पुलिट्झर, जोसेफ : (१० एप्रिल १८४७ – २९ ऑक्टोबर १९११). अमेरिकन पत्रकार, बूडापेस्ट (हंगेरी) येथे जन्मला. १८६४ मध्ये तो अमेरिकेत आला आणि त्याने सैन्यात नोकरी धरली. अमेरिकेतील यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर उदरनिर्वाहासाठी तो सेंट लूइस येथे आला आणि मोलमजुरीची कामे करू लागला. १८६८ मध्ये एका जर्मन वृत्तपत्रात त्याला वार्ताहराची नोकरी मिळाली. उत्तम वार्ताहर म्हणून त्याचा लवकरच लौकिक झाला. पुढे तर काही वर्तमानपत्रांचा तो मालक झाला. सेंट लूइस पोस्ट, सेंट लूइस डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ही ती पत्रे होत. त्यांपैकी सेंट लूइस पोस्ट आणि सेंट लूइस डिस्पॅच ह्या दोन पत्रांचे एकत्रीकरण करून त्याने पोस्ट- डिस्पॅच हे नवेच पत्र सुरू केले. पोस्ट- डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ह्या दोन्ही पत्रांना फार मोठे यश लाभले. सार्वजनिक जीवनातील लाचलुचपतींसारख्या अपप्रवृत्तींवर पुलिट्झरने आपल्या पत्रांतून प्रकाश टाकला सामान्य जनतेच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाविरूद्ध आवाज उठवला.पुलिट्झरचे डोळे अधू होते आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तर त्याला अंधत्वच आले तथापि आपल्या सचिवांच्या मदतीने तो आपली पत्रे चालवीत राहिला. पुलिट्झरला सनसनाटीचे मोठे आकर्षण होते. १८९४ मध्ये पुलिट्झरने न्यूयॉर्क वर्ल्डमधून एक रंगीत चित्रकथा (कॉमिक) सुरू केली. ‘येलो थिड’ हा ह्या चित्रकथेचा नायक. ‘येलो जर्नॅलिझम’ किंवा ‘पिवळी पत्रकारी’ हा शब्द येलो थिड वरून आला, असे म्हणतात. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलायना राज्यातील चार्ल्सटन येथे पुलिट्झर निधन पावला. आपल्या मृत्युपत्रात त्याने ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ जर्नॅलिझम’च्या स्थापनेसाठी आणि पत्रकारी, साहित्य आणि संगीत ह्या तीन विषयांसाठी आपल्या नावे पारितोषिके प्रदान करण्यासाठी तरतूद करून ठेवली होती. १९१७ पासून ‘पुलिट्झर पारितोषिके’ दिली जाऊ लागली. ह्या पारितोषिकांची योजना फक्त अमेरिकन नागरिकांपुरतीच मऱ्यादित आहे.
कुलकर्णी , अ. र.