पुश्तू भाषा: पुश्तू किंवा पश्तो ही अफगाणांची भाषा आहे. अफगाण (फार्सी अफघान) हे इराणी लोकांनी दिलेले नाव असून अफगाण लोक स्वतःला ‘पश्तून’ (पश्तान) म्हणवतात. भारतीयांना परिचित असलेल्या ‘पख्तून’ व ‘पठाण’ या नावांचा खुलासा यामुळे होतो.
पुश्तू भाषा अफगाणिस्तानचा बहुतांश भाग, ब्रिटिश अमदानीतील वायव्यसरहद्द प्रांत (पख्तुनिस्तान) आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यांत बोलली जाते.
पुश्तू ही निश्चितपणे इंडो-यूरोपियन भाषा असली, तरी तिचे वर्गीकरण मात्र बराच काळ वादग्रस्त होते पण १८९० मध्ये दार्मस्तेतेर या फ्रेंच विद्वानाने ती पूर्व इराणीच्या झेंद किंवा तत्सम बोलीपासून निघालेली आहे असे दाखवून दिले.
पुश्तूचे साहित्य समृद्ध आहे. त्यात चारपाचशे वर्षांपासून भाषांतरित पुस्तकांचीही भर पडलेली आहे. या भाषेचे लोकसाहित्य बरेच मोठे आहे. त्यातली अनेक काव्ये दार्मस्तेतेर याने संग्रहित केली आहेत.
ध्वनिव्यवस्था : पुश्तू भाषेत पुढील ध्वनी आहेत.
स्वर : अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ.
व्यंजने : स्फोटक : क, ग, ट, ड, त, द, प, ब.
अर्धस्फोटक : (तालव्य व दंत्य) च, ज.
घर्षक : ख, थ, श, स, घ, ध, (तालव्य व दंत्य) झ, ह.
अनुनासिक : म, न.
द्रव : र, ल.
अर्धस्वर : य, व.
व्याकरण : नाम : नाम पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आणि एकवचनी किंवा अनेकवचनी असते. काही नामे सिद्ध तर काही साधित म्हणजे दुसरे एखादे नाम, विशेषण इत्यादींवरून बनविलेली असतात. प्रत्येक वचनात नामाची तीन रूपे असतात : सरळ, सामान्य व संबोधनवाचक. सामान्यरूपापूर्वी किंवा (मराठीतील शब्दयोगी अव्ययाप्रमाणे) नंतर कार्यवाचक रूप लागते. विभक्तीच्या भाषेत बोलायचे, तर सरळरूपाने प्रथमा व द्वितीया केवळ सामान्यरूपाने तृतीया तह्, लरह् किंवा लह् हे प्रत्यय लावून चतुर्थी लह् हे उपपद नुसते किंवा नह् या प्रत्ययासह लावून पंचमी द हे उपपद लावून षष्ठी आणि प किंवा पह् हे उपपद क्षेय् किंवा क्षि या प्रत्ययासह लावून सप्तमी अशी रुपे मिळतात.
सर्वनाम : (पुरुषवाचक) झ ‘मी’- मुझ्ह ‘आम्ही’ त ‘तू’- तासे, तासू ‘तुम्ही’ हघ ‘तो, ती, ते’- हघ ‘ते, त्या, ती’.
(दर्शक) दघ, दा ‘हा, ही’ दएय् ‘तो, ती’.
(स्ववाचक) पु. ख्पल्, स्त्री. ख्पल, ‘स्वतः’.
(प्रश्नवाचक) चोक् ‘कोण’ पु. कोम, कम् स्त्री. कोम्, कम ‘काय’.
(संबंधदर्शक) ची ‘जो, जी’.
विशेषण : विशेषण नामापूर्वी येते आणि त्याला त्या त्या नामाचे लिंग, वचन व विभक्तीचे प्रत्यय लागतात.
क्रियापद : क्रियापदवाचक रूप धातूला ल्, अल्, किंवा एदल् हे प्रत्यय लावून होते. या प्रत्ययांऐवजी अवुल् हा प्रत्यय लावला, तर सकर्मक क्रियापद मिळते : बलेदल् ‘पेटणे’- बलवुल् ‘पेटवणे’. अशाच प्रकारे प्रयोजक रूपे मिळतात : झ्घलेदल् ‘धावणे’– झ्घलवुल् ‘धावायला लावणे’. ल् शेवटी असणारी क्रियापदे सकर्मक तसेच अकर्मक, एदल् शेवटी असणारी फक्त अकर्मक आणि वुल् शेवटी असणारी फक्त सकर्मक असतात.
क्रियापदांची रूपे ज्या वेगवेगळ्या काळांत होतात ते असे : वर्तमान, प्रथम भविष्य, द्वितीय भविष्य, भूत, अपूर्णभूत, वर्तमानभूत, पूर्णभूत, परिपूर्णभूत, अनिश्चितभूत, संकेतभूत इत्यादी.
एकंदर क्रियापदव्यवस्था बरीच गुंतागुंतीची आहे. पुढे नमुन्यादाखल अस – ये, जा व कर – या अर्थाच्या धातूंची वर्तमानकाळाची रूपे दिली आहेत.
अस- राघ्लल् ‘ये’
झह् यम् ‘मी आहे’. राजम् ‘मी येतो’.
तह् येय् ‘तू आहेस’. राजेय्
हघह् दएय्, श्तह् ‘तो आहे’. राजी
हघह् द’ह्, श्तह् ‘ती आहे’. राजी
मुझ्, मुंगह् यू ‘आम्ही आहो’. राजू
तासू य’अई यास्त’अई ‘तुम्ही आहात’. राज’अई
हघह् दी, श्तह् ‘ते, त्या आहेत’. राजी
त्लल् ‘जा’ कवुल ‘कर’
जम् ‘मी जातो’. कवुम् ‘मी करतो’.
जेय् कवेय्
जी कवी, का, कांदी
जी कवी, का, कांदी
जू कवू
ज’अई कव’ अई
जी कवी, का, कांदी
वाक्यरचना : वाक्यात शब्दांचा क्रम सामान्यपणे पुढीलप्रमाणे असतो : कर्ता, नंतर काऱ्यानुसार विभक्तीप्रमाणे इतर नामे, नंतर धातुसाधित किंवा क्रियाविशेषण आणि शेवटी क्रियापद. विशेषण असल्यास ते संबंधित नामापूर्वी.
काही वाक्ये : तह् चोक् वेय्? ‘तू कोण आहेस?’- झह् पुश्तून् यम्. ‘मी अफगाण आहे’. – स्ता नुम् चह् दएय्? ‘तुझं नाव काय?’– नुम् मी यार् मुहम्मद् दएय्. ‘माझं नाव यार महम्मद आहे’. पह् कोर् क्शेय् चोक् श्तह्? ‘घरात कोणी आहे का?’– साहिब् पह् कोर् क्शेयं दएय्. ‘साहेब घरात आहेत’. – पह् देय् बाब् क्शेय् स्तास् ही घरझ नह्श्तह्. ‘या बाबतीत तुझा काहीही संबंध नाही’. – दघह् काघिझ् पह् लिफाफ’ह् क्शेय् वाचवह्. ‘हे पत्र (कागद) पाकिटात(लिफाफ्यात) घाल’.
संदर्भ :1. Grierson. G. A. Linguistic Survey of India, Vol. X. Specimens of
Languages of the Eranian Family, Delhi, 1928.
2. Raverty, Maj. H. G. The Pashto Manual, London. 1880.
कालेलकर, ना. गो.
“