H8 आहे. त्याचा रेणुभार सु. ३०,००० आहे. त्याच्या रेणूत आयसोप्रीन एककांची दीर्घ शृंखला असते. रेणूमधील आयसोप्रीन एककांचे दोन भूमितीय विन्यास (मांडण्या) होऊ शकतात. गटापर्चामधील हा विन्यास विपक्षरूपी (विशिष्ट अणू अथवा अणुगट एका प्रतलाच्या विरूद्ध बाजूंना असलेला) तर रबरामधील समपक्षरूपी (विशिष्ट अणू वा अणुगट एका प्रतलाच्या एकाच बाजूस असलेला) असतो. रासायनिक दृष्टीने दोन्ही रूपे सारखीच आहेत. गटापर्चाची क्लोरिनाबरोबर विक्रिया होते. गंधकाच्या विक्रियेने त्याचे व्हल्कनीकरण (भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी करण्यात येणारी क्रिया) होऊन तो अनाकार्य (आकार न घेणारा) व अविद्राव्य (न विरघळणारा) बनतो. कार्बन डायसल्फाइड, क्लोरोफॉर्म आणि बेंझीन यांमध्ये तो विद्राव्य आहे. क्षारीय (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म असणाऱ्या, अल्कलाइन) विद्रावांची आणि विरल अम्लांची त्यावर विक्रिया होत नाही. उष्ण व संहत (विद्रावात जास्त प्रमाणात असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाने त्यापासून कार्बन मिळतो व नायट्रिक अम्लाच्या विक्रियेने त्याचे पूर्ण ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होते. पण हायड्रोफ्ल्युरिक अम्लाची त्यावर विक्रिया होत नाही. उघड्यावर ठेवला असता तो ऑक्सिजन शोषून घेतो आणि त्याचे ठिसूळ रेझीन बनते. ओझोनामुळेही त्यावर अशीच पण अत्यंत शीघ्र विक्रिया होते. ॲरोमॅटिक अमाइने किंवा फिनॉले यांसारखी प्रतिऑक्सिडीकारके [→ ऑक्सिडीभवन] वापरल्यास ह्या विनाशक विक्रिया मंदपणे होतात.
गटापर्चावर पाण्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. तो विद्युत् निरोधक (विद्युत प्रवाहास तीव्र विरोध करणारा) आणि लवचिक आहे. त्यामुळे समुद्राखालून टाकावयाच्या तारायंत्री केबलींसाठी संरक्षक आवरण म्हणून त्याचा फार उपयोग होतो. ह्याशिवाय गोल्फ चेंडूंची आवरणे, नळ्या, पादत्राणे ह्यांसारख्या विविध वस्तू बनविण्यासाठीही तो वापरतात. त्याच्या भारी किंमतीमुळे पॉलिएथिलीन, व्हिनिल रेझीन, नायलॉन ह्यांसारखे संश्लिष्ट (कृत्रिम रीत्या बनविलेले) पदार्थ हळूहळू त्याची जागा घेऊ लागले आहेत. उष्ण पाण्यात मऊ होणे व थंड पाण्यात पुन्हा कठीण होणे ह्या त्याच्या गुणधर्मांची चिनी आणि मलायी लोकांना पूर्वीपासून माहिती होती, परंतु त्यांनी ह्या गुणधर्मांचा उपयोग फक्त दागिने, काठ्या, चाकूच्या मुठी, चाबूक इत्यादींसाठी केलेला आढळतो.
पहा : पल्ला.
जमदाडे, ज. वि.