पूर्वा भाद्रपदा : भारतीय नक्षत्रमालिकेतील पंचविसावे नक्षत्र. ⇨उच्चैःश्रवा (पेगॅसस) या तारकासमूहातील ‘पेगॅसी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या चौकोनाच्या पश्चिम बाजूचे आल्फा पेगॅसी [मार् कॅब विषुवांश २३ ता. २ मि. १० से., क्रांती – १४° ५५’ ३०.४ आणि प्रत २.५७ ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत] व दुसरा बीटा पेगॅसी (शिआत विषुवांश २३ ता. १ मि. १४.९ से., क्रांती + २७° ४८’ १”.५, प्रत २.६१) असे दोन तारे मिळून पूर्वाभाद्रपदा नक्षत्र होते. यांपैकी आल्फा हा पूर्वाभाद्रपदाचा योगतारा (प्रमुख तारा) मानण्यात येतो. या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ व चौथा चरण मीन राशीमध्ये समाविष्ट आहे. वैदिक काळी पूर्वाभाद्रपदा व ⇨उत्तरभाद्रपदा यांना मिळून प्रौष्ठपदा म्हणत. यांतून काढलेली रेषा ध्रुवातून जाते. याची देवता अज एकपाद व आकृती यम वा मंचक मानतात. नोव्हेंबराच्या पहिल्या आठवड्यात हे डोक्यावर दिसते.
पहा : नक्षत्र.
ठाकूर, अ. ना.