पेचोरा : यूरोपीय रशियाच्या ईशान्य भागातून वाहणारी नदी. लांबी १,८०९ किमी., जलनाहनक्षेत्र ३,२२,००० चौ.किमी. ही नदी उत्तर उरल पर्वताच्या पश्चिमेकडील कॉयप शिखराजवळ उगम पावून काही अंतर खोल व अरुंद दरीमधून दक्षिणेस वाहते. पुढे ती उत्तरेस, नंतर पश्चिमेस व पुन्हा उत्तरेस वाहत जाऊन बॅरेंट्स समुद्राच्या पेचोरा उपसागराला जाऊन मिळते. पश्चिम व उत्तरवाहिनी होताना घेतलेल्या दोन मोठ्या वळणांमुळे तिच्या पात्राचा आकार इंग्रजी एस् अक्षरासारखा दिसतो. तिच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश असून तेथील आखात पेचोरा या स्थानिक नावाने ओळखले जाते. पश्चिमेकडील ट्यीमान पर्वत व पूर्वेकडील उरल पर्वत यांदरम्यानचा या नदीखोऱ्याचा भाग जवळजवळ सपाट व दलदलयुक्त असून तेथे हिमवर्षाव होत असतो. या नदीला ईझ्मा, त्सील्यम, सूला या नद्या उजवीकडून व ईल्यच, श्चुगॉर, ऊसा या नद्या डावीकडून येऊन मिळतात. नोव्हेंबर ते मे यांदरम्यान तिचे बरेचसे पात्र गोठलेले असते. वसंत ऋतूत बर्फ वितळू लागल्यानंतर तिच्यातून जलवाहतुकीस सुरुवात होते. उन्हाळ्यात मुख्यत: लाकूड, कोळसा, केसाळ कातडी, मासे, गहू व काही उत्पादित वस्तू यांची वाहतूक केली जाते. तथापि मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुखाकडील बर्फ पूर्णपणे वितळलेले नसते. नदीखोऱ्याच्या वरच्या भागात सूचिपर्णी अरण्ये असून, मुखाकडे ओसाड टंड्रा प्रदेश आहे. दक्षिण भागात मासेमारी व लाकूडतोड करणाऱ्या लोकांच्या वसाहती आहेत. उत्तर भागातील वस्ती विरळ असून, तेथे सॅमॉइड या अर्धभटक्या जमातीचे लोक अधिक प्रमाणात आढळतात. जून ते ऑगस्ट यांदरम्यान ते सील व सॅमन माशांच्या शिकारीसाठी उत्तरेकडील पेचोरा आखाताकडे वळतात. या नदीच्या खोऱ्यात कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे सापडले असून, त्यांच्या उत्पादनासाठी त्या भागात लोहमार्ग सुरू करण्यात आले आहेत. पेचोरा व नार्यान मार ही या नदीवरील प्रमुख बंदरे होत.
खांडवे, म. अ.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..