पुरातत्त्वविद्या : पुरातत्त्वविद्या इंग्रजी भाषेतील ‘आर्किऑलॉजी’ या शब्दाची समानार्थी संज्ञा आहे. इंग्रजी संज्ञा मूळ ग्रीक संज्ञेपासून (आर्किओ-प्राचीन व लोगोस-निबंध > आर्किओ+लोगोस म्हणजे प्राचीन निबंध) आली असून तिचा अर्थ स्थूलमानाने (मानवाच्या) उत्पतीचे विश्लेषण असा होतो. तथापि पुरातत्त्वविद्येचा अर्थ मानवी संस्कृतीचा विकास व विकासाचा इतिहास असाच करावा लागतो.

पुरातत्त्वीय संशोधनाची सुरुवात यूरोपात केवळ एक छंद म्हणून सोळाव्या शतकात झाली आणि या विद्येला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शास्त्राची प्रतिष्ठा लाभली. या शास्त्राची मुख्य मदार समन्वेषन आणि उत्खनन यांवर आहे. इ.स.पू सहाव्या शतकात एका ॲसिरियन राजकन्येने आपल्या वडिलांच्या मदतीने काही सुमेरियन संस्कृतीचे उत्खनित अवशेष उजेडात आणल्याचा उल्लेख मिळतो. सुरुवातीच्या काळातील पुरातत्त्वीय संशोधन अशास्त्रीय तंत्रावर केवळ अद‌्भुत वस्तु मिळण्याच्या हेतूने करण्यात येत असे. परंतु योजनाबद्ध उत्खनन करून त्याचा अनेक शास्त्रांच्या साहाय्याने अर्थ लावून प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणे, ही दृष्टी पुढे हळूहळू विकसित होत गेली आणि शास्त्र व कला या दोन्ही दृष्टींनी पुरातत्त्वविद्येस प्रतिष्ठा प्राप्त होत गेली.

सर्व प्रकारच्या प्राचीन अवशेषांचा अभ्यास मानवी इतिहासाच्या बांधणीसाठी करावयाचा असल्याने, पुराणत्वविद्या हे इतिहासाचे एक साहाय्यकारी साधन आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. परंतु  हे मत सर्वमान्य नाही. पुरातत्त्वविद्या हे शास्त्र मानवाच्या उत्पत्तीपासूनचा विकास सर्व तऱ्हेच्या लहानमोठ्या पुराव्यांनुसार जाणून घेऊ इच्छिते. त्यामुळे पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी झाली आहे आणि तिचे एक स्वतंत्र शास्त्रही बनले आहे. वैज्ञानिक पद्धतींची मदत घेऊन पुराव्यांचे कालमापनही या विद्येद्वारा करता येते. मानवी इतिहासात लिखित पुराव्याचा काल, अलिखित पुराव्याच्या कालखंडाच्या मानाने अगदीच छोटा-जवळजवळ २·५ टक्के आहे.

पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासाचे यूरोपात दोन प्रमुख भाग योजले जात होते : ऐतिहासिक व प्रागैतिहासिक. ऐतिहासिक भागात ग्रीक व रोमन कला, संस्कृती व इतिहास यांचा अभ्यास अभिप्रेत होता तर प्रागैतिहासिक भागात मानवाची उत्पत्ती व विकास यांचा अंतर्भाव केला जाई. हा अभ्यासविषय मानवशास्त्राशी निगडित होता. भारतातील मौर्यकालापासूनचा पुढील कालखंड हा ऐतिहासिक भाग मानतात तत्पूर्वीचा कालखंड प्रागैतिहासिक विभागात जातो.

पुरातत्त्वविद्या मानवाच्या सांस्कृतिक चालीरीतींचा अभ्यास करते. हा अभ्यास आदिकालापासून सुरू झाला असून मानवजातीचे अस्तित्व असेपर्यंत तो चालूच राहील. त्यामुळे या विद्येची व्याप्ती विशाल आहे व तिच्या अभ्यासविषयात निरंतरत्व आणि सलगत्व ही वैशिष्ट्ये आली आहेत. स्थलकालाच्या संदर्भात सर्वकष सांस्कृतिक पुराव्याचा अभ्यास कायम चालू राहिल. सांस्कृतिक पुरावा संस्कृतीशी संबद्ध असतो. मानवाने निर्माण केलेला वा वापरलेला वा मानवाशी संबद्ध असलेला सर्व पुरावा विविध प्रकारचा असल्याने पुरातत्त्वविद्येचा अनेक शास्त्रांशी संबंध येतो. पुरातत्त्वविद्या प्राचीन अवशेषांचा केवळ वस्तू म्हणून अभ्यास करीत नाही, तर त्या वस्तूंमागील मानवाच्या जीवनपद्धतीचा अभ्यास करते. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास पुरातत्त्वविद्येला अभिप्रेत असल्याने, मानवाशी इतका निकटचा संबंध दुसऱ्या कोणत्याही शास्त्राचा नाही. परंतु ही जाणीव सुरुवातीच्या संशोधनात नव्हती. प्राचीन वस्तू छंद म्हणून जमा करण्याच्या प्रयत्नाला मध्युगीन यूरोपमध्ये फार मोठी चालना मिळाली. पंधराव्या-सोळाव्या शतकांत सुंदर कलात्मक पुतळे, नाणी, मृत्पात्रे इत्यादींचा संग्रह करणे हे एक वेडच पसरले होते. यामुळे श्रीमंत अमीर-उमरावांकडे अशा कलात्मक वस्तूंचे संग्रह करण्यात आले. अशा संग्रहांना व्यक्तिगत आवडीनिंवडाच्या मर्यादा होत्या.

प्रत्यक्ष उत्खननाला मात्र सतराव्या-अठराव्या शतकांच्या आधी सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. इंग्लंड आणि स्वीडनमध्ये प्राचीन स्मारके आणि अवशेष यांच्या जतनाबद्दलचे काही कायदे करण्यात आले. सतराव्या-अठराव्या शतकांत जॉन ऑब्री, एडवर्ड ल्ह्याड आणि विल्यम स्टकली यांनी इंग्लंडमध्ये पुरातत्त्वीय संशोधनाचा आणि उत्खननाचा पाया घातला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपीय देशांत प्राचीन वस्तू व स्मारके यांचे संशोधन करणाऱ्या  अनेक संस्था स्थापन झाल्या.

एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्वीय संशोधनला मोठी चालना मिळाली. १८१६ सी. जे. टॉमसन याने अश्मयुग, ब्रॉझयुग आणि लोहयुग अशा तीन अवस्थांमध्ये मांडणी सूचित करणारा त्रियुग सिद्धांत प्रतिपादन करून मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील तीन संभाव्य अवस्थांचा क्रम निश्चित केला. तर यन्स यॉकॉप व्होर्सॅा याने या त्रियुग सिध्दांताचे आणखी विवेचन करून या कालखंडाचे उपविभाग सुचविले. व्होर्सॅा याने प्रत्यक्ष डेन्मार्कमध्ये उत्खनन करून उत्खननांत स्तरशास्त्राचा पाया घातला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास हॉलस्टॅट येथे ब्राँझयुगीन अवशेष व स्वित्झर्लंडमध्ये ला टेन येथे लोहयुगीन अवशेष आणि नवाश्मयुगीन सरोवर-निवासांचा शोध लागला. याच काळात यूरोपातील अनेक देशांत मोठमोठी वस्तुसंग्रहालये स्थापन करण्यात आली. यामुळे १८६७ साली पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या मानवशास्त्र व पुरातत्त्वीय परिषदेत अश्मयुगापासून ते लोहयुगापर्यंत मानवी संस्कृतीच्या विकासातील टप्पे स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले. याच शतकामध्ये चार्लस लायल याने पृथ्वी व मानव यांची प्राचीनता धर्मधुरीण समजतात, त्यापेक्षा फार प्राचीन असली पाहिजे, हे मत मांडले. बूशे द पर्थ या फ्रेंच संशोधकाने सँ ॲबव्हील येथे प्राचीन वाळूच्या व दगडगोट्यांच्या थरांमधून प्राचीन अश्मयुगीन हत्यारे मिळविली आणि मानवाच्या इतिहास फार मोठा आहे, याची जाणीव करून दिली. मानवाची उत्पतीची व विकास यांची प्राचीनता चार्लस डार्विन याच्या मीमांसेनुसार फार मागे नेता येते, असे सिद्ध झाल्याने मानवाची उत्क्रांती व तिच्यातील महत्त्वाचे टप्पे आणि या प्राचीन कालखंडात मानवाबरोबर अस्तित्वात असणाऱ्या इतर प्राण्यांच्या शोध यांसंबंधी संशोधनाला चालना मिळाली. याच काळात फ्रान्स व इंग्लंड या देशांत विविध प्रकारची अश्मयुगीन हत्यारे व नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मास्थी सापडल्या. यांच्या आधारे लॉर्ड ॲव्हबरी यांनी अश्मयुगाचे विविध उपकाल–उदा., पूर्वपुराणश्मयुग, पुराणश्मयुग, नवाश्मयुग योजले. फ्रान्समध्ये अश्मयुगाच्या विविध अवस्थांचा पुरावा एकोणिसाव्या शतकातच उपलब्ध झाला.

याच शतकात ईजिप्त आणि मेसोपोटेमिया या प्रदेशांत विशेषतः ईजिप्तमध्ये गीझा, आबायडॉस आणि, सक्कर इ. ठिकाणी महत्त्वपूर्ण उत्खनने झाली. ईजिप्तमधील पुरातत्त्वीय संशोधनात ऑग्यूस्त मार्येत, गास्ताँ, मास्परो, फ्लिंडर्झ पेट्री इ. अनेक विद्वानांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पश्चिम आशियात सी. जे रिच, पॉल बोट्टा, ऑस्टिन लेअर्ड, रोबेर्ट कोल्डेव्हाई, लेनर्ड वुली इत्यादींनी उत्खनने करून प्राचीन संस्कृतींच्या स्थळांचा पुरावा उजेडात आणला. यांशिवाय शानीतर निहा, बरदा इ. ठिकाणी अश्मयुगीन हत्यारे उघडकीस आली.  इराक, इराण, सिरिया, लेबानन, जॉर्डन व इझ्राएल या देशांत प्राचीन संस्कृतीची अनेक स्थळे उत्खनित करण्यात आली.

एकोणिसाव्या शतकात निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांमुळे उत्खनित अवशेषांचे कालमान व सांस्कृतिक कालखंडाची कालनिश्चिती हे दोन प्रश्न प्रामुख्याने पुढे आले. ग्रीसमध्ये हाइन्रिख श्लीमान याने ट्रॉय या विख्यात नगरीच्या उत्खननात स्तर-निबद्ध कालमापनाचे तंत्र वापरले, तर पेट्री याने क्रमकालाची पद्धती  अवलंबिली. या प्रक्रियेत मृत्पात्रांचा उपयोग विशद करून सांगितला.

विविध शास्त्रांशी संबंध : विसाव्या शतकात पुरातत्त्वविद्येच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळाली. या विद्येचे ध्येय मानवी आधिभौतिक संस्कृतीच्या इतिहास, असे व्यापक करण्यात येऊन हे साध्य करण्यासाठी विविध शास्त्रज्ञांची व शास्त्र शाखांची मदत घेणे अपरिहार्य ठरले. तसेच कालमापनाच्या आधुनिक शास्त्रीय पद्धती, उत्खननाची व नोंदणीची अचूक साधने  व पद्धती, जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन अवशेषांच्या शास्त्रीय साधनांच्या द्वारे शोध, हवाई व सागरी छायाचित्रणे इत्यादींद्वारे पुराणतत्त्वविद्येला  शास्त्राची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शास्त्रीय पद्धतीबरोबरच विविध काळांतील सांस्कृतिक जीवन कसे होते, हे जाणण्यासाठी इतिहासज्ञ, लिपिवेत्ता, मानवशास्त्रज्ञ, पुरावनस्पतिविज्ञ, पुरापर्यावरणतज्ञ, कालभिज्ञ, हवामानतज्ञ, अभियंता इ. अनेक शास्त्रज्ञांची पुरातत्त्वीय संशोधनात मदत घ्यावी लागते.

नव पुरातत्त्व :  नव पुरातत्त्व हा एक नवा विचार आधुनिक काळात मांडला गेलेला आहे. या नवीन शाखेमध्ये पुरातत्त्वीय संशोधनात एका नव्या दृष्टीचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. पुरातत्त्वीय उत्खननामध्ये मानवी सांस्कृतिक जीवनाचे जे चित्र उपलब्ध होते, ते चित्र तसे का झाले, याची मीमांसा काही प्रतिमाने व गृहीतके यांच्या साहाय्याने करणे आवश्यक आहे. यामुळे पुरातत्त्वशास्त्राच्या पुराव्याचे केवळ वर्णन करून भागणार नाही, तर पुराव्याची कारणमीमांसा करणे आवश्यक झाले आहे.

पुरातत्तवीय संशोधन गेल्या शेदीडशे वर्षांमध्ये जगाच्या निरनिरळ्या भागांत करण्यात आलेले आहे.  भारतामध्ये १७८४ सालीच आलेल्या काही यूरोपीयनांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना करून भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासास चालना दिली. १८३४ ते ३७ या काळात ब्राह्मी व खरोष्ठी या लिप्यांचे वाचन झाल्याने भारतीय पुराभिलेखविद्येत क्रांती झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याची स्थापना १८६० साली करण्यात आली. अशा तऱ्हेने पुरातत्त्वीय संशोधनाला अलेक्झांडर कनिंगहॅम, फ्यूरर, व्हीन्सेंट स्मिथ, जेम्स बर्जेस, ब्यूलर, ह्यूल्श, फ्रांट्स कीलहोर्न इत्यादींनी भारतीय पुरातत्त्वविषयक सामग्री प्रसिद्ध करण्यात फार मोठा वाटा उचलला.

भारतीय पुरातत्त्वविद्येच्या प्रगतीत लॉर्ड कर्झन यांनी फार मोठा प्रयत्न केला. या विद्येच्या संशोधनात्मक कार्याची शास्त्रशुद्ध वाढ व्हावी, म्हणून त्यांनी सर जॉन मार्शल यांची १९०२ साली महानिदेशक म्हणून नेमणूक केली. त्यांच्या  कारकीर्दीत सिंधू संस्कृतीच्या अज्ञात नगरींचा शोध लागला. त्याचप्रमाणे  तक्षशिला या प्राचीन  नगरीचे स्तर-निबद्ध उत्खननही यांच्याच अमदानीत झाले. मार्शल यांनी आपल्या उत्खननाचे वृत्तांतही तत्परतेने प्रसिद्ध केल्याने भारतात पुरातत्त्वीय संशोधनाच्या साधनाने सांस्कृतिक इतिहासात किती महत्त्वाची भर पडू शकते, हेही सिद्ध झाले. भारतीय पुरातत्त्वविद्येच्या तांत्रिक प्रगतीमध्ये रावबहादूर दीक्षित यांचा वाटा मोठा आहे. उत्तर प्रदेशात अहिच्छत्र या प्राचीन नगरीच्या उत्खननामध्ये दीक्षितांनी स्तर-निबद्ध उत्खननाचे तंत्र मोठ्या प्रभावीपणे उपयोगात आणले.

भारतातील पुरातत्त्वीय संशोधनाला शास्त्रीय स्वरूप देऊन त्याची जलद प्रगती करण्याच्या दृष्टीने सर मार्टिमर व्हीलर याने १९४४ ते ४८ या काळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक म्हणून जे काम केले, ते निश्चितच प्रशंसनीय आहे. स्तरवार उत्खनन, उत्खननाच्या वृत्तांतांचे जलद प्रकाशन, अचूक नोंदणी, मार्मिक व कलात्मक छायाचित्रणे, तौलनिक कालमापनात खापरांचा साधन म्हणून वापर आणि उत्खननाच्या कामात विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या सहयोग ही त्याच्या कारकीर्दीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होत. त्याच्या कामाची धाटणी पुढील भारतीय पुरातत्त्वीय संशोधनात प्रकर्षाने दिसून येते.

स्वातंत्र्योत्तर काळात सिंधू संस्कृतीची काही स्थळे तसेच गांधार, तक्षशिला इ. बौद्ध अवशेषांची स्थळे पाकिस्तानात गेली. गुजरातमध्ये लोथल व राजस्थानमध्ये कालिबंगा येथे सिंधू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. अश्मयुगाच्या विविध कालखंडांतील शस्त्रे, विविध प्राण्यांच्या अश्मास्थी, गुहा-निवास, गुहांतील भित्तीचित्रे आणि अश्मयुगातील पर्यावरणाचा अभ्यास ही स्वातंत्र्योत्तर काळातील संशोधनाची वैशिष्ठ्ये ठरलेली आहेत. उत्खननाच्या तंत्रातील प्रगती, कालमापनाच्या विविध शास्त्रीय पद्धतींच्या अवलंब, विविध शास्त्रंज्ञाच्या सहकार्याने केले जाणारे  संशोधन, पुरातत्त्वीय अवशेषांचे व स्मारकांचे केले जाणारे यथायोग्य जतन व विविध कालखंडांतील विविध संस्कृतींच्या स्थलांचे करण्यात आलेले उत्खनन, यांनुसार  भारतीय  पुरातत्त्वविद्या  व तिचा अवलंब करून करण्यात आलेले उत्खनन जगामध्ये मान्यता पावले आहे.

सांस्कृतिक इतिहास उभा करण्यासाठी  पुरातत्त्वविद्येची मदत आता अपरिहार्य ठरलेली आहे, परंतु ही विद्या जितकी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करते, तितकीच ती व्यावहारिक ज्ञानावर अवलंबून आहे. सर्वसामान्यपणे प्राचीन वसतीचे स्थल कसे शोधले जाते व एका विशिष्ट ठिकाणी उत्खनन करण्याचे कसे ठरवले जाते, हे दोन प्रश्न वारंवार विचारले जातात. या संदर्भात प्राचीन स्थळांचा शोध कसा घेतला जातो व याकरिता कोणत्या शास्त्रीय व इतर पद्धती उपयोगी पडतात. हे पाहणे जरुरीचे आहे. बऱ्याचवेळी असे होते की, प्राचीन स्थळांचा शोध अवचितपणे लागतो. रस्त्यांच्या खणण्यात, शेताच्या नांगरटीत आणि काही वेळा घरांचे पाये खणत असतानासुद्धा प्राचीन वस्तू किंवा वास्तू सापडतात. काही काही स्थळांची प्राचीनता त्या स्थलांबद्दल प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांमध्ये लिहून ठेवलेल्या माहितीमध्ये मिळते. प्राचीन भारतीय वाङ्‌मयामध्ये अनेक प्राचीन नगरींचे उल्लेख आलेले आहेच. अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यास प्राचीन काळातील पुरावा उपलब्ध होऊ शकतो.  याउलट काही गावांशी जरासंध किंवा पांडव यांचा संबंध लावल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. महाराष्ट्रात अनेक लेण्यांच्या पांडवांशी संबंध जोडला जातो. काही ग्रामनामे वैशिष्ट्यपूर्ण असतात. आंध्रमध्ये ‘पाडू’ असा अंत्यप्रत्यय असलेली काही गावे आहेत.’पाडू’ याचा अर्थ राखेचा ढिगारा. अशा ठिकाणांना भेटी दिल्यास तेथे प्राचीन वस्त्यांचे अवशेष सापडतात. काही गावांचे उल्लेख प्राचीन शिलालेखांत आलेले असतात. उदा., पुण्याचा उल्लेख प्राचीन ताम्रपटात ‘पुण्य किंवा पुनक’ असा येतो. काही ठिकाणी पांढरीची टेकाडे असल्याची माहिती मिळते. अशा पांढरीच्या टेकडावर जुन्या वत्स्यांचे अवशेष  सापडतात. यांशिवाय प्राचीन नकाशे, जुनी चित्रे यांच्यावरूनही काही शोध घेता येतात. सर्वेक्षण खात्याने तयार केलेल्या अचूक नकाशांच्या साहाय्यानेही प्राचीन टेकाडांचा, प्राचीन स्मारकांचा किंवा ज्या ठिकाणी नदीच्या वळणावर कायम पाण्याचे डोह असतील, अशा प्राचीन वसतिस्थलांचा शोध या नकाशांच्या साहाय्याने घेता येतो.

यांशिवाय अनेक शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने प्राचीन स्थळांचा शोध घेता येणे शक्य झालेले आहे. हवाई छायाचित्रणाच्या साह्याने प्राचीन रस्ते, कालवे वा तटबंदी यांचे शोध यूरोपात लावता आलेले आहेत. प्राचीन तटबंदीवर उगवलेल्या गवताचा रंग अथवा प्राचीन दगडी वास्तूंच्या अवशेषांवर उगवलेल्या गवताचा विरळपणा, गवताच्या रंगातील फरक इ. हवाई छायाचित्रणात अचूक टिपता येतात. यांव्यतिरिक्त विद्युत् प्रतिरोध सर्वेक्षण, चुंबकीय सर्वेक्षण, प्राचीन स्थळांच्या मातीच्या नमुन्यांचे रासायनिक सर्वेक्षण, पराग पृथक्करण, जमिनीत यंत्र व कॅमेरा यांच्या साह्याने गाडल्या गेलेल्या प्राचीन अवशेषांची छायाचित्रे घेणारा लेरिसी परिदर्शक इ. साधन पद्धतींच्या साह्याने प्राचीन अवशेषांचा शोध घेता येतो.

सागरी पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची एक नवीनच शाखा निर्माण झाली आहे. पाणबुड्या व विशिष्ट कॅमेरे यांच्या साह्याने समुद्रात बुडालेल्या प्राचीन जहाजांचा, त्यांतील अवशेषांचा अथवा प्राचीन बंदरांचा शोध घेता येऊ लागला आहे.

प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेले स्थळ सापडल्यानंतर त्या ठिकाणी शास्त्रीय दृष्ट्या उत्खनन कसे करावे, याबाबतही तांत्रिक प्रगती खूप झालेली आहे. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत मध्यपूर्वेत ईजिप्त व ग्रीसमध्ये झालेली उत्खनने अशास्त्रीय स्वरूपाची होती. अकुशल कामगारांनी मुकादमाच्या हाताखाली वाटेल तसे खणून प्राचीन वस्तू मिळवाव्यात व संध्याकाळी त्या मांडून ठेवून त्यानुसार बक्षीस मिळवावे, ही पद्धत एके काळी प्रचलित होती. परंतु आता तज्ञ निदेशकाच्या देखरेखीखाली उत्खननात मिळालेल्या प्रत्येक बारीकासारीक वस्तूची नोंद केली जाते. ती ज्या थरांमध्ये व ज्या ठिकाणी मिळाली असेल, ते स्थळ त्रिमितीमापनाने नोंदले जाते.

प्राचीन स्थळांच्या संभाव्य स्वरूपानुसार उत्खननाची आखणी केली जाते. उत्खनन सर्वसामान्यपणे दोन प्रकारचे असते : एक, उदग्र उत्खनन. हे मर्यादित स्वरूपाचे असून पांढरीच्या टेकडावर एकच खड्डा घेऊन त्यातून विविध थर आणि त्यांत मिळणारा पुरावा यांच्या साह्माने त्या ठिकाणी झालेल्या वस्त्यांची कालमर्यादा निश्चित केली जाते. उदग्र उत्खननाचा उद्देश एखाद्या स्थळांच्या वस्त्यांचा कालक्रम जाणण्यापुरताच मर्यादित असल्याने यातून प्रत्येक वस्तीचे संपूर्ण स्वरूप कळून येत नाही. टेकाड खूप उंच असल्यास व वस्त्यांची कालमर्यादा कमी वेळात जाणून घ्यावयाची असल्यास पायरी खड्डे या तंत्राने उत्खनन केले जाते. यात एक खड्डा टेकाडाच्या माथ्यावर, दुसरा उतारावर व तिसरा पायथ्याच्या जवळपास आखतात. उतारावरील क्रमांक दोनच्या खड्ड्याच्या पृष्ठभागापर्यंत टेकाडाच्या माथ्यावर घेतलेला खड्डा खणला जातो. यामुळे खड्डा अगदी खोलपर्यंत खणण्याची आवश्यकता राहत नाही पण खड्डा १, २ व ३ यांच्यातून सर्वांत वरचा व सर्वांत खालचा थर कळल्याने पहिली वस्ती व शेवटची वस्ती यांची कालमर्यादा त्यांच्या थरांत सापडलेल्या अवशेषांच्या संदर्भात ठरविता येते. दोन, आयत उत्खनन. हे विस्तृत असते. मात्र प्रथम उदग्र उत्खनन व नंतर आयत उत्खनन अशी योजना नेहमीच अवलंबावी लागते. उदग्र उत्खननात वस्त्यांचा क्रम व त्यांचा काळ यांची कल्पना आल्यावर प्रत्येक वस्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी आयत उत्खनन योजले जाते. या प्रकारच्या उत्खननात संपूर्ण टेकाडावर खड्ड्यांची जाळी आखली जाते व अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक वस्तीचे अवशेष उत्खनित केले जातात. हे अवशेष नोंदून,छायाचित्रणे घेऊन, आरेखून झाल्यानंतर त्या आधीच्या वस्तीचे अवशेष काळजीपूर्वक खणून उघडे केले जातात. आयत उत्खननास वेळ लागतो. कामावर लक्ष ठेवण्यासाठी बरेच तज्ञ लागतात व योजनाही लागते. पाकिस्तानातील तक्षशिला व भारतातील नागार्जुनकोंडा ही आयत उत्खननाची उल्लेखनीय उदाहरणे होत.

उदग्र व आयत उत्खननांव्यतिरिक्त प्रत्येक स्थळाच्या स्वरूपानुसार इतर प्रकारे उत्खननाची योजना वा आखणी करावी लागते. तटबंदीयुक्त नगरीच्या उत्खननात वस्त्या व तटबंदीचे बांधकाम यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने या दोन भागांना जोडणाऱ्या खड्ड्यांची योजना करावी लागते. तीच गोष्ट स्मशान व नागरी वस्ती यांची असते. स्मशानाचा कालखंड व वस्त्यांचा कालखंड यांचा मेळ घालण्यासाठी जोडखड्ड्यांची आखणी करतात. स्तूपाच्या टेकाडाचे उत्खनन करावयाचे झाल्यास, टेकाडाच्या माथ्यावर एक व परिघावर चार दिशांना चार खड्डे आखून खणल्यास, स्तूपाचे स्वरूप, त्याचा व्यास, प्रदक्षिणापथ आढळल्यास त्याचे स्वरूप व माथ्यावरील खड्ड्यात छत्रावलीचे रूप या गोष्टींचा थोड्या वेळात शोध घेता येतो. त्यानुसार पुढील विस्तृत उत्खननाची आखणी करता येते. भारतातील महाश्मयुगीन शिळावर्तुळांचे उत्खनन ‘वृत्तपाद’ पद्धतीने करण्याचा प्रघात आहे. वर्तुळाचे चार विभाग करून समोरासमोरील विभांगांचे उत्खनन यात केले जाते. यामुळे वर्तुळात टाकलेल्या भरीचा सलग छेद उपलब्ध होतो व भरीचे निरनिराळे थर कोणत्या क्रमाने टाकले, हे कळून येते.

कोणत्याही योजनेचे उत्खनन असो, त्या प्रत्येकात थरांच्या नोंदणीला अत्यंत महत्त्व असते.  विसाव्या शतकात स्तरनिबद्ध उत्खनन द्दढमूल झाले आहे. प्रत्येक थर काळजीपूर्वक अभ्यासून त्याचा रंग, पोत, जाडी व त्याचे घटक यांची नोंदणी केली जाते. या आधी थरांचे स्वरूप जाणण्यासाठी आखलेल्या खड्ड्याच्या एका कोपऱ्यात लहान खड्डा घेऊन वरच्या दोनतीन थरांचे स्वरूप जाणून घेऊन त्यानुसार संबंध खड्ड्यात तो थर खणून काढण्यात येतो. त्यानंतर दुसरा लहान खड्डा खणला जातो.  या खड्ड्याला चाचणी खड्डा अथवा नियंत्रक खड्डा असे म्हणतात.

प्रत्येक थरात सापडलेल्या वस्तू वेगवेगळ्या ठेवल्या जातात. तत्पूर्वी प्रत्येक वस्तू वा अवशेषाची नोंदणी त्रिमितिमापनाने केली जाते व ती नोंदणी त्या वस्तूला जी चिठ्ठी बांधण्यात येते, त्यावर लिहून ठेवण्यात येते. प्रत्यक्ष उत्खनन संपल्यावर त्या नोंदणी माहितीवरून वृत्तांत लिहिण्यास मदत होते. खड्ड्याच्या छेदाचे छायाचित्रण व आरेखन केल्याने थरांचा क्रम व त्यांचे स्वरूप यांची नोंदणी कायम स्वरूपात होऊन वृत्तांतलेखनाला अत्यंत उपयुक्त ठरते.

उत्खनित खड्ड्याच्या दोन्ही बाजूंस त्रिमितिमापनास उपयुक्त ठराव्यात म्हणून सु. अर्ध्या मी.वर चौकोनी लाकडी खुंट्या ठोकण्यात येतात. त्याचप्रमाणे एका ठराविक पातळीनुसार वस्तू सापडलेल्या स्थळाची खोली मोजण्यासाठी एक समपातळी रेषा योजण्यात येते. यानुसार प्रत्येक अवशेषांची नोंद केली जाते. यामुळे प्रत्येक अवशेषांचा संदर्भ स्पष्ट होतो. थर, लांबी, रुंदी व खोली यांचा निर्देश न केलेली प्रत्येक वस्तू संदर्भविरहित ठरत असल्याने सांस्कृतिक उत्क्रम जाणण्याच्या दृष्टीने निरूपयोगी ठरते.

अशा तर्हेसने नोंदणी केलेल्या उत्खनित वस्तूचे वर्गीकरण योग्य रीत्या करणे ही बाब पुरातत्त्वविद्येत महत्त्वाची ठरते. उदा,.मणी सापडल्यास त्याचे वर्गीकरण आकाराच्या दृष्टीने केल्यास, त्याची कालनिबद्ध उत्क्रांती आणि काही आकारांची कालनिबद्ध पखरण कळून येते. अश्मयुगीन हत्यारांच्या बाबतीत तर हे वर्गीकरण महत्त्वाचे ठरते. त्यानुसार हत्यारप्रकारांची उत्क्रांती आणि त्यांची भौगोलिक पखरण समजण्यास फार मदत होते.

उत्खननांत सापडलेल्या पुराव्यांचे अर्थबोधन करण्याच्या कक्षा व्यापक झालेल्या आहेत. सुरुवातीला केवळ कलात्मक वस्तू वा अवशेष जमा करण्याच्या छंदात व्यापक अर्थबोधाने ध्येय नव्हते. अशा निवडलेल्या अवशेषांतून संपूर्ण जीवनपद्धतीचे चित्रण उभे करणे, हेही शक्य नव्हते परंतु कालांतराने, विशेषतः विसाव्या शतकात पुरातत्त्वविद्येचे ध्येय इतर शास्त्रांची मदत घेतल्याने अतिविस्तृत झाले आहे. मानवाशी संबंधित आणि मानवाने निर्मिलेल्या सर्व तऱ्हेच्या उत्खनित पुराव्याच्या साहाय्याने मानवाची निरनिराळ्या काळांतील जीवनपद्धती कशी होती, हा पुरातत्त्वविद्येचा उद्देश असल्याने उत्खनित लहानसहान पुराव्याची दखल पुरातत्त्वज्ञाला घ्यावी लागते. सबंध मानवी जीवनाचे सुसंगत चित्र उभे करण्यासाठी पुरातत्त्वज्ञाला इतर अनेक शास्त्रज्ञांची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. उदाहरण द्यावयाचे झाल्यास ते उत्खननांत सापडणाऱ्या मृत्पात्रांचे देता येईल. खापराच्या तुकड्यावरून त्या मडक्याच्या बनावटीचे तंत्र–हाताने चाकावर वा साच्याने– त्याच्या बनावटीत वापरलेली स्थानिक अथवा दुसरीकडील माती, त्याचा आकार, त्याचे माप, त्याचा संभाव्य वापर, ते मडके भाजण्यासाठी वापरण्यात आलेल्या भट्टीचे बंद वा उघडे स्वरूप, त्यावरील नक्षी व तिचे धार्मिक वा इतर स्वरूप, वैशिष्ट्यपूर्ण आकारानुसार सूचित केले जाणारे सांस्कृतिक व प्रादेशिक संपर्क आणि अत्यंत सुबक व किंमती असलेल्या मडक्याने सूचित केली जाणारी समाजरचना, या सर्वांच्या विचार करता येऊ शकतो. याकरिता मृत्पात्रज्ञ, मृद्पृथक्करणज्ञ,समाजशास्त्रज्ञ या व इतर अनेक तज्ञांची मदत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे काही वैशिष्ट्यपूर्ण मडकी कोणत्या थरात सापडली, याची नोंदणी केल्यास त्यांवरून त्या स्थळाची आकृतिबंध वसती, तिची आर्थिक बैठक यांबाबतचे निष्कर्ष काढता येणे शक्य होते.

उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांव्यतिरिक्त, काही शास्त्रीय तंत्रांच्या साहाय्याने पुरातत्त्वीय पुरावा हस्तगत करता येतो. उत्खननात काही वेळा जळलेल्या स्वरूपात धान्य मिळते व त्यावरून अन्नसंकलन, हवामान व शेतीच्या तंत्राचे स्वरूप याबद्दल निष्कर्ष काढता येतात पण काही वेळा धान्याच्या भुशाचे ठसे खापरावर आढळून येतात. यासाठी अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करून अशा खापरांची सूक्ष्म छायाचित्रे घेऊन ती मोठी केल्यास या पुराव्याचे यथार्थ स्वरूप जाणता येते. उत्खनित केलेली माती विशिष्ट तऱ्हेच्या चाळण्यांत घालून ती वाहत्या पाण्यात बुडविल्यास चाळणीत पाण्यावर धान्याचे दाणे तरंगताना दिसतात. याशिवाय विशिष्ट तंत्राने छायाचित्र घेणे, जनावरांच्या हाडांवर शस्त्राने कापलेल्या खुण्या आहेत का हे पाहणे, सांगाड्याची क्ष-किरणाने तपासणी करून मृत्युच्या संभाव्य कारणांचा शोध घेणे इ. तंत्रांचा वापर करून उत्खनित पुराव्यावरून तत्कालीन मानवी जीवनाचे व संस्कृताचे संपूर्ण चित्र उभे करणे, हे उत्खनित पुराव्यांच्या अर्थबोधावरून शक्य होत चालले आहे. मात्र याकरिता अनेक तंत्रज्ञांची व विविध शास्त्रवेत्त्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे.

पुरातत्त्वविद्येच्या क्षेत्रात सांघिक व संघटित कामाची आखणी अंगभूत ठरलेली आहे. यामुळे केवळ अवशेष मिळवून त्यांचे यथातथ्य वर्णन करणे, हे ध्येय कालबाह्म झालेले आहे. नवपुरातत्त्व हा एक अत्याधुनिक विचार पुढे आला आहे. याचे समर्थक अमेरिकेतील एक तरुण प्राध्यापक ल्युईस बिनफोर्ड हे आहेत. जुन्या वळणाच्या पुरातत्त्वज्ञांनी आतापर्यंत केलेले संशोधन केवळ वर्णनात्मक व म्हणूनच संकुचित आहे, असे नवपुरातत्त्वज्ञ म्हणतात. पुरातत्त्विद्येचा हेतू वर्णनात्मक राहिला नाही. पुरातत्त्वविद्येने  उपलब्ध पुराव्याचे स्वरूप स्पष्ट करून याची कारणमीमांसा काही गृहीतकांच्या साहाय्याने द्यावी, असे नवपुरातत्त्वाचे समर्थक सांगतात. मात्र असे करण्यात मर्यादित स्वरूपाचा पुरावा, व्यक्तिगत आवडी-निवडी व सिद्धांत यांपासून धोका असतो, हे नमुद करणे आवश्यक आहे.

पुरातत्त्वविद्या व पुरातत्त्वीय संशोधन यांच्या कक्षा विस्तारल्या आहेत. देश, राष्ट्र, धर्म, जाती यांच्या मर्यादा तिने झिडकारल्या असून मानव त्याच्या संस्कृतीचा इतिहास असा विशाल द्यष्टिकोन तिने पुरस्कारिला आहे. भारताच्या फाळणीनंतर काही बौद्धकलेची स्थळे पाकिस्तानात गेली व महत्त्वाची इस्लामी स्मारके भारतात राहिली. याचा अर्थ असा नव्हे, की त्याकडे त्या त्या शासनांनी व त्या त्या देशाच्या भिन्न धर्म असलेल्या लोकांनी दुर्लक्ष करावे. पुरातत्त्वीय संशोधनाने पुरस्कारिलेल्या व प्रत्यक्षात आणलेल्या या विशाल दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ईजिप्तमधील अबू सिंबेल येथील प्राचीन अवशेषांचे देता येईल. नाईच्या नदीवर बांधण्यात येणाऱ्या आस्वान धरणामुळे हे अवशेष बुडले गेले असते. ते वाचविण्यासाठी युनेस्कोने विविध राष्ट्रांच्या तज्ञांची मदत घेऊन ते दुसरीकडे उभे केले  व सर्व मानवजातीच्या हा सांस्कृतिक वारसा टिकविला. प्राचीन गुहाचित्रे उदा., लास्को, अल्तामिरा येथील अंजिठ्याची लेणी, ताजमहल इ. आंतरराष्ट्रीय तंज्ञांची मदत घेऊन जतन केली जात आहेत.

पुरातत्त्वाचा गैरवापर : काही राष्ट्रांनी पुरातत्त्वविद्येचा आधार घेऊन संकुचितपणा व आपल्याच जमातीचे वा राष्ट्राचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला हा धोकाही नमुद करणे आवश्यक आहे. हिटलरच्या काळी उभे  केले गेलेले आर्य श्रेष्ठत्व वा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांच्या आधारे पाकिस्तानच्या संस्कृतीचे प्राचीनत्व व भव्यता ठरविणे, ही अशा संकुचित दृष्टिकोनाची उदाहरणे होत. अर्थात हा पुरातत्त्वविद्येचा दोष नाही. एखाद्या विद्येचा वा शास्त्राचा उपयोग मानव कसा करतो, यावरच ते अवलंबून आहे.

पुरातत्त्वीय संशोधनात उपलब्ध झालेला पुरावा मानव कसा वापरेल हा भाग जरी बाजूला ठेवला, तरी या संशोधनाला अनेक व्यक्तींनी व सस्थांनी केवळ सांस्कृतिक संशोधन हे ध्येय ठेवून मदत केली आहे. मानवाचा व त्याच्या संस्कृतीच्या फार मोठा अशा सांघिक संशोधनाशिवाय अज्ञात राहिला असता.

एकोणिसाव्या शतकात यूरोपीय राष्ट्रांच्या अनेक संशोधन संस्थांनी ग्रीस, पश्चिम आशिया व ईजिप्त या विभागांत लक्षणीय काम केल्यानेच या विभागाच्या प्राचीन इतिहासाचे व संस्कृतीचे अद्वितीयत्व कळून आले. आग्नेय आशियातील देशांच्या पुरातत्त्वीय संशोधनाचा पायासुद्धा यूरोपीय तज्ञांनीच घातला. ब्रिटिश स्कूल आॅफ आर्किऑलॉजी, जर्मन आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूट, एकोल फ्रान्से द एक्सत्रिम ओरिएंट, ब्रिटिश म्यूझीयम, मेट्रो पोलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट, पॅलेस्टाइन एक्सप्लोरेशन फंड, इस्राएल एक्सप्लोरेशन सोसायटी, अमेरिकन स्कूल (अथेन्स) व इतरांनी या संशोधनाला हातभार लावला आहे. केवळ विद्वानांनाच नव्हे, तर राजकिय मुत्सद्यांनाही या विषयाचे महत्त्व पटले. पहिल्या नेपोलियनने ईजिप्तवर स्वारी केली (१७९८), तेव्हा त्याने आपल्याबरोबर अभियंता, पुरातत्त्वज्ञ व आरेखक नेले होते. ईजिप्त व इझ्राएल यांच्या युद्धात (१९६७) सिनाई वाळवंटातील जिंकलेल्या प्रदेशांत इझ्राएलने पुरातत्त्वज्ञांची एक तुकडीच पाठविली होती.

भारतीय पुरातत्त्वविद्येच्या प्रगतीला ब्रिटिशांनी मोठा हातभार लावला. प्राचीन इतिहासास उपयोगी पडेल, अशी सामग्री जमा करण्यात १७८४ साली स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीने पुढाकार घेतला. १८६० साली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याची स्थापना झाली आणि या खात्याने संशोधनात महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. याशिवाय विविध राज्यात पुरातत्त्वविषयक खाती व अभिलेखागारे प्रस्थापित करण्यात आली आहेत.

या शासकीय खात्यांव्यतिरिक्त गेल्या पंचवीस वर्षांत पुणे, अलाहाबाद, सागर, बडोदा, कलकत्ता, म्हैसूर, बनारस इ. ठिकाणच्या विद्यापीठांनी अनेक स्थळांचे समन्वेषण आणि उत्खनन करून पुरातत्त्वीय संशोधनाच्या प्रगतीस मदत केली आहे. संशोधन संस्थांत पुणे येथील डेक्कन कॉलेज अँड पोस्ट-ग्रँज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या कामाने आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेली आहे. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग या तिन्ही युगांबद्दलचा पुरावा डेक्कन कॉलेजने अत्यंत प्रगत तंत्राने उजेडात आणलेला आहे.

पुरातत्त्वविद्येने मानवी इतिहासात अमोल भर घातली असली, तरी पुरातत्त्वविद्येचे टीकाकार तिचा काही उपयोग नाही, किंबहुना ती निसर्गनियमांविरुद्ध काम करते असे मत मांडतात भूतकाळाचे अवशेष उकरून काढून काही फायदा नाही असे ते सांगतात. शिवाय उत्पत्ती आणि लय ही निसर्गनियती असल्याने अश्मास्थीसारखे अवशेष शोधून काढून ते टिकविणे हे नैसर्गिक प्रक्रियेविरुद्ध आहे, असे मत मांडले जाते. अर्थात ही टीका केवळ वैचारिक पातळीवरील आहे. पुरातत्त्वविद्येने जी मौलिक भर घातली आहे, तिचा विचार करता वरील टीका फोल ठरते.(चित्रपट २६).

संदर्भ : 1. Charles-Picard, Gilbert, Ed. Larousse Encyclopedia of Archaeology, New York, 1972.

2. Clark, Grahame, Archaeology and Society, London, 1957.

3. Cole, J. M.; Higgs, E. S. The Archaeology of Early Man, London, 1969.

4. Cottrel, Leonard, Ed. Concise Encyclopedia of Archaeology, London, 1970.

5. Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, New York, 1972.

6. Daniel, Glyn, The Origins  and Growth of Archaeology, New York, 1967 .

7. Edoux, Henri-Paul, In Serch of Lost Worlds, New York, 1971.

8. Leone, M. P. Contemporary Archaeology, London, 1975.

9. Taylor, Joan du Plat, Marine Archaeology, London, 1965.

10. Wolley, Leonard, Digging up the Past, London, 1970.

देव, शां. भा.

पुरातत्त्वविद्या