पेक्टोलाइट : (ऑस्मेलाइट). खनिज. स्फटिक त्रिनताक्ष [→स्फटिकविज्ञान ], लांब, बहुधा सुईसारख्या स्फटिकांचे पुंजके आढळतात व ते कधीकधी कंगव्यासारखे दिसतात, तर कधीकधी स्फटिकांची अरीय मांडणी झालेली असल्याने खनिज तंतुमय वाटते. हे संहत रूपातही आढळते.⇨पाटन : (001) व (100) उत्कृष्ट. वि. गु. २.७-२.८ कठिनता ५. चमक काचेसारखी ते रेशमासरखी. रंगहीन पांढरे वा करडे. रा. सं. Ca2NaH (SiO3)3. हे वुलस्टनाइटाशी समाकृतिक (सारखे स्फटिकाकार असलेले) व हायड्रोक्लोरिक अम्लात विद्राव्य (विरघळणारे) आहे. हे सहज बदलते व त्यापासून⇨संगजिरे बनते. हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेले) खनिज असून बेसाल्टातील पोकळ्यांमध्ये प्रेहनाइट, ॲपोफिलाइट, झिओलाइटे व कॅल्साइटाच्या जोडीने आढळते. हे स्कॉटलंड, वेल्स इ. भागांत आढळते. संहतरूपात आढळत असल्याने घट्ट अर्थाच्या ग्रीक शब्दावरून एफ्. फोन कोबेल (१८०३-८२) यांनी पेक्टोलाइट हे नाव याला दिले (१८२८). याच्या विशिष्ट वासावरून याला ऑस्मेलाइट हे नावही देण्यात आले आहे.