गंगोत्री –१ : (लॅ. स्याथोक्लाइन लायरॅटा कुल-कंपॉझिटी). ही नाजूक, वर्षायू (एक वर्ष जगणारी) व शोभिवंत ⇨ ओषधी ओलसर जमिनीत व नदीनाल्यांच्या काठी, ब्रह्मदेशात व भारतात बहुधा सर्वत्र आढळते. खोड उभे, ताठ, ०·३–०·६ मी. उंच, शाखित असून त्यावर उभ्या खोल रेषा वलव असते. पाने बिनदेठाची, २·५–१२ सेंमी. लांब, एकांतरित (एकाआड एक), सुगंधी, केसाळ, दंतुर व अल्प पिच्छाकृती-वीणाकृती (काहीशी पिसासारखी-विणेसारखी) असतात. पुष्पबंध-स्तबकांचे गुलुच्छ स्तबकात बाहेर स्त्री-पुष्पके व आत द्विलिंगी, लालसर जांभळी बिंब-पुष्पके नोव्हेंबर-मार्चमध्ये येतात [→ पुष्पबंध]. बाहेरची बहुधा फलनक्षम आणि आतली बहुतेक वंध्य (फलनक्षम नसलेली) पिच्छसंदले (फळाच्या देठावरील वरच्या बाजूला असणारी व प्रसारास मदत करणारी केसांची वा खवल्यांची वलये) नसतात कृत्स्नफले (शुष्क आपोआप न फुटणारी व एक बीची फळे) फार बारीक व लंबगोल [→ कंपॉझिटी] असतात. ही ओषधी बागेत ओलसर जागी लावल्यास चांगली वाढते व शोभा वाढविते.
पराडकर, सिंधूअ.