गजकर्ण : (रिंगवर्म). त्वचा आणि तिची उपांगे (केस, नखे वगैरे) या ठिकाणी विशिष्ट कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा) संसर्ग झाल्यामुळे होणाऱ्या रोगाला ‘गजकर्ण’ म्हणतात.
ट्रायकोफायटॉन (केशकवक), एपिडर्मोफायटॉन (अधिचर्मकवक) व मायक्रोस्पोरम (सूक्ष्मबीजुककवक) या तीन जातींच्या कवकांचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर वर्तुळाकार अथवा नागमोडी आकाराचे चट्टे उठतात. शरीराच्या विविध प्रकारांच्या कवकांचा संसर्ग होऊ शकतो. स्थानपरत्वे त्या विकारांना निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. उदा., डोक्यातील गजकर्णाच्या एका प्रकाराला खवडा, चेहऱ्यावरील गजकर्णाला श्मश्रुकवक वगैरे [→कवकसंसर्ग रोग]. कोणत्या जातीचा कवकसंसंर्ग आहे ते सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते व नंतर त्यावरून चिकित्सा ठरविता येते.
लक्षणे : त्वचेवर गोल आकाराचे उंचवटे दिसतात. त्यांवर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. त्या भागाला फार कंड सुटते. गजकर्ण बहुधा नेहमी ओल्या राहणाऱ्या त्वचेवर दिसतो. काखा, जांघा वगैरे भागांत त्याचे प्रमाण अधिक दिसते. केस ठिसूळ होऊन तुटतात. नखे जाड आणि ठिसूळ होतात. पायांच्या बोटांमधील बेचक्यांत कवकसंसर्ग झाला, तर तेथे इतर जंतूंचा संसर्ग झाल्यामुळे सूज येऊन तो भाग ओला राहतो, त्याला चिखली असे म्हणतात. इतरत्र गजकर्ण कोरडा असतो.
चिकित्सा : कपडे, फण्या, ब्रश वगैरे पदार्थ स्वच्छ न धुता वापरले, तर कवकसंसर्ग दुसऱ्या व्यक्तीत पसरतो म्हणून हे पदार्थ वापरण्यापूर्वी निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. कवकांची बीजुकावस्था (जननक्षम सूक्ष्म पेशींची अवस्था) पुष्कळ काळपर्यंत राहत असल्यामुळे संसर्गित कपडे उकळूनच वापरावे. जे जिन्नस उकळता येत नसतील त्यांचा नाश करावा.
सॅलिसिलिक अम्ल, बेंझॉइक अम्ल आणि रिसॉर्सिन या औषधींची मलमे गजकर्णावर गुणकारी आहेत. ग्रिझिओफलव्हीन, हॅमायसीन या पोटात घ्यावयाच्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोगही चांगला होतो.
अभ्यंकर, श. ज.
पशूंतील गजकर्ण : हा रोग बहुतेक प्राण्यांत होत असला, तरी विशेषेकरून लहान पिलांत जास्त आढळतो. घोडी, कुत्री, मांजरे व कोंबड्यांनाही हा रोग होतो. निरनिराळ्या प्राण्यांत भिन्न प्रकाराची कवके रोग निर्माण करतात. केशकवक खोलगट भागावरील त्वचेवर गोलाकार चट्टे निर्माण करते. हा विशेषतः गाईच्या वासरांत दिसून येतो. सूक्ष्मबीजुककवक कुत्री, मांजरे, ससे यांत विशेष आढळते.
रोग संसर्गजन्य असून ब्रश, खरारा, घोड्याचे जीन, फडकी, झूल, ब्लँकेटे इ. त्वचेवर वापरावयाच्या इतर वस्तूंमार्फत दूषित जनावरातून निरोगी जनावरात रोगप्रसार होतो. लहानशा जागेत जास्त वासरे असली म्हणजे रोग पसरतो. कुत्र्यामांजरांना काही वेळा रोगग्रस्त उंदीर, घुशी, ससे खाण्यामुळेही रोग संभवतो.
चिकित्सा : कवकाचा संपर्क न लागेल असे सर्व प्रतिबंधक उपाय योजतात. सॅलिसिलिक अम्ल, बेंझॉइक अम्ल व बोरीक अम्ल सम प्रमाणात मिश्रण करून त्याच्या मलमाचा नियमित उपयोग केल्याने रोग बरा होतो. ग्रिझिओफलव्हीन, हॅमायसीन वगैरे कवकनाशक प्रतिजैव पदार्थ गोळ्यांच्या स्वरूपात देतात.
मांजरे, घोडी व गुरे मनुष्यामध्ये रोगप्रसार करतात, इतर प्राण्यांच्या प्रकारांपासूनही रोगप्रसार संभवतो. अशा प्रकारचा रोगसंसर्ग अतिशय किचकट असून कधीकधी रोगावर उपचार होऊ शकत नाही.
गद्रे, य. त्र्यं.
“