पुरंदर : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक प्रसिद्ध व बळकट डोंगरी किल्ला. तो पुण्याच्या दक्षिणेस सु. ४० किमी.वर व सासवडच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी.वर एका उंच टेकडीवर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,३९८ मी. असून त्याच्या पूर्वेस भैरवखिंडीच्या पलीकडे वज्रगड किंवा रुद्रमाला हा छोटा पण मोक्याचा किल्ला आहे. पुरंदर, बालेकिल्ला व माची या दोन भागांत असून बालेकिल्ला माचीपेक्षा सु. ७० मी. उंच आहे. येथे सपाटी अगदी कमी असून फक्त केदारेश्वर मंदिर ही महत्त्वाची वास्तू आहे. पुरंदरची मुख्य वस्ती माचीवर असून तेथे जुन्या–नव्या अनेक वास्तू आहेत. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सहा चौ. किमी. असून सभोवती भिंतींची लांबी ४२ किमी. आहे. जुन्या वास्तूंत दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा व चोर दरवाजा ही तीन प्रमुख द्वारे खंडकडा, बावटा, फत्तेह, कोंकणी, हत्ती इ. सहा बुरूज दोन मनोरे, साखरी तलाव, मुकारशी तलाव, म्हसोबाची टाकी, महादेव मंदिर इत्यादींचा समावेश असून दगडी अंबरखाने, जुना राजवाडा, पुरंदऱ्याचा वाडा, सवाई माधवरावांच्या जन्मस्मरणार्थ बांधलेले देऊळ वगैरेंचा अंतर्भाव होतो. नव्या वास्तूंत माचीवरील लष्करी कँटोनमेंटच्या विविध इमारती, आरोग्यधाम, रुग्णालय, ईगल्स नेस्ट-बंगला, दर्गा तसेच मुरारबाजी देशपांडे या शूर योध्द्याचा भव्य पुतळा इ.प्रसिद्ध आहेत. इंग्रजी अंमलात सदर्न कमांड या लष्करी तुकडीचे ते एक महत्त्वाचे केंद्र होते.
हा किल्ला निश्चितपणे कुणी व केव्हा बांधला याविषयी विश्वासार्ह माहिती ज्ञात नाही तथापि बाराव्या-तेराव्या शतकांत तो बांधला असावा, असे काही अवशिष्ट पुराव्यांवरून दिसते. बहमनी राजा अलाउद्दीन हसन गंगू याने १३५० मध्ये त्याची तटबंदी मजबूत केली व पुढे महमूदशाह या बहमनी राजाने तेथे अर्धचंद्राकृती बुरूज बांधले (१३८४). अहमदनगरच्या मलिक अहमदने तो घेतला (१४८६) आणि पुढे जवळजवळ शंभर वर्षे तो निजामशाहीकडे होता. मालोजी भोसलेस तो १५९६ मध्ये इतर जहागिरींबरोबर मिळाला. मधली काही वर्षे सोडता तो शहाजी व पुढे शिवाजीकडे होता. शिवकाळात त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मोगल सरदार जयसिंग व दिलेरखान यांनी १६६५ मध्ये त्यास वेढा दिला. या वेढ्यात शिवाजीचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठा परक्रम करून धारातीर्थी पडला. मोगलांनी किल्ला काबीज केला व शिवाजीने मोगलांबरोबर तह केला. शिवाजीने पुन्हा तो १६७० मध्ये घेतला पण औरंगजेबाने दक्षिणेच्या स्वारीत तो जिंकला (१७०५). त्यानंतर तो पुन्हा मराठ्यांकडे आला. प्रथम ताराबाईच्या वतीने शंकर नारायण सचिव याने तो काबीज केला (१७०७). शाहूने तो बाळाजी विश्वनाथला बक्षीस दिला (१७१४)व पेशवाईत तो एक महत्त्वाचा किल्ला ठरला. रघुनाथरावाने तो पुरंदरे सरदाराला दिला (१७६४). बारभाईंच्या कारस्थानाची सर्व सूत्रे नाना फडणीसाने येथूनच हालविली. पुढे सवाई माधवरावांचा जन्म येथेच झाला. यानंतर इंग्रज-मराठे तह झाला. तो ‘पुरंदर तह’ म्हणून प्रसिद्ध आहे (१७७६). पेशव्यांचे उन्हाळ्यातील थंड हवेचे स्थळ म्हणूनही त्यास प्रसिद्धी मिळाली. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि ब्रिटिशांनी तेथे लष्करी तळ उभारिला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील एक गिर्यारोहण लष्करी प्रशिक्षण केंद्र म्हणून त्यास महत्त्व प्राप्त झाले.
देशपांडे, सु. र.
“