कोकम : (रातांबा, कोकंब गु., हिं. कोकम क. भुर्जिन हळ्ळी, मुरगळ्ळे सं. तिंतिडिका, आम्लबीज, अत्यमला इं. कोकम बटर ट्री, वाइल्ड मँगोस्टीन, मँगोस्टीन ऑइल ट्री लॅ. गार्सीनिया इंडिका कुल-गटिफेरी). या सदापर्णी लहान वृक्षाचे मूलस्थान भारतात कोकण, कारवार, मलबार व गोवा असून याची लागवड भारताप्रमाणे चीन, मलाया, जावा व सिंगापूर येथे मोठ्या प्रमाणावर आहे. गार्सीनिया हे वंशवाचक लॅटिन नाव गार्सीआ द ओर्ता या पोर्तुगीज वैद्यांच्या नावावरून आलेले आहे. खोड ८–१२ मी. सरळ उंच वाढते. साल पातळ, बाहेरून काळसर व भेगाळ पण आतून पिवळट असते. फांद्या थोड्याफार खाली झुकलेल्या असतात. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. पाने कोवळेपणी लालसर व पुढे हिरवी गर्द होतात ती साधी, लंबगोल-भाल्यासारखी, चिवट, अखंड व समोरासमोर असतात. फुले कक्षास्थ (पानांच्या बगलेत येणारी), एकाकी अगर गुच्छाने नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये येतात. ती चतुर्भागी, एकलिंगी, नियमित, लहान, क्वचित द्विलिंगी परंतु सर्व एकाच झाडावर असतात. पुं-पुष्पे आणि स्त्री-पुष्पे स्वतंत्र फुलोऱ्यात येतात. केसरदले अनेक पण एका दांड्यावर स्त्री-पुष्पात अनेक वंध्य केसरदलांचे चार गट असतात. किंजपुटात चार ते आठ कप्पे [→ फूल] जांभळट लाल मृदुफळावर खोलगट रेषा नसतात व त्याचा व्यास २·५ सेंमी. पेक्षा अधिक असतो बिया पाच ते आठ चपट्या व मगजात (गरात) विखुरलेल्या असतात. कच्ची फळे आंबट, वातशामक व आवनाशक असतात. फळे एप्रिल-मे मध्ये पिकतात. फळांतील रस रंगबंधक असतो. त्याचे सरबतही करतात. पक्व फळ शामक, शीतकर, पित्तरस उत्पन्न करणारे आणि स्कर्व्हीनाशक (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे निर्माण होणारी स्थिती नाहीशी करणारे) असते. लाकूड कठीण व बळकट असले तरी लवकर किडते. या झाडाला भरपूर पावसाच्या उष्ण दमट प्रदेशातील हवामान व चांगल्या निचऱ्याची मध्यम प्रतीची ते मुरमाड जमीन लागते. याची लागवड नियोजित जागी बिया लावून करतात.
आमसूल व तेल : दहा ते बारा वर्षांनी झाडाला फुले येऊन फळे धरतात. फूल आल्यापासून सहा महिन्यांत फळ पक्व होते. पक्व फळांच्या सालीपासून ‘आमसूल’ बनवितात. बियांपासून तेल काढतात. फळे पिकू लागल्यावर झाडावरून काढून घेऊन तीन-चार दिवस सावलीत ठेवतात. तेथे ती पूर्ण पिकून मऊ व बिलबिलीत होतात. तेव्हा त्यांच्या साली काढून त्या उन्हात वाळवितात. बियांसहित गर बांबूच्या टोपल्यांत भरून त्या टोपल्या मोठ्या लाकडी थाळीत ठेवतात. टोपलीतून रस गळणे बंद होत आल्यावर टोपलीतील गर हाताने कुसकरून सर्व रस थाळीत गोळा करतात. सुकविलेल्या फळांच्या साली या रसात बुडवून पुन्हा वाळवितात. असे तीन-चार वेळा केल्यानंतर त्या सालींची आमसुले तयार होतात. ती नंतर बांबूच्या टोपल्यांतून साठवून ठेवतात. आमसुलात अदमासे १० टक्के मॅलिक अम्ल व थोडे टार्टारिक अम्ल असते. आमसूल आमटीमध्ये आंबट चवीसाठी वापरतात.
गरातील रस काढून झाल्यावर त्यातील बिया गोळा करतात. त्या साफ करून त्यांच्यावर राख टाकून उन्हात चांगल्या वाळवून साठवून ठेवतात. टरफलासह गळीत केल्यास त्यांच्यामधून २३ ते २६ टक्के तेल मिळते. टरफले काढून मगजाचे गळीत केल्यास ४६ टक्के तेल मिळते. त्याला ‘कोकम तेल’ म्हणतात. तेल काढण्याचे काम बहुतेक कुटीरोद्योग म्हणूनच केले जाते. बियांतील मगज भरडून तो पाण्यात घालून उकळवतात. भरड्यातील सर्व तेल त्यातून मोकळे होऊन पाण्यावर तरंगते. ते वरच्यावर दुसऱ्या भांड्यात काढून घेतात. त्यात बहुधा मगजाचे कण राहतात. या तेलाचा रंग फिकट करडा किंवा पिवळसर असतो. ते वंगणासारखे गुळगुळीत व चवीला किंचित सौम्य असते. शुद्ध व वासरहित केलेले तेल रंगाने पांढरे आणि उत्तम प्रतीच्या हायड्रोजनीकृत (हायड्रोजनाचा समावेश केलेल्या) तेलासारखे (‘वनस्पतीसारखे’) दिसते.
गार्सीनियाच्या इतर जातींतील बियांमधील तेलाप्रमाणेच कोकम तेलात स्टिअरिक आणि ओलेइक अम्ले पुष्कळ प्रमाणात असतात. तेलाचा द्रवांक ४०°—४३° से. असतो. हे तेल इतर स्निग्ध पदार्थ मिसळून मिठाईच्या धंद्यात लोण्याऐवजी वापरता येते. नव्या संशोधन पद्धतीने या तेलामधून ४५ टक्केपर्यंत स्टिअरिक अम्ल मिळू शकते. हे तेल अंडाकृती गोळे किंवा वड्यांच्या स्वरूपात बाजारात विकले जाते. ते तुपात भेसळ करण्याकरिता किंवा मेणबत्त्या करण्यासाठी वापरतात. ते पौष्टिक, जळजळशामक व स्तंभक (आकुंचन करणारे) असते. ते मलम, गुदवर्ती आणि इतर औषधी स्वरूपांमध्ये वापरतात. क्षतांवर, ओठावरील आणि हातापायाच्या कातडीवर पडलेल्या भेगांवर ते वापरतात. हे तेल कफक्षय, फुप्फुस रोग व गंडमाळा यांवर १५-२० मिलि. दिले तर कॉडलिव्हर ऑइलप्रमाणे परिणामकारक असते ते स्वस्तही असते. अतिसार व श्लेष्मयुक्त (बुळबुळीत पदार्थयुक्त) हगवणीत इतर औषधींबरोबर अभ्यंजन अनुपान म्हणून ४-७ मिलि. पर्यंत घेणे हा मुरड्याची तिडीक थांबविण्याचा स्वस्त उपाय आहे. तेलातील स्टिअरिक अम्लाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात उदा., स्नोमध्ये करतात.
महाजन, मु. का. चौधरी, रा. मो.
“