पूजा: अतिमानवी शक्तींच्या माहात्म्यामुळे प्रभावित होऊन त्या शक्तींना उद्देशून मानवाने केलेले कायिक, वाचिक वा मानसिक असे धार्मिक कर्मकांड म्हणजे व्यापक अर्थाने पूजा होय. त्या शक्तींच्या विषयी आत्यंतिक आदर व्यक्त करणे, त्यांना शरण जाणे, त्यांना अनुकूल करून घेणे, त्यांच्याकडून इष्ट पदार्थ प्राप्त करणे वा संकट दूर करविणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे किंवा त्यांच्या उग्रतेची व घातकतेची भीती वाटल्यामुळे त्यांना दूर जाण्याची विनंती करणे, यांसारख्या हेतूंनी ही पूजा केली जाते. भौतिक व मानसिक गरजांच्या बाबतींत पराधीनतेची जाणीव झाल्यामुळे मनुष्य स्वतःपेक्षा अधिक समर्थ अशा शक्तीचे साहाय्य मिळविण्यासाठी तिची पूजा करू लागतो. थोडक्यात म्हणजे मानव आणि अतिमानवी शक्ती यांच्यात अनुकूल संबंध प्रस्थापित करणे, हा पूजेचा मुख्य हेतू असतो. या व्यापक अर्थाने वैदिक यज्ञ, इस्लाम वगैरे धर्मातील ⇨प्रार्थना, आदिम जमातींतील विविध ⇨ बळी अर्पण करण्याची कृत्ये इत्यादींचाही पूजा या संकल्पनेत समावेश होऊ शकतो. जगातील प्राथमिक वा उच्च अशा सर्व धर्मांमध्ये या स्वरूपाची पूजा असते.

सामान्यतः अतिमानवी शक्तींच्या स्वरूपाविषयीची एखाद्या समाजाची धारणा आणि त्या समाजाची सांस्कृतिक पातळी यांवर त्या समाजातील पूजापद्धती अवलंबून असते. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील व संप्रदायातील पूजेच्या कर्मकांडात कमीजास्त वेगळेपणही आढळते. विशिष्ट धर्माचे खरेखुरे स्वरूप हे प्रामुख्याने त्या धर्मातील पूजापद्धतीमधूनच स्पष्ट होत असते. विशिष्ट समाजाच्या पूजापद्धतीतून त्या समाजाच्या परंपरा, नैतिक व धार्मिक धारणा, धर्मतत्त्वे इत्यादींची अभिव्यक्ती होत असते.

समाजाच्या आदिम अवस्थेत पूजा आणि यातुक्रिया यांचा संबंध अविभाज्य असतो परंतु तत्त्वतः या दोन्ही संकल्पना एक नव्हेत. कारण, पूजा ही अतिमानवी शक्तींना प्रसन्न करण्यासाठी असते, तर यातुक्रिया त्यांना नियंत्रित करण्यासाठी असते. आदिम काळातील पूजा ही उत्स्फूर्त असल्यामुळे त्यावेळची पूजापद्धती साधी व सोपी असते. क्रमाक्रमाने ती गुंतागुंतीची होत जाते व मग पूजा करण्यासाठी ⇨ पुरोहित वा पुजारी हा एक स्वतंत्र वर्ग तयार होतो. तसेच, पूजेसाठी निश्चित असे स्थान निर्माण करण्याच्या हेतूतून ⇨ देवालयांची निर्मिती होते.

परमेश्वराची पूजा हीच खरी पूजा, असे यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या धर्मांत मानले जाते. इस्लामसारख्या धर्मांतून परमेश्वराखेरीज इतर कोणाची पूजा करणे, हे पाप मानले जाते. परंतु जगातील विविध धर्मांतून परमेश्वराखेरीज इतर अनेक पदार्थांची पूजा चालते. वेगवेगळ्या लोकांत देवदेवता, यक्षकिन्नरादी योनींतील लोक, भूतपिशाचे, साधुसंत, पितर, महापुरुषांचे अवशेष, राजे, पुरोहित, धर्मग्रंथ, लिंग, पशू, पक्षी, नाग, जलाशय, नद्या, पर्वत, पाषाण, भूमिस्थाने, वृक्ष इ. पदार्थांची व त्यांच्या मूर्तींची [→ मूर्तिपूजा] वा अन्य प्रतीकांची पूजा चालते. देवतेसाठी विशिष्ट द्रव्यांचे समर्पण, प्रार्थना व नमस्कार या सामान्यतः पूजाविधीतील मुख्य कृती होत. संगीत, गायन, नृत्य, आरती, धूप जाळणे इ. क्रियांनाही महत्त्व असते. या बाबतीत असलेली परंपरा, विधिनिषेध, व्रते इत्यादींचे पालन करणे कर्तव्य ठरते. परंतु बहुतेक धर्मांनी पूजेतील धार्मिक कर्मकांडापेक्षा पूजकाच्या मनातील श्रद्धा व भावना यांना अधिक महत्त्व दिलेले आहे. तत्त्वतः पूजा केव्हाही व कोठेही करणे विहित असले, तरी व्यवहारात विशिष्ट स्थलकालांना अधिक महत्त्व असते. कारण, त्या स्थलकाली देवतेचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. मंदिरे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचे संगम, पर्वत इ. स्थानांना आणि नववर्षदिन, पौर्णिमा, पेरणी व सुगीचे दिवस, सण, उत्सव इ. कालांना पूजेच्या दृष्टीने महत्त्व असते. प्रत्येक दिवशी सकाळी, दुपारी व सायंकाळी पूजा करण्याची पद्धत अनेक धर्मांत असते. पूजेचा अधिकार सर्वांना असतो परंतु काही देवळांमध्ये विशिष्ट पुरुष वा स्त्री वा विशिष्ट वर्गातील लोक यांना तो अधिकार देऊन इतरांना तो नाकारलेला असतो. पूजेचे वैयक्तिक व सामुदायिक तसेच खाजगी व सार्वजनिक असे भिन्नभिन्न प्रकार आढळतात. ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्मांतील प्रार्थना सामुदायिक व सार्वजनिक स्वरूपाच्याही असतात. सामुदायिक पूजेत काही समाज आपल्या संप्रदायाबाहेरच्या लोकांना प्रवेश देत नाहीत, तर काही समाज असे बंधन घालत नाहीत.

पूजेमुळे पूज्य पदार्थांचे गुणधर्म पूजकामध्ये उतरतात किंवा त्याचे संरक्षक सामर्थ्य पूजकाच्या पाठीशी उभे राहते, अशी लोकांची श्रद्धा असते. पूजेमुळे पूजक व्यक्तींच्या चिंता दूर होऊन तिला मनःशांती मिळते. स्वतःच्या अडीअडचणींचा भार देवतेवर सोपविल्यामुळे दुःखी व्यक्तीचे जीवन सुसह्य होते आणि तिचा आत्मविश्वास  वाढतो. पूजेमुळे जीवनाचे नूतनीकरण साधते, अशी धारणा असल्यामुळे पूजेच्या वेळी विश्वनिर्मितीच्या पुराणकथा सांगितल्या जातात. विशिष्ट पूजापद्धती स्वीकारलेल्या सर्व लोकांमध्ये ऐक्य साधते, हेही पूजेचे एक महत्त्वाचे कार्य होय. मुसलमान लोक हे याचे उत्तम उदाहरण होय. पूजेमुळे संगीत, नृत्य, गायन, काव्य, चित्रकला इ. कलांना प्रोत्साहन मिळते, हाही पूजेचा सांस्कृतिक दृष्ट्या एक लाभ होय.

‘पूज्’ (पूजा करणे) हा धातू व पूजा हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही. भारत व श्रीलंका यांच्याबाहेरील कोणत्याही इंडो-यूरोपियन भाषेतही तो आढळत नाही. पूजा हा शब्द प्रथम आर्षेय ब्राह्मणात व उत्तरकालीन उपनिषदांत आढळतो. वैदिक काळात बहुधा सध्यासारखी पूजा नव्हती यज्ञ होते. अर्थात व्यापक अर्थाने यज्ञ म्हणजे देखील पूजाच होय. शिवाय, यज्ञ हा शब्द ज्या ‘यज्’ धातूपासून बनला आहे, तो धातू पूजा करणे या अर्थाचाच आहे, हे पाणिनीच्या ‘धातुपाठा’ वरून स्पष्ट होते. परंतु व्यवहारात यज्ञ व पूजा यांत बराच फरक आहे. यज्ञ करताना देवतांना उद्देशून अग्नीत आहूती अर्पण केली जाते तसेच, पशुबळीही दिले जातात. पूजेत मात्र तसे न करता देवतेला पत्रपुष्पादी उपचार समर्पिले जातात. यज्ञ हे वेदोक्त असतात, तर पूजा ही प्रामुख्याने स्मार्त व पुराणोक्त असते.


अशा रीतीने, पूजा हा शब्द व हिंदूंची सध्याची पूजापद्धती या दोन्ही गोष्टी उत्तरकालीन असल्याचे दिसत असल्यामुळे, हिंदूंनी या दोन्ही गोष्टी द्रविड संस्कृतीतून घेतल्या असाव्यात, असे काही विद्वानांना वाटते. तमिळ भाषेतील पूजा या अर्थाच्या ‘पूशै’ या शब्दापासून संस्कृतमधील पूजा हा शब्द बनला असण्याची शक्यता आहे. तमिळ, कन्नड इ. द्रविड भाषांतून ‘पू’ या शब्दाचा फूल असा अर्थ आहे. तसेच ‘करणे’ या अर्थाने चेय्, जेय्, शेय्, गेय् इ. धातू वापरले जातात. ‘पू’ हे नाम आणि उपर्युक्त धातूंपैकी एखादा धातू यांच्यापासून संस्कृतमधील ‘पूज्’ हा धातू बनला असण्याची शक्यता आहे. फूल अर्पण करणे, हा पूजेचा एक महत्त्वाचा  घटक आहे, हेही या संदर्भात ध्यानात घेतले पाहिजे. काहींच्या मते ‘लेप देणे’ वा ‘फासणे’ या अर्थाच्या ‘पूशु’ या द्रविड शब्दाचे रूपांतर होऊन पूजा शब्द बनला असावा. कारण, रक्ताऐवजी चंदनाचा वा शेंदुराचा लेप देणे, हे यज्ञापासून पूजेचे वेगळेपण होय. याबाबतीत, द्रविडांनी पूजा हा शब्द व पूजापद्धती आपल्या आधीच्या ऑस्ट्रिक लोकांकडून घेतली असावी, द्रविड संस्कृतीचा प्रभाव व बौद्धांच्या अहिंसेचा परिणाम यांमुळे आर्यांनी रक्तहीन पूजेची अनार्यांची पद्धत स्वीकारली इ. मतेही आढळतात. यज्ञसंस्थेचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर पूजा अधिक रूढ झाली. पूजा ही यज्ञापेक्षा सोपी, कमी खर्चाची व सहजसाध्य असल्यामुळे तिला महत्त्व आले. यज्ञाचा अधिकार नसलेल्या स्त्री-शूद्रांनांही पूजेचा अधिकार आहे आणि यज्ञात अमूर्त असलेल्या देवता आता मूर्तीच्या रूपाने साकार झाल्या, हेदेखील पूजेच्या प्रसाराचे महत्त्वाचे कारण होय. पां. वा. काणे यांना मात्र पूजापद्धती व पूजा हा शब्द आर्यांनी द्रविडांकडून घेतला, हे मत मान्य नाही. त्यांनी अनेक कारणे देऊन ते खोडून काढले आहे. ऋग्वेदातील पुष्प या शब्दापासून पूजा या शब्दाची व्युत्पत्ती दाखविता येईल, असे त्यांचे मत आहे.

हिंदूंमध्ये पाच वा सोळा उपचारांनी केली जाणारी पूजा प्रसिद्ध आहे. आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व विसर्जन किंवा उद्वासन हे सोळा उपचार होत. भूषण व तांबूल असे आणखी दोन उपचार काहींनी सांगितले आहेत. परंतु एकंदरीत उपचारांची संख्या, नावे व क्रम यांबाबतीत खूपच वैकल्पिक निर्देश आढळतात. अनेक उपचारांनी विविध देवदेवतांची पूजा केली जाते. पूजा करताना म्हणावयाचे मंत्र, पूजेचा आधिकार, विधिनिषेध इ. बाबतींत बरेच नियम आहेत. सोळा उपचारांची पूजा ही बाह्य पूजा मानलेली असून केवळ मनाने केली जाणारी पूजा ही मानसपूजा म्हटली जाते. त्यांखेरीज पूजेचे वैदिकी, तांत्रिकी व मिश्र असेही तीन प्रकार आहेत. पूजाप्रकाश, स्मृतिचंद्रिका इ. धर्मनिबंधांतून देवपूजेची विस्तृत

माहिती आहे. जैन लोक ⇨ तीर्थकरांची पूजा करतात. श्वेतांबर व दिगंबर पंथांच्या  पूजाविधींत काही प्रमाणात फरक असतो. महायान बौद्ध हे ⇨ बुद्ध व ⇨ बोधिसत्व यांची पूजा करतात. ‘नाम’ हे ईश्वराचे स्वरूप असल्यामुळे केवळ ‘नामा’ची पूजा करावयाची, असे शीख लोक मानतात. ते गुरू ⇨ ग्रंथसाहिबाला नमस्कार करीत असले, तरी ती पूजा नव्हे, असे ते मानतात. पूजेत वस्तू अर्पण करण्यापेक्षा प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यांना महत्त्व असते, असे ⇨ कन्फ्यूशसच्या चिनी धर्मात मानले होते. शिंतो पूजाविधीचा उगम समजण्याच्या  दृष्टीने सूर्यदेवी लपून बसली या अर्थाची ग्रहणाविषयीची जपानी पुराणकथा महत्त्वाची आहे. सूर्यदेवीचे प्रतीक असलेल्या आरशाला तेथील पूजेत महत्त्वाचे स्थान असते.

ईजिप्तमध्ये स्थानिक देवांचे सूर्यदेवाशी तादात्म्य मानले जाई. त्यामुळे हीलिऑपोलिस येथील सूर्यदेवाच्या पूजेचा जो विधी असे, तोच सर्व मंदिरांतून चालत असे. पुढे प्रत्येक देवतेचे ⇨ ओसायरिसबरोबर तादात्म्य मानले जाऊ लागले. तरीही सूर्यपूजेची वैशिष्ट्ये नव्या पूजेतही शिल्लक राहिली. फेअरो राजाचा विधिपूर्वक शृंगार व मंदिरातील दैनंदिन पूजा यांत साम्य असे. धूप लावणे,  प्रणाम करणे, मंत्र म्हणणे, मीत या देवीची प्रतिमा अर्पण करणे, मूर्तीला स्नान, वस्त्रे, अलंकार, उटणी, भोजन इ. अर्पण करणे यांसारखे विधी पूजेत असत. ग्रीक लोकांत देवता, निर्जीव पदार्थ, पशू, पवित्र स्थाने, वृक्ष, पितर, वीर  इत्यादींची पूजा चाले. त्यांच्या पूजेत प्रतिमेला महत्त्वाचे स्थान होते. पूजाद्रव्य अर्पण करण्यासाठी वेदीची आवश्यकता असे. वेदीला फुले व माळा घातल्या जात. पूजा करताना करावयाच्या कृती, उच्चारावयाचे शब्द व अर्पण करावयाच्या वस्तू यांबाबतीत रोमन लोकांत फार काटेकोर नियम होते. ज्यू लोकांच्या ⇨ सिनॅगॉगमध्ये दिवसातून तीन वेळा पूजा चालते. इ.स.पू. ६२१ मध्ये जोशिया या राजाने पूजेचे जेरूसलेममध्ये केंद्रीकरण केले. त्यापूर्वी अनेक स्थानिक देवळांतून पूजा चालत असे. इ.स.पू. ६२१ पासून तो इ.स. ७० मध्ये जेरूसलेमचे मंदिर नष्ट होईपर्यंत प्रामुख्याने जेरूसलेमच्या मंदिरातच पूजा चाले. परंतु हे मंदिर नष्ट होण्यापूर्वी बराच काळ सिनॅगॉग नावाच्या प्रार्थनास्थानांची निर्मिती झाली होती आणि लोक तेथे पूजा करीत असत. ते मंदिर नष्ट झाल्यावर सिनॅगॉगमधील पूजेला महत्त्व आले. फक्त ईश्वरच पूज्य आहे, असे ख्रिस्ती धर्मात मानले जाते. संतांविषयी आदर असला, तरी त्यांची पूजा केली जात नाही. पिता म्हणून ईश्वराविषयी आणि भाऊ म्हणून मानवांविषयी प्रेम वाटणे, हे ख्रिस्ती पूजेमागचे महत्त्वाचे तत्त्व होय. पूजेमध्ये रक्त अर्पण करण्याची गरज नाही, प्रार्थना पुरेशी आहे, असे मानले जाते. चर्चमधील सामुदायिक प्रार्थना हीच महत्त्वाची पूजा होय. ईश्वराचे आभार मानणे, हे प्रार्थनेचे सामान्य स्वरूप असते. प्रार्थना [→ नमाज] हेच इस्लामी पूजेचे मुख्य स्वरूप होय. ती सामुदायिक आणि वैयक्तिक अशी दोन्ही प्रकारची असते. पूर्वी पारशांच्या पूजेत पशुबळीला महत्त्वाचे स्थान होते. ⇨ जरथुश्त्राचा मात्र कर्मकांडापेक्षा अंतःकरणपूर्वक पूजा करण्यावर अधिक भर होता. परंतु अवेस्ताच्या उत्तरकालापर्यंत पूजेचे बरेच कर्मकांड वाढले होते. पारशी लोक ⇨ अग्यारीत जात असले, तरी पूजेसाठी तेथे जाणे, हे अत्यावश्यक मानले जात नाही. ते अग्यारीत जमले,तरी त्यांची पूजा प्रामुख्याने वैयक्तिक असते.

संदर्भ :1. Hilliard, F.H. How Men Worship, London, 1965.

             2. Kane, P.V. History  of Dharmashastra, Vol. II-Part II, Pune. 1974.

             3. Parrinder, Geoffrey, Worship in the World’s Religions, London. 1961.

साळुंखे, आ. ह.