पुराजीव : (पॅलिओझोइक). भूवैज्ञानिक इतिहासाच्या मुख्य विभागांपैकी एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला पुराजीव महाकल्प व त्या महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या एकूण गटास पुराजीव गण म्हणतात. हा महाकल्प म्हणजे सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा कालावधी असून तीन महाकल्पांपैकी याने निम्म्याहून जास्त कालावधी (सु. ३५.५ कोटी वर्षे) व्यापला आहे. विपुल व निःसंशय जीवाश्म (शिळारूप झालेले जीवांचे अवशेष) असणार्यास गणांपैकी पुराजीव गण सर्वांत जुना आहे व त्याच्यातील जीवाश्म हे अतिप्राचीन जीवांचे आहेत. जीवाश्मांच्या स्वरूपावरून या गणाचे व महाकल्पाचे पूर्व म्हणजे खालचा किंवा जुना व उत्तर म्हणजे वरचा किंवा अधिक नवा असे दोन भाग व त्या प्रत्येकाचे तीन उपविभाग (संघ व कल्प) केले जातात. त्यांची प्रचारात असलेली नावे कोष्टकात अनुक्रमाने दिली आहेत. या सर्व उपविभागांतील जीवांची आणि प्रमुख घ़डामोडींची माहिती दिलेली आहे.
पुराजीवाचे उपविभाग
विभागाचे नाव |
कल्पाचा अवधी |
विभागाचे वय |
|
(संघ किंवा कल्प) |
(कोटी वर्षे) |
(कोटी वर्षे) |
|
उत्तर |
(६)पर्मियन |
३ |
२७.५ |
(५)कार्बॉनिफेरस |
४ |
३५ |
|
(४)डेव्होनियन |
४.५ |
४० |
|
पूर्व |
(३)सिल्युरियन |
२ |
४२ |
(२) ऑर्डोव्हीसियन |
५ |
४९ |
|
(१)कँब्रियन |
९ |
६० |
जीवसृष्टी व भौगोलिक परिस्थिती : पूर्व पूराजीव महाकल्प म्हणजे सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाया) प्राण्यांचा काळ असे म्हणता येईल. अपृष्ठवंशी सागरी प्राण्यांचे सर्व संघ त्या काळात होते. ग्रॅप्टोलाइट, ब्रॅकिओपॉड व ट्रायलोबाइट ह विपुल आणि प्रवाळ, क्रिनॉइडिया, सिस्टिडिया व सरळ किंवा किंचित सर्पिल कवचे असणारे नॉटिलॉइडिया हे त्या काळातील प्रमुख गट होत. पृष्ठवंशी प्राणी व जमिनीवरील वनस्पती ही तेव्हा जवळजवळ नव्हती. उत्तर पुराजीव काळात मत्स्यांची व जमिनीवरील वनस्पतींची प्रगती होऊन ती विपुल झाली व त्याच्या उत्तर काळात उभयचरांचा (जमिनीवर व पाण्यात राहणाया प्राण्यांचा) उदय होऊन वाढ झाली. उभयचरांनंतर सरीसृपांचा (सरपटणार्या प्राण्यांचा) उदय झाला. या महाकल्पातील सागरातील प्राण्यांमध्ये प्रवाळ, क्रिनॉइडीया व ब्रॅकिओपोडा हे विपुल असत. नॉटिलॉइडिया एकंदरीत बरेच होते व त्यांच्या पूर्णपणे सर्पिल कवचे असणाया जातींची वाढ झाली. गोनियाटाइट अवतरून विपुल झाले. बायव्हाल्व्हिया (शिंपाधारी) व गॅस्ट्रोपोडा (शंखधारी) यांची वाढ झाली. ट्रायलोबाइट आणि सिस्टिडिया यांचा न्हास झाला. ग्रॅप्टोलाइट निर्वंश झाले होते पण डेंड्रॉइडिया मात्र कार्बॉनिफेरस कल्पापर्यंत टिकून राहिले होते.
पुराजीव महाकल्पाच्या मध्याच्या सुमारास यूरोपातील आल्प्सच्या उत्तरेकडील व उरल पर्वत असलेल्या प्रदेशात आणि हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या आशियाच्या प्रदेशात सागराने व्यापलेल्या विस्तीर्ण ⇨ भूद्रोणी होत्या. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागातही तशाच भूद्रोणी होत्या. शिवाय वरील खंडांतील विस्तीर्ण क्षेत्रावर उथळ समुद्राचे पाणी पसरले होते. कार्बॉनिफेरस कल्पात सुरू होऊन पर्मियन कल्पाच्या अखेरीपर्यंतच्या काळात सविराम घडून आलेल्या गिरिजनक (पर्वत निर्मिणार्यार) हालचालींमुळे (हेर्सीनियन, ॲपलेचीयन) भूपृष्ठावर प्रचंड फेरफार घडून आले. भूद्रोणी असलेल्या क्षेत्रास घड्या पडल्या व त्यांचे काही भाग उचलले जाऊन समुद्राच्या बाहेर आले. खंडांवर पसरलेल्या उथळ सागरांचे पाणीही ओसरले. त्यामुळे मध्यजीव महाकल्पाच्या सुरुवातीस सागरांचे क्षेत्र कमी होऊन जमिनीच्या क्षेत्रात बरीच भर पडली. अशा भौगोलिक फेरफारांबरोबर सागरी परिस्थितीतही फेरफार झाले व सागरात राहणाया प्राण्यांवर त्यांचा प्रतिकूल परिणाम झाला. उत्तर पुराजीव महाकल्पात राहणार्या प्रवाळ, एकायनोडर्माटा, आर्थ्रोपोडा, ब्रायोझोआ व ब्रॅकिओपोडा यांचे बहुतेक वंश लोप पावले. जमिनीवरील प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या विकासात मात्र असा खंड पडला नाही व त्यांचे पुष्कळसे वंश पुढील महाकल्पाच्या प्रारंभीच्या काळात टिकून राहिले.
कार्बॉनिफेरसाच्या अखेरच्या व पर्मियनाच्या सुरुवातीच्या (सु.३१ ते २७ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात दक्षिणेकडील खंडांचे व भारताच्या द्वीपकल्पाचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) अतिशीत होते आणि त्यांच्या कित्येक क्षेत्रावर हिम-बर्फाचे आच्छादन होते. त्याच वेळी उत्तर गोलार्धातील जलवायुमान उबदार होते. त्यानंतर भारताच्या द्वीपकल्पाचे व दक्षिणेतील खंडांचे जलवायुमान उबदार व दमट होऊन त्यांच्या विस्तृत क्षेत्रात ग्लॉसोप्टेरीस वनश्रीची वने वाढली व वनस्पतीचे अवशेष साचून दगडी कोळशाचे थर तयार झाले. त्याच वेळी उत्तर गोलार्धातील वनश्री वेगळी म्हणजे मुख्यतः लेपिडोडेंड्रॉन, सिजिलॅरिया, कॅलॅमाइट व ग्लॉसोप्टेरिसाखेरीज कित्येक टेरिडोस्पर्मी इत्यादींची होती. म्हणजे पृथ्वीवर उत्तर व दक्षिण अशा प्रकारचे दोन भिन्न वनस्पति-प्रदेश तेव्हा होते.
“