खोडकिडा : जी कीड वनस्पतीच्या खोडात राहून आतील भाग खाऊन नुकसान करते तिला खोडकिडा असे संबोधण्यात येते. या किडीच्या आळ्या वनस्पतींच्या मधल्या पोंग्यात शिरून आतील भाग खातात त्यामुळे पोंगे वाळू लागतात. या किडीच्या निरनिराळ्या जाती असून त्या भात, ज्वारी, मका, गहू, ऊस इ. पिकांवर आढळून येतात. या सर्व लेपिडॉप्टेरा गणातील असून काही किडी आंबा, पेरू, अंजीर, डाळिंब इ. पिकांच्या खोडात शिरून आतला भाग खातात परंतु, त्यांना ⇨ भिरूड  म्हणतात.

ट्रायपोरायझा इनसरटुलस  ही खोडकिडीची जाती फक्त भाताच्या पिकाला उपद्रव देते आणि जगातील भात पिकवणाऱ्या भारत, जपान, फिलिपीन्स अशा अनेक देशांत आढळते. हिच्या पतंगाचे पंख पिवळसर असून मादीच्या पुढील पंखांवर ठळक असा एकेक काळसर ठिपका असतो. अळी पिवळसर रंगाची असून डोके पिवळसर नारिंगी असते. पूर्ण वाढलेली अळी सु. २ सेंमी. लांब असते.

 कायलो झोनेलस  ही जाती मुख्यत्वेकरून ज्वारी व मका या पिकांवर आढळते. तथापि इतर तृणधान्यांची पिके, ऊस, भात, जॉन्सन गवत यांवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड अफगाणिस्तानापासून इंडोनेशियापर्यंत, पूर्वेकडे लेबानन आणि दक्षिणेकडे श्रीलंका व पूर्व आफ्रिकेतही आढळून येते. पतंग मध्यम आकाराचे असून पुढील पंख फिकट गवती रंगाचे असतात, तर मागील पंख पांढरे असतात. अळी मळकट पांढरी असून शरीरावर काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी सु. २ सेंमी. लांब असते.

सेसॅमिया इन्फेरन्स  ज्याला गुलाबी खोडकिडा म्हणतात त्याचा उपद्रव गहू, मका आणि ऊस या पिकांना होतो. पतंग आकाराने क्रायलोच्या पतंगांपेक्षा मोठे असतात. अळी गुलाबी रंगाची आणि साधारणपणे ३ सेंमी. लांब असते.

 कायलोट्रिया इन्फ्युस्काटेलस  ही उसावरील कीड असून ती भारताखेरीज ब्रह्मदेश, इंडोनेशिया, फॉर्मोसा, फिलिपीन्स आदी प्रदेशांतही आढळते. पतंग पांढुरके असतात. अळी मळकट रंगाची असून तिच्या अंगावर लांबट तपकिरी पट्टे असतात. पूर्ण वाढलेली अळी सु. २·५ सेंमी. लांब असते.

 साधारणपणे सर्व खोडकिडींचे मादी पतंग पानांच्या पाठीमागे पुंजक्याने अंडी घालतात, परंतु गुलाबी खोडकिडीचा मादी पतंग जमिनीच्या पृष्ठभागावर अंडी घालतो. अंडी साधारणपणे एका आठवड्यात उबतात व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातीला थोडा वेळ पानांवर फिरून नंतर खोडात शिरतात. खोडातील भाग पोखरून खाल्ल्याने मधला पोंगा जळून जातो. भातावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव लोंब्या आल्यावर झाल्यास त्यांत दाणे भरत नाहीत. त्या पळींज (पोचट) बनतात. साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांत अळीची पूर्ण वाढ होऊन खोडातच ती कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ ते १० दिवस असते. नंतर त्यातून पतंग बाहेर पडतो. हवामानानुसार खोडकिडीच्या हंगामात अनेक पिढ्या होतात. काही खोडकिडीच्या अळ्या धसकटात पुढील हंगामापर्यंत सुप्तावस्थेत राहतात.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी पीक काढल्यानंतर धसकटे जमा करून जाळून टाकल्यास सुप्तावस्थेतील अळ्यांचा नाश होतो. तसेच पानांवरील अंड्यांचे पुंजके जमा करून नष्ट करतात. मधला पोंगा जळालेली रोपे कापून आतील अळ्यांचा नाश करतात. 

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एंड्रीन, फॉस्फोमिडॉन किंवा एंडोसल्फॉन यांची फवारणी करतात. ज्वारी, ऊस, गहू, मका या पिकांवरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी २ टक्के दाणेदार एंड्रीन पोंग्यांत घालतात. 

तलगेरी, ग. मं.