पेंग्विन : या न उडणाऱ्या समुद्री पक्ष्यांचा समावेश स्फेनिसिडी पक्षिकुलात केला आहे. दक्षिण ध्रुवीय आणि उपदक्षिण ध्रुवीय प्रदेशात राहणारे हे पक्षी असून गालॅपागस बेटांपर्यंत ते आढळतात. समुद्र आणि समुद्रकिनारा ही पेंग्विनची निवासस्थाने होत. स्फेनिसिडी कुलात ६ वंश आणि एकूण १७ जाती आहेत. यांपैकी अप्टेनोडायटिस या वंशातील दोन जाती ‘किंग पेंग्विन’ व ‘एंपरर पेंग्विन’ सुप्रसिद्ध आहेत. एंपरर पेंग्विन सर्वांत मोठा आहे.
पेंग्विन सु. ४०—१२० सेंमी. उंच असतात. सगळे शरीर खवल्यांसारख्या दिसणाऱ्या पिसांनी झाकलेले असते. बहुतेक सगळ्या जातींमध्ये छाती व पोट पांढरे किंवा पिवळसर आणि पाठ काळी अथवा निळसर असते. लांब, बारीक चोचीपासून तो कमीजास्त प्रमाणात खाली वाकलेल्या आखूड व भक्कम चोचीपर्यंत, चोचींचे सगळे प्रकार आढळतात. पाय आखूड व जाड असून शरीराच्या अगदी मागच्या बाजूला असतात. पुढची तीन बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात. शेपटी आखूड व लहान ताठ पिसांची असते. पंखांचा ऱ्हास होऊन त्यांचे अरुंद लांबट पण मजबूत ‘पक्ष’ बनलेले असतात हे दुमडता येत नाहीत यांच्यावरही खवल्यांसारखी पिसे असतात. निरनिराळ्या जातींमध्ये डोके व मान यांच्या पिसाऱ्यात फरक असतो. काहींच्या माथ्याच्या दोन्ही बाजूंना पिसांचे सैल तुरे असतात.
पंखांचा वल्ह्यासारखा उपयोग करून पेंग्विन वेगाने पोहतो. तो पाण्याखालून पोहतो व मधूनमधून श्वास घेण्याकरिता पाण्याबाहेर डोके काढतो. पाण्यातून बाहेर कित्येक मीटर लांब तो उडी घेऊ शकतो.जमिनीवर तो ताठ उभा राहतो. काही जातींचे पेंग्विन अतिशय चपळाईने धावू शकतात; पण इतर अडखळत किंवा डुलत चालतात.
मासे, माखली आणि झिंग्यासारखे क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी यांवर ते उपजीविका करतात. सगळ्या जातींचे पेंग्विन थव्याने राहणारे आहेत. यांचा आवाज मोठा व कर्कश असतो.
विणीच्या हंगामात हजारो पेंग्विन एखाद्या सोयीस्कर ठिकाणी वसाहत करतात व माद्या या ठिकाणीच अंडी घालतात. काही जातींच्या माद्या दोन तर काही जातींच्या एकच अंडे घालतात. सामान्यत: अंडी उघड्या जमिनीवरच घातलेली असतात. एकच अंडे घालणाऱ्या माद्या ते पावले आणि त्यांच्या जवळचा पोटाचा भाग यांच्या मध्ये दाबून धरून उबवितात. अंड्यातून बाहेर पडल्यावर पिल्लू मोठे होईपर्यंत याच जागी पोटाला चिकटून राहते. पिलाच्या अंगावर काळ्या मऊ पिसांचे दाट आवरण असते.
पेंग्विन दीर्घायू असून नरमादीचा जोडा जन्मभर टिकतो. नर व मादी आळीपाळीने अंडी उबवितात. अंडी उबविण्याच्या काळात नर व मादी दीर्घकाळ निराहार राहतात. एंपरर पेंग्विन तीन महिने उपास करतो.
कर्वे, ज. नी