पृथ्वीचे वय : निरनिराळ्या देशांतील प्राचीन दंतकथांत, पुराणांत किंवा इतर धार्मिक ग्रंथांत पृथ्वी केव्हा निर्माण झाली याविषयी उल्लेख आढळतात. हिंदू पंचांगात पृथ्वी निर्माण हेऊन सहा मन्वंतरे व आता चालू असलेल्या सातव्या मन्वंतराची सत्तावीस महायुगे म्हणजे एकूण जवळजवळ १,९७,२९,४९,०६० वर्षाचा काल उलटून गेलेला आहे. खाल्डियातील धर्मगुरूंच्या कल्पनेनुसार पृथ्वीचा जन्म सु. वीस लक्ष वर्षांपूर्वी, पारशी धर्मप्रर्वतक जरथुश्त्र (झरथुष्ट्र) यांच्या मते तो बारा हजार वर्षांपूर्वी व आयर्लंडातील आर्चबिशप अशर यांनी हिब्रू कालगणनेनुसार केलेल्या हिशेबाप्रमाणे तो ख्रिस्तपूर्व ४००४ या वर्षी झाला. आधुनिक शास्त्रांची थोडीफार प्रगती होऊन पृथ्वीचे सर्वसामान्य स्वरूप तिचे सूर्यकुलातील स्थान ही कळून येईपर्यंत पृथ्वीचा शास्त्रशुद्ध रीतीने विचार करण्यास अनुकूल अशी परिस्थिती व आवश्यक ती साधने उपलब्ध नव्हती व पृथ्वीच्या वयाविषयीच्या वर उल्लेख केलेल्या किंवा इतर कल्पनांना प्रत्यक्ष आधार नसे. आधुनिक वैज्ञानिक पद्धती वापरून पृथ्वीच्या वयाविषयीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न प्रथम एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. अतिदीर्घ काल व अखंड किंवा थांबून थांबून होणाऱ्या काही प्रक्रिया पृथ्वीवर घडून येत असतात त्यांचा वेग मोजून पृथ्वीचे वय ठरविणे, असे या प्रयत्नांचे स्वरूप होते.

भूभौतिक पद्धती : वितळलेल्या स्थितीत असलेले तप्त पदार्थ निवून व घनीभूत होऊन पृथ्वी तयार झालेली आहे असे गृहीत धरून, पृथ्वीचे वय ठरविण्याचा प्रयत्न विल्यम टॉमस केल्व्हिन (१८२४ – १९०७) या भूभौतिकीविदांनी केला. जो जो खोल जावे जो जो खोल खाणीतील व विहिरीतील खडकांचे तापमान वाढत गेलेले आढळते. यावरून पृथ्वीच्या अंतर्भागाकडून तिच्या पृष्ठाकडे उष्णता येत असते व या गोष्टीवरून पृथ्वी निवत असते, असे दिसून येते. खडकांच्या उष्णता संवाहनाचे व पृथ्वीच्या अंतर्भागाकडून तिच्या पृष्ठभागी येणाऱ्या उष्णतेचे मोजमाप केल्व्हिन यांनी केले आणि घनीभवन होऊन पृथ्वी प्रथम निर्मीण झाली तेव्हापासून ती निवून पृथ्वीच्या पृष्ठाजवळच्या खडकांचे तापमान आजच्यासारखे होण्याला किमान दोन ते चार कोटी वर्षे पुरे व्हावीत, असा निष्कर्ष त्यांनी अखेरीस १८९७ मध्ये काढला केल्व्हिन यांनी ठरवलेल्या वयापेक्षा पृथ्वीचे वय बरेच अधिक असले पाहिजे, असे त्या कालातील आर्चिबॉल्ड गायीकी (गीकी) सारख्या प्रमुख वैज्ञानिकांचे मत होते परंतु त्याकाळी उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे केल्व्हिन यांच्या विचारसरणीत किंवा गणितात दोष दाखविता येत नव्हता.

इ. स. १८९६ साली किरणोत्सर्गाचा (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याच्या गुणधर्माचा) शोध लागला होता पण किरणोत्सर्गी द्रव्यांच्या पृथ्वीतील वाटणीची पुरेशी माहिती तेव्हा झालेली नव्हती. पृथ्वीच्या कवचात सामान्यतः आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या खडकांत किरणोत्सर्गी द्रव्ये असतात, असा शोध पुढे १९०६ साली आर्. जे. स्ट्रट (लॉर्ड रॅली) यांनी लावला. तेव्हा केल्व्हिन यांच्या पद्धतीतील दोष कळून आला. पृथ्वी ही केवळ निवणारी वस्तू नसून तिच्यातील किरणोत्सर्गी द्रव्यांमुळे नर्माण होणाऱ्या उष्णतेची भर तिच्या मूळच्या उष्णतेत पडत असते, हे कळून आल्यावर केल्व्हिन यांच्या पद्धतीचा पायाच नाहीसा झाला व त्यांच्या हिशेबापेक्षा पृथ्वीचे वय बरेच अधिक असले पाहिजे, हे कळून आले.

भूवैज्ञानिक पद्धती : (१) जमिनीच्या खडकांचा चुरा होणे, तो समुद्रात वाहून नेला जाणे आणि तो समुद्राच्या तळाशी साचून गाळाचे खडक तयार होणे या क्रिया अतिदीर्घ काळ होत आलेल्या आहेत. गाळ साचण्याचा वेग कळला, तर पूर्वीच्या कल्पांत तयार झालेले जे गाळाचे खडक आपणास दिसतात तेवढ्या जाडीचे खडक तयार होण्यास किती कालावधी लागला असेल, हे त्रैराशिकाने ठरविता येईल. काही प्रमुख क्षेत्रांत पाहणी करून मिळालेल्या गाळ साचण्याच्या वेगावरून पूर्वीच्या सर्व कल्पांतील मिळून गाळाचे खडक साचण्याला सु. पंचवीस कोटी वर्षे लागली असावीत, हिशेब करण्यात आलेला आहे.

(२) समुद्राचे पाणी वाफ होऊन हवेत जाणे, त्याचे ढग होणे, ढगांपासून पाऊस पडणे, पावसामुळे नद्या निर्माण होऊन त्या पुन्हा समुद्रास मिळणे या क्रिया दीर्घकाल होत आलेल्या आहेत. समुद्राच्या पाण्याची वाफ होताना शुद्ध पाणी निघून जाते, लावणे मागे राहतात पण समुद्रात शिरणाऱ्या पाण्यात जमिनीच्या खडकांपासून मिळालेल्या लवणांचा अंश असते. त्याची भर पडत असल्यामुळे समुद्राची लवणता सतत वाढच असते. प्रमुख नद्यांच्या पाण्याचे परीक्षण करून समुद्रात दर वर्षी किती मिठाची भर पडते याचे, तसेच आजच्या सागरात पाण्यात एकूण किती मीठ आहे याचे गणित करण्यात आलेले आहे. प्रारंभी सागरांचे पाणी शुद्ध, लवणहीन होते असे गृहीत धरून त्यांच्यातील मिठाचे मान आजच्या इतके होण्याला तेहेतीस कोटी वर्षे लागली असावीत, असा हिशेब जॉन जॉली यांनी केलेला आहे (१८९९).

वय काढण्याच्या वरील दोन्ही पद्धतींत अनेक दोष आहेत. गाळ साचण्याचा वेग सर्वत्र सारखा नसतो. पूर्वीच्या काळी पृथ्वीच्या भौगोलिक स्वरूपात फेरफार झालेले आहेत. समुद्रात शिरणारे पाणी किंवा गाळ याचे मान व गाळ साचण्याचा वेग ही वेळोवेळी बदलली असली पाहिजेत. पूर्वीच्या सर्व कल्पांतील खडक मापमासाठी आपणास उपलब्ध झालेले असतील असे नाही. शिवाय सुरूवातीस सागराचे पाणी शुद्ध होते असे मानण्याला पुरावा नाही. म्हणून वरील पद्धती अत्यंत मोघम ठरल्या आहेत.

किरणोत्सर्गमापन पद्धती : एखाद्या खडकात असलेल्या किरणोत्सर्गी खनिजांच्या विघटनाचे मापन करून त्याचे अचूक वय काढण्याच्या पद्धती विसाव्या शतकात उपलब्ध झाल्या आहेत [-&gt खडकांचे वय]. या पद्धतींनी वय काढलेल्या खडकांपैकी सर्वांत जुन्या खडकाचे वय साडेतीन अब्ज वर्षांपेक्षा किंचित अधिक भरते. पृथ्वीचे वय निदान तितके किंवा त्याहुन अधिक असावे. ते सु. साडेचार अब्ज वर्षे (सु. ४,५०,००,००,०००) असल्याचे दिसून आले आहे.

विश्वोत्पत्तिशास्त्राच्या तत्त्वावर आधारलेल्या पद्धती : या पद्धतींनी अप्रत्यक्ष रीत्या पृथ्वीचे वय स्थूलमानाने कळते पण त्यांच्यामुळे मिळणाऱ्या फलांनी किरणोत्सर्गमापनाने काढलेल्या निष्कर्षास पुष्टी मिळते. यातील मुख्य पद्धती पुढील होत : (१) बुधाच्या कक्षेची विमध्यता (विकेंद्रता) आणि (२) भरती-ओहोटीमुळे सागराच्या घर्षणाचा पृथ्वीच्या गतीवर आणि त्यामुळे पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतरावर होणारा परिणाम. या पद्धतींनी पृथ्वीचे वय तीन ते चार अब्ज वर्ष इतके ठरते. (३) अशनींचे वय : पृथ्वीवर प्रत्यही लक्षावधी उल्का व अशनी पडत त्यांच्यात असणाऱ्या U235 व U238 यांच्या विघटनाने (क्षयाने) निर्माण Pb207 व Pb206 या शिशाच्या समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) मूळच्या Pb204 या शिशाच्या समस्थानिकाशी असणारे प्रमाण मोजून त्यावरून अशनींचे वय काढतात. हे वयही ४.६ अब्ज वर्षे येते. पृथ्वीच्या बाह्य वातावरणातून येणारे अशनी पृथ्वीसारख्याच एखाद्या भूतपूर्व ग्रहाचे फुटलेले तुकडे आहेत, असे मानले जाते. त्या ग्रहाची व पृथ्वीची उत्पत्ती एकाच वेळी झाली असा निष्कर्ष यावरून निघतो व पृथ्वीच्या ४.६ अब्ज वर्षे या वयाला पुष्टी मिळते.

पृथ्वीचे महत्तम वय : विश्वोत्पत्तिशास्त्रानुसार मूलद्रव्यांची निर्मिती व त्यांचे निरनिराळ्या कालातील बदलणारे परस्पर प्रमाण यांच्या अभ्यासातून पृथ्वीचे जास्तीत जास्त शक्य असणारे वय ठरविता येते. सध्या मान्य झालेल्या सिद्धांतानुसार [-&gt सूर्यकल] सूर्य आणि पृथ्वीची उत्पत्ती एक मोठ्या ताऱ्याचा स्फोट होऊन सर्वदूर पसरलेल्या धूलिकणांच्या एकत्रीकरणाने झालेली आहे. ताऱ्याचा स्फोट होताना त्याच्यातील U235 आणि U238 यांचे परस्पर प्रमाण १.६४:१ असे होते. U235 चे किरणोत्सर्गी विघटन U238 पेक्षा जलद वेगाने घडून येत असल्यामुळे U235 चा ऱ्हास होऊन हे प्रमाण सतत कमी होत राहिले आहे. सध्या U235/U238 हे प्रमाण ०.००७ आहे. या माहितीवरून मुळात हे प्रमाण १.६४:१ असण्याचा काळ गणिताने काढला, तो ६.६ अब्ज वर्षे आला आहे. याचा अर्थ पृथ्वी आणि सूर्यकुल यांचे वय ६.६ अब्ज वर्षांपेक्षा जास्त असू शकणार नाही.

पहा : पृथ्वी.

संदर्भ : 1. Holmes, A. Principles of Physical Geology, London, 1965.

2. Russell, Richard D. Farquhar, R. M. Lead Isotopes in Geology, New York, 1960.

सोवनी, प्र.वि.