पुष्पदलसंबंध : (एस्टिव्हेशन). झाडावरच्या कळ्यांमध्ये (मग त्या पुष्पकलिका असोत किंवा पर्णकोरक असोत) खोडाच्या टोकाचा भाग व पूर्ण वाढ न झालेल्या स्थितीतील फार कोवळी पाने (किंवा पुष्पदले) दाटीवाटीने परस्परांशी भिडलेली असतात. तथापि फुलांच्या कळ्या (कलिका) व पानांच्या कळ्या (कोरक) यांतील भाग विविध प्रकारे पण ठराविकपणे मांडलेले असतात व त्यावरून ‘कलिका-रचना’ व ‘कोरक-रचना’ यांची कल्पना येते. कलिकावस्थेत पुष्पदले (म्हणजे फुलातील संदले व प्रदले) आपापल्या विशिष्ट मंडलात (संवर्त व पुष्पमुकुट) भिन्न फुलांत भिन्न प्रकारे, पण एका फुलझाडाच्या कळ्यांत एकाच प्रकारे मांडलेली असतात याला‘पुष्पदलसंबंध’ म्हणतात. कारण यामध्ये दलांच्या परस्परसंबंधाचा विचार केला जातो. याशिवाय प्रत्येक पुष्पदल स्वतःभोवती भिन्न जातींतील किंवा वंशांतील फुलांत भिन्न प्रकारे दुमडलेले असते, त्याला ‘दलवलन’ म्हणतात. पानांच्या कळ्यांतील कोवळ्या पानांच्या परस्परसंबंधाला ‘पर्णसंबंध’ व पानांचे स्वतःभोवती दुमडण्ये स‘पर्णवलन’ म्हणतात. ‘पुष्पदलसंबंध’ व ‘पर्णसंबंध’ तसेच ‘दलवलन’ व ‘पर्णवलन’ यांत तात्त्विक फरक फार कमी असतो दोन्ही बाबतींत वर्णनात्मक संज्ञा सामान्यपणे सारख्याच वापरतात. (→पर्णवलन). पुष्पदलसंबंधात दोन मुख्य प्रकार आढळतात. पुष्पाक्षाभोवती पुष्पदले मंडलाकार मांडलेली असल्यास तो ‘वर्तुळाकार दलसंबंध’ होय. परंतु ती एकाआड एक मांडलेली असल्यास त्यास ‘सर्पिल दलसंबंध’ म्हणतात. पहिल्या प्रकारात तीन उपप्रकार आहेत : (१) ‘धारास्पर्शी’ [आकृती (अ) उदा., रुईच्या पाकळ्या व जास्वंदीची संदले] (२) ‘वक्रधारास्पर्शी’ [आ. (आ) उदा., मोरवेलीची संदले] (३) ‘प्रतिवक्रधारास्पर्शी’ [आ. (इ) उदा., बटाट्याच्या फुलातील पाकळ्या]. या सर्वच प्रकारांत दलांच्या कडा (धारा) एकमेकींस लागून असतात. पहिल्या उपप्रकारांत संदलांच्या किंवा प्रदलांच्या धारा बाजूस परस्परांस फक्त स्पर्श करतात. दुसऱ्या उपप्रकारात त्या धारा आत थोड्या वळलेल्या असून दलांचा उरलेला काही भाग परस्परांस स्पर्श करतो. तिसऱ्या उपप्रकारात धारा बाहेरच्या बाजूस थोड्या वळून मग परस्परांस टेकून राहतात. दुसऱ्या (सर्पिल दलसंबंध) प्रकारात पाच उपप्रकार असून, प्रत्येक उपप्रकारात भिन्नभिन्न तऱ्हांनी कळीतील दले परस्परांवर कमीजास्त प्रमाणात नियमितपणे किंवा अनियमितपणे टेकलेली आढळतात : (१) ‘परिहित’ उपप्रकारात [आ. (ई) ] क्र. १ या दलाच्या दोन्ही कडा आत व क्र. २ या दलाच्या दोन्ही कडा बाहेर असतात इतर तीन दलांच्या दोन कडांपैकी एक आत व एक बाहेर असते (उदा. घोळ, अफू, गुलमोहोर). (२) ‘परिवलित’उपप्रकारात प्रत्येक [आ. (उ) ] दलाची एक कडा आत व एक बाहेर असते (उदा., कण्हेर, जास्वंद). (३) ‘संवलित’ उपप्रकारात प्रत्येक [आ. (ऊ)] दलाचा दुसऱ्याशी संबंध परिवलिताप्रमाणेच असतो फरक असा की, प्रत्येक दलाची एक कडा आतील बाजूस बरीच खोलवर गेलेली असते आणि त्याची दुसरी कडा दुसऱ्या दलावर अधिक पसरलेली असते (उदा. फ्लॉक्स, पांढरा चाफा, सोनटक्का). (४) ‘विपरिहित’ उपप्रकारात [आ. (ए)] क्र. ३ व ४ ची दले संपूर्णतया बाहेर, क्र. १ व २ ची दले संपूर्णतया आत आणि क्र. ५ हे दल अंशतः आत व बाहेर असते (उदा., गुलाब). (५) ‘ध्वजकरूप’ [आ. (ऐ)] उपप्रकारात सर्वांत बाहेरची पाकळी (क्र. १ ध्वजक = पताका) आतील दोन पंखांसारख्या (क्र. २) बाजूच्या पाकळ्यांना वेढून घेते व पंखाच्या आत नौकातलासारख्या (क्र. ३) दोन पाकळ्या अंशतः जुळून असतात (उदा., वाटाणा, अगस्ता इ.). जातीत, वंशात किंवा कुलात विशिष्ट प्रकारचा पुष्पदलसंबंध कधीकधी इतका सुसंगतपणे आढळतो की, इतर आनुवंशिक लक्षणांबरोबर हे लक्षणही वनस्पतींच्या वर्गीकरणात [® वनस्पतींचे वर्गीकरण] महत्त्वाचे मानतात.
पहा : पर्णवलन पर्णविन्यास पान फूल.
परांडेकर, शं. आ.
“