गंगोत्री–२ : हिंदूंचे उत्तर प्रदेशाच्या कुमाऊँ भागातील एक यात्रास्थान. हे टेहरी-गढवाल जिल्ह्यात टेहरीपासून ८० किमी. वर ३,१६७ मी. उंचीवर आहे. येथून १४ किमी. वर ६,६१४ मी.उंचीचे गंगोत्री शिखर व सु. २३० किमी. वर कैलास पर्वत आहे. अमरसिंग थप्पा या गुरखा सेनापतीने अठराव्या शतकात बांधलेले येथील गंगामंदिर भागीरथीच्या डाव्या तीरावर असून जवळच भैरवनाथ मंदिर व धर्मशाळाआहेत. मंदिरात गंगा, यमुना व सरस्वती यांच्या आणि भागीरथी व शंकराचार्य यांच्या मूर्ती आहेत. गंगामूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केल्याचे सांगतात. जवळच भागीरथी व केदारगंगा यांचा संगम आहे. सु. पाऊण किमी.वर खडक फोडून १०-१२ मी. उंचीवरून भागीरथीचा प्रवाह खालच्या गौरीकुंडातील शिवलिंगावर पडतो. नदीपात्रात ब्रह्मा, विष्णू, सूर्य इ. देवांची कुंडे आहेत. भगीरथाने जेथे तप केले व यात्रेकरू जेथे पिंडदान करतात, ती भगीरथशिला व शंकराने जेथे उभे राहून गंगेचा प्रवाह आपल्या मस्तकावर घेतला, ती रूद्रशिला येथे दाखवितात. अक्षयतृतीयेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत गंगोत्रीला यात्रेकरू येतात. येथून गंगेचे पाणी गडव्यांत बंद करून भारतात सर्वत्र तीर्थ म्हणून नेतात. कार्तिकी पौर्णिमेनंतर मंदिर हिमाच्छादित होत असल्यामुळे गंगामूर्ती घेऊन पुजारी २३ किमी.वरील मार्कंडेयक्षेत्री– मखव्यास– जातात. ते अक्षयतृतीयेस परत येतात.
गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान मानले जात असले, तरी खरे उगम स्थान येथून सु. २९ किमी. श्रीमुख पर्वतात गोमुख येथे आहे. तेथे ३० किमी. लांबीची व ३ किमी. रुंदीची गंगोत्री हिमनदी संपून गुहेसारख्या भागातून भागीरथीचा प्रवाह वाहू लागतो. तेथपर्यंतची वाट बरीच बिकट आहे.
कुमठेकर, ज. ब.
“