कोठागुडम् : आंध्र प्रदेशाच्या खम्मम जिल्ह्यात, वरंगळच्या आग्नेयीस १२० किमी., सिंगरेणी कोळसाक्षेत्रातील शहर. लोकसंख्या ७५,५४२ (१९७०). दक्षिण रेल्वेच्या विजयवाडा – वरंगळ मार्गावरील दोर्णाकल प्रस्थानकाहून ५५ किमी. भद्राचलम्‌ रोड हे याला स्थानक आहे. १९२० नंतर या भागात चालू झालेल्या खाणींचे कार्यालय येलांडूहून १९४१ मध्ये येथे आणण्यात आले. येथील औष्णिक विद्युत्‌ केंद्रात १४० मेगॅवॉटची निर्मितियंत्रे १९६६-६८ मध्ये चालू झाली. त्यासाठी थंड पाणी किन्नरसानी  धरणातून घेण्यात येते. चौथ्या योजनेत यात आणखी वाढ होणार आहे. येथे खतकारखाना असून यंत्रसामग्री, तांदूळ, तेल इत्यादींचे उद्योग आहेत. खाणप्रशिक्षण संस्था व इतर अनेक शैक्षणिक सोई येथे आहेत.

ओक, शा. नि.