पेटारी : (हिं. खमारा, गंभार, पिंडारा, टुमरी; क. कडू कांगे, कुंबला; सं. पिंडारा, कुरंग; लॅ. ट्रेविया न्यूडिफ्लोरा ; कुल-यूफोर्बिएसी). हा एक सु. १८—२१ मी. उंचीचा पानझडी व विभक्तलिंगी वृक्ष असून त्याचा प्रसार भारतात कोकण व उ. कारवारातील गर्द जंगलात, नाले व दलदलीच्या भागात विशेष आहे शिवाय कुमाऊँ ते पूर्वेस आसाम आणि दक्षिणेस श्रीलंका, मलेशिया, जावा, सुमात्रा इ. प्रदेशांत आढळतो. साल गुळगुळीत व करडी; कोवळे भाग लोमश; पाने [शिवण व पारोसा पिंपळ यांच्या पानांसारखी; → पिंपळ; शिवण] साधी, संमुख (समोरासमोर) व हृदयाकृती; फुले एकलिंगी व भिन्न झाडांवर असतात; पाकळ्या नसतात. पुं-पुष्पे पिवळट व प्रत्येक लोंबत्या मंजरीवर १—४ च्या झुबक्यात असतात संदले ३—४ व केसरदले अनेक स्त्री-पुष्पे हिरवट, एकेकटी किंवा २-३ एकत्र असून डिसेंबर–मार्चमध्ये येतात किंजपुटात २—५ कप्पे व प्रत्येक कप्प्यात एक बीजक असते [→ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे गोलसर (२.५—३.०८ सेंमी. व्यास) व करडी असून ती पावसाळ्यात येतात आणि लहान लिंबाएवढी व खाद्य असतात. बिया सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) व गर्द पिंगट असतात.
लाकूड पांढरे, मऊ, हलके असते पण कीटक व कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) यांपासून सुरक्षित नसते. शेतीची अवजारे, ढोल, कातीव व कोरीव कामे, आगकाड्या, आगपेट्या इत्यादींकरिता उपयुक्त असून प्लायवुडकरिता उत्तम असते. ही वनस्पती शीतक (थंडावा देणारी), शक्तिवर्धक, संसर्गरक्षक व पित्तविकारनाशक आहे; ती सूज व कफ यांचा नाश करते मुळांचा काढा वायुनाशी असून संधिवातावर मुळांचा बाह्यलेप देतात. खोडाच्या सालीत कीटोन, टेट्रोझेरान इ. द्रव्ये असतात.
पहा : यूफोर्बिएसी.
पटवर्धन, शां. द.