पुंस्त्वविद्या : (अँड्रोलॉजी). पौरुषत्वाशी संबंधित असलेल्या नरातील इंद्रियांचा व त्यांच्या रोगांचा अभ्यास, याला पुंस्त्वविद्या ही संज्ञा आहे. प्रस्तुत नोंंदीतील विवरण पाळीव पशूच्या पुरतेच मर्यादित ठेवले आहे. मनुष्यमात्रातील व इतर प्राण्यांच्या संबंधीची माहिती ‘जनन तंत्र’ व ‘प्रजोत्पादन’ या नोंंदींमध्ये दिली आहे.
पाळीव पशूंमधील प्रजोत्पादन हेतुपुरस्स अर्थोत्पादनासाठी करण्यात येत असल्याने व उत्पादनाशी संबंधित आनुवंशिक गुणधर्म बहुतांशी नराकडून प्रदान केले जात असल्यामुळे प्रजोत्पादनातील नराचे कार्य महत्त्वाचे आहे. गाय आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त ६ ते ८ वासरांना जन्म देते, यामुळे तिचा चांगला किंवा वाईट प्रभाव तेवढ्या प्रजेपुरता मर्यादित राहतो. याउलट एका वळूच्या त्याच्या आयुष्यात १,००० व कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीचा अवलंब केल्यास लाखापेक्षा अधिक वासरांवर हा प्रभाव पडू शकतो. कमीअधिक प्रमाणात पाळील पशूंच्या इतर जातींमध्ये हेच घडत असते. त्यामुळे पशुपालनामध्ये पुंस्त्वविद्येच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे.
वळूचे (नराचे) प्रजोत्पादन तंत्र : या ठिकाणी वळू हा शब्द व्यापक अर्थाने पशूंच्या सर्व जातींतील प्रजननक्षम नर या अर्थी वापरला आहे. प्रजोत्पादन तंत्रातील (प्रजाेत्पादन संस्थेतील) वृषण (नरातील जननपेशी–शुक्रायू–तयार करणारे इंद्रिय) हे प्रमुख इंद्रिय असून अधिवृषण (वृषणाच्या वरच्या बाजूस असलेला चिंचोळा लांबट भाग), मुष्क (वृषण ज्यात असतात ती त्वचेची पिशवी), रेतोवाहिनी, रेताशय, अष्ठीला(प्रोस्टेट) ग्रंथी, कंदमूत्रमार्ग ग्रंथी(कुपर ग्रंथी विल्यम कूपर या इंग्लिश शस्त्रक्रियाविशारदांच्या नावाने ओळखण्यात येणारी ग्रंथी) व शिश्न ही पुरक इंद्रिय आहे.
वृषण : वृषण दोन असतात व ते मुष्कामध्ये संरक्षित असतात. गर्भावस्थेत वृषणांची प्राथमिक वाढ गर्भाच्या उदरगृहेत (पोटाच्या पोकळीत) होते. गर्भावस्था संपण्याच्या सुमारास वृषण वंक्षणनालातून (उदरगुहेच्या खालच्या बाजूस असलेल्या बाहेर जाणाऱ्या मार्गातून) मुष्कात उतरतात. बहुतेक पाळीव पशूंमध्ये वृषण दोन्ही जाघाच्या मध्यभागी शरीराबाहेर मुष्कात लटकलेले असतात. हत्ती व इतर काही सस्तन प्राण्यांतही ते उदरगुहेत असतात. कोंबड्यात व अन्य पक्ष्यांत मात्र ते उदराच्या पोकळीतच असतात. काही प्राण्यांत संयोग मोसमात वृषण बाहेर असतात व एरवी ते उदरांतर्गत असतात.
सामान्यतः ज्या प्राण्यांचे वृषण गुहेबाहेर असतात अशा प्राण्यांचे वृषण उदरांतर्गत राहिल्यास प्रजोत्पादनक्षमता नष्ट होते. एक वृषण उदरांतर्गत राहिल्यास प्रजोत्पादनात व्यत्यय येत नसला, तरी हो दोष आनुवांशिक असण्याची शक्यता लक्षात घेता असा वळू प्रजननासाठी वापरत नाही.
मादीच्या गर्भाशयातील अंडाणूच्या (मादी जनन पेशीच्या) फलनासाठी अत्यावश्यक असलेल्या नराकडून मिळणाऱ्या शुक्राणूंचे उत्पादन वृषणातील सूक्ष्म रेतोत्पादन नलिकांमध्ये होते. या नलिकांच्या भित्तीमध्ये उपकलांचे (जवळजवळ रचना असलेल्या काशिकांच्यामुळे– म्हणजे पेशींच्यामुळे बनलेल्या ऊतकाचे–कोशिकासमूहाचे) अनेक थर असतात. यातील तळाच्या थरामध्ये शुक्राणुजनक कोशिका (आदिजनन कोशिका) असतात. सूत्री विभाजनाने [शरीरातील कोशिकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याच्या-एका कोशिकेपासून अनेक कोशिका तयार होण्याच्या –विशिष्ट पद्धताने → कोशिका] या कोशिकांपासून पूर्वशूक्रांणुकोशिका तयार होतात. या कोशिकांमध्ये गुणसूत्रे (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणेे नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) जोडीने असून त्यांची संख्या मूळ कोशिकेमधील संख्येएवढीच असते. या कोशिकांचे दोनदा अर्धसूत्री विभाजन (शरीरातील लैंगिक कोशिकांच्या संख्येची वाढ होताना गुणसूत्राचे निम्मे विभाजन होण्याची विशिष्ट पद्धत) होऊन त्यापासून चार उपशुक्राणुकोशिका तयार होतात. त्यांच्यातील गुणसूत्रांची संख्या मात्र मूळ संख्येच्या निम्मी म्हणजे एक गुणित असते. या उपशुक्राणुकोशिकांचे पुढे शुक्राणूमध्ये स्थित्यंतर होते व अंडाणूशी मीलन झाल्यावर युग्मनज (शुक्राणू आणि अंडाणू या दोन जननकोशिकांच्या संयोगाने तयार होणारी नवीन कोशिका) तयार होतो व त्यातील गुणसूत्रांची संख्या मूळ संख्येइतकीच म्हणजे द्विगुणित होते, कारण निम्मे गुणसूत्रे अंडाणूपासून प्राप्त होते.
वृषणाच्या मध्यभागी रोतोत्पादन नलिका एकमेकींना जोडलेल्या असतात व तेथून अपवाही (बाहेर जाणाऱ्या) वाहिन्यांच्याद्वारे अधिवृषणाकडे शुक्राणू वाहून नेले जातात. शुक्राणूंच्या उत्पादनखेरीज वृषणामध्ये टेस्टोस्टेरोन या (उत्तेजक अंतःस्त्रावाचे)उत्पादन होते [→हॉर्मोने]. या हॉर्मोनाचे कार्य प्रजोत्पादन तंत्रातील सर्व अंगांचा विकास व लैंगिक लक्षणे व्यक्त करणे हे आहे. सांडामधील भव्य आकारचे वशिंड, डोक्याचा आकार, कपाळावरील कुरळे व खरखरीत केस, आवाजीतील भरदारपणा, डुकरातील सुळ्यांची वाढ इत्यांदीसारखी लैगिक लक्षणे सर्व जातींंच्या वळूंमध्ये दिसून येतात. या हॉर्मोनाचे उत्पादन व वृषणातील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्राणू तयार होऊ लागण्याचे वय हे पशूंच्या जातीनुसार निरनिराळे असणे साहजिकच आहे. इतकेच काय एकाच जातीच्या पशूंमधील निरनिरळ्या अभिजातींमध्येही (अस्सल जातींमध्येही) या वयात फरक आढळून येतो. हवेतील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश त्याचप्रमाणे त्या जातीतील माद्यांच्या माजावर येण्याच्या ऋतू यांनुसार नराच्या शुक्रोत्पादनामध्ये चढउतार होत असल्याचे दिसून आले आहे.द्व
मुष्क : मुष्क म्हणजे वृषणाचे रक्षण करणारी त्वचेची पिशवी. वृषणांच्या रक्षणाखेरीज त्यांच्या तापमानाचे नियंत्रण करण्याचे कार्य मुष्कामुळे होते. मुष्कपर्युदर(उदरातील इंद्रियांवरील पातळ आवरणाचा मुष्कात आलेला भाग), प्रावरणी(थरांनी बनलेले) मुष्कावरण (पांढऱ्या चिवट तंतुमय दोट ऊतकाचे आवरण) या मुष्कामधील पटलांमुळे वृषणांचे तापमानाचे नियंत्रण होते. उदरगुहेतील तापमानापेक्षा वृषणाचे तापमान १० ते ८०से. कमी असते.मुष्कावरण त्वचेच्या लगत असून त्याचा दोन वृषणांमध्ये पडदा तयार होऊन मुष्काचे दोन भाग होतात व प्रत्येक भागामध्ये एक वृषण असतो. यांशिवाय मुष्कावरणामध्ये अरेखित (अनैच्छिक) स्नायूंचे दोन थर असतात. हा डॉरटोस नावाचा स्नायू हवेतील तापमानाच्या बाबतीत संवेदनशील आहे. या स्नायूच्या कार्यामुळे हिवाळ्यात व सकाळच्या गारव्याच्या वेळी मुष्क संकुचित होऊन वृषण अंगालगत आणले जातात. याउलट उन्हाळ्यात मुष्क सैल पडते व वृषण अंगापासून बरेच दूर राहतात. वृषणाचे तापमान वाढल्यास विकृत अथवा मृत शुक्राणुंचे उत्पादन वाढते. मेंढ्याच्या मुष्काला विसंवाही (उष्णता-विरोधी) वेष्टन बांधले असता थोड्याच दिवसांत त्याला वंधत्व (वांझपणा) येते आणि ते काढून टाकल्यावर एक ते तीन महिन्यांच्या अवधित तो पुन्हा प्रजननक्षम होतो. वृषणाचे तापमान हे निरनिरळ्या पशुंमध्ये त्यांचे मुष्क व पर्यायाने त्यातील वृषण शरीरापासून किती जवळ अगर लांब आहेत यावर अवलंबून असते. तसेच मादीच्या जननमार्गात सुपूर्त झालेले शुक्राणू तेथे किती काळापर्यंत जिवंत राहू शकतात हे वृषणाच्या तापमानावर अवलंबुन असते. गायीच्या जननमार्गात शुक्राणू २४ ते ३० तासच जिवंत राहू शकतात याचे कारण वळूचे (सांडाचे) मुष्क लोबंते व शरीरापासून थोडे लांब असते. याउलट घोड्याचे मुष्क शरीरालगत असल्यामुळे त्याचे शुक्राणू घोडीच्या जननमार्गात ४८ तास जिवंत राहतात. कोंबडीच्या जननमार्गात ते १५ दिवस, तर मादी टर्की पक्ष्यामध्ये ३० दिवसांपर्यंत जिवंत राहतात.
अधिवृषण : वृषणाच्या वरच्या बाजूस असलेल्या चिंचोळ्या लांबट भागाला अधिवृषण म्हणतात. हा भाग वर उल्लेखिलेल्या वृषणातून येणाऱ्या अपवाहिनीच्या वलयामुळे बनलेला असतो. ही वाहिनी सुटी केल्यास त्याची लांबी काही प्राण्यांत कित्येक मीटर असते. सांडामध्ये तिची लांबी ४० ते ६० मी. असते. वृषणाच्या रेतोत्पादन नलिकात तयार होणारे शुक्राणू या वाहिनीमधून प्रवास केल्यावर रेतोवाहिनीमध्ये जातात. अधिवृषणांत शुक्राणू आल्यापासून ते रेतोवाहिनीत जाण्यास सांडामध्ये २१ दिवस, तर मेंढ्यामध्ये ५ ते ६ दिवस लागतात. या प्रवासात ते परिपक्व होतात. अधिवृषणामध्ये शिरणाऱ्या शुक्राणूंच्या ग्रीवेमध्ये (मानेसारख्या भागामध्ये) एक कोशिकाद्रव्यी बिंदुक( कोशिकेतील केंद्रकाव्यतिरिक्त असलेला जीवनावश्यक घटकाचा छोटा बिंदू) असतो. हा बिंदुक अधिवृषणातील प्रवासामध्ये शुक्राणूच्या पुच्छाकडे सरकत जातो व अखेरीस तो नष्ट होतो. जोपर्यंत हा बिंदुक शूक्राणूत असतो तोपर्यंत शुक्राणू अपक्व व अचल असतो. अधिवृषणामध्ये शुक्राणू साठवले जातात. मैथुनक्रियेच्या वेळी ते रेतोवाहिनीत ढकलले जातात. मैथुनक्रियेच्या अभावी त्यांचा ऱ्हास होऊन त्यांचे अभिशोषण केले जाते.
रेतोवाहिनी : अधिवृषणाच्या शेवटाच्या भागातून( ज्याला अधिवृषणाचे पुच्छ म्हणतात) शुक्राणू वाहून नेण्याचे कार्य रेतोवाहिनी करते. प्रत्येक वृषणापासून एक अशा दोन रेतोवाहिन्या असतात. या वाहिन्यांचा अखेरचा भाग म्हणजे त्या मुत्रवाहिनीला मिळतात त्यालगतचा भाग. हा किंचित जाड असतो व त्यास तुबिंका म्हणतात. तुबिंकामध्ये सूक्ष्म ग्रंथी असून त्या विशिष्ट स्रावाचे उत्पादन करतात. कृत्रिम रीत्या वीर्य काढून घेताना या तुंबिकांना मालीश केल्यास स्खलन लवकर होते. अर्थात हे मोठ्या जनावरातच शक्य असते. सांड, घोडा व मेंढा या प्राण्यात तुंबिका असते पण ती डुकरामध्ये असत नाही. बंधनाने किंवा कापूस रेतोवाहिनी खंडित केल्यास मुत्रवाहिन्यापर्यंत शुक्राणू पोहचू शकत नाहीत व त्यामुळे वळू प्रजननक्षम राहत नाही.
रेताशय : नरातील पूरक लैंगिक ग्रंथीपैकी ह्या सर्वांत मोठ्या ग्रंथी असून त्या ग्रंथिल (गाठाळ) नलिका असतात. वस्तुतः त्या रेतोवाहिनीच्याच फाट्याच्या स्वरूपात असतात व त्यांचा स्राव मूत्रवाहिनीमध्ये निराळ्या नलिकांद्वारे नेला जातो. रेतातील बहुतांशी द्रव याच ग्रंथीत तयार होतो. या ग्रंथीच्या स्रावाचा उपयोग रेताचा व्याप (आकारमान) वाढविणे व त्यायोगे शुक्राणूंच्या हालचालीस सुलभता आणणे हा आहे. हा स्राव बहुधा क्षारधर्मी (अल्कधर्मी) असतो. क्वचित थोडा अम्लीय असू शकतो. शिवाय यातील फुक्टोजामुळे शुक्राणूंचे पोषणही होते. कुत्रा व मांजर या प्राण्यांत या ग्रंथी नसतात.
अष्ठीला ग्रंथी : आकारमानाने लहान असलेल्या या ग्रंथीचे मूत्राशयाच्या तोंडाशी मुत्रवाहिनीच्या भोवती वेष्टन असते. या ग्रंथीपासून निघणाऱ्या सु. ३० वाहिन्या ग्रंथीचा स्राव मूत्रवाहिनीत सोडतात. वृषण काढुन टाकलेल्या जनावरात ही ग्रंथी निष्क्रिय होते.
कंदमूत्रमार्ग किंवा कूपर ग्रंथी : अष्ठीला ग्रंथीच्या मागील बाजूस मूत्रमार्गाच्या परिसंकोची स्नायूमध्ये (मूत्रमार्गाचे तोंड बंद करणाऱ्या कंकणाकृती स्नायूमध्ये) ही ग्रंथी असते. या ग्रंथीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. स्खलनाच्या सुरुवातीस या ग्रंथीच्या स्रावाचे प्रमाण अधिक असते यावरून मूत्रमार्गाचे शूक्राणू गेल्यावर त्यांच्यावर अपायकारक परिणाम करणारा मूत्राचा अंश निर्गुण करणे व मूत्रमार्ग स्वच्छ करणे हे या ग्रंथीचे काम असावे, असा समज आहे. कुत्रा व मांजर या प्राण्यात ग्रंथी नसते.
शिश्न : हे नराचे जननेंद्रिय असून ते शरीराबाहेर असते. ते उत्थानक्षम ऊतकाचे बनलेले असून ऊतकातील लहान लहान पोकळ्यांमध्ये उत्थापनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रक्त मावण्याची सोय असते. सामान्यतः ते सैल असते पण संभोगाच्या वेळी रक्तसंचयामुळे ते ताठ होऊन योनिमार्गात त्याचा प्रवेश सुलभ होतो. शिश्नाच्या टोकाच्या अतिसंवेदनशील भागाला शिश्नमणी म्हणतात. शिश्नमणिच्छदामुळे (शिश्नावरील त्वचेच्या आवरणामुळे) शिश्नाचे संरक्षण होते. शिश्नमण्याच्या मध्यातून मूत्रमार्ग जातो व त्यामधूनच रेत मादीच्या जननमार्गात फवारले जाते. सांडाच्या शिश्नाच्या मुष्काच्या मागील बाजूच्या भागात इंग्रजी s या अक्षराच्या आकाराचे वळण असते. डुकरामध्ये हे वळण मुष्काच्या पुढील भागातील शिश्नाला असते. मेंढ्याच्या शिश्नमण्याला दोऱ्यासारखे एक उपांग (अवयव) असते, तर कुत्राच्या शिश्नामध्ये १० सेमी. पर्यंत लांबीचे हाड असते.
रेतोत्पादन व हॉर्मोने : रेतोत्पादनाची संपूर्ण क्रिया शरीरात तयार होणाऱ्या हॉर्मोनांच्या नियंत्रणाखाली होते. तथापि याबाबतीत सांगोपांग माहिती उपलब्ध नाही. वळूसंबंधीची माहिती अगदीच तोकडी आहे. प्रायोगिक प्राण्यांवरील व वळूसंबंधी झालेल्या संशोधनावरून खालील माहिती मिळते.
वृषणात असणाऱ्या लायडिख नावाच्या (फ्रांट्स फोन लायडिख या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) विशिष्ट कोशिका टेस्टोस्टेरोन या हॉर्मोनाचे उत्पादन विशिष्ट वयाला सुरू करतात. हे सुरू करण्यासाठी या कोशिकांवर पोष ग्रंथीत (मेंदुच्या खालच्या टोकाला असलेल्या अंत:स्रावी ग्रंथीत) तयार होणाऱ्या ल्युटिनायझिंग हॉर्मोनाचा प्रभाव पडतो. सांडामध्ये जन्मानंतर थोड्या अवधीत ⇨ पौरुषजन (अँड्रोजेन) हॉर्मोनांचे उत्पादन सुरू होऊन तो २ ते ३ वर्षांचा होईपर्यंत हे उत्पादन वाढत जाते. पौरुषजन हॉर्मोनांपैकी टेस्टोस्टेरोन या हॉर्मोनांच्या प्रभावामुळे या कोशिका फ्रक्टोज तयार करतात. पौष ग्रंथीच्या अग्रखंडात पुटकोद्दीपक (वृषणातील रेतोत्पादक नलिकांतील कोशिकांच्या उत्तेजनास कारणीभूत होणारे) हॉर्मोन तयार होते. व याच्या प्रभावामुळे वृषणातील शुक्राणुजनक कोशिकांचे विभाजन सुरू हेते. रेतोत्पादनचे कार्य पायरीपायरीने खालीलप्रमाणे चालते.
(१) यौवनारंभी ल्यूटिलाझिंग हॉर्मोनाच्या लायडिख कोशिकांवरील परिणामाने पौरुषजन हॉर्मोनांचे उत्पादन होते.
(२) पौरुषजन हॉर्मोनांचे प्रभावामुळे रेतोत्पादक नलिकांवर पुटकोद्दीपक हॉर्मोनाची प्रक्रिया होऊ शकते.
(३) पुटकोद्दीप हॉर्मोनाच्या प्रभावामुळे शुक्राणुजनक कोशिकांचे विभाजन सुरू होते व शुक्राणूंच्या उत्पादनास चालना मिळते.
(४) यानंतर रेतोत्पादनाचे–शुक्राणूंच्या उत्पादनाचे–कार्य पुटकोद्दीप, ल्यूटिनायझिंग, वृषणातील पौरुषजनव ⇨ स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन)
या हॉर्मोनांच्या सामूहिक समतोलामुळे चालू राहते. वृषणांत अल्पांशाने स्त्रीमदजन हॉर्मोनाचे उत्पादन होते पण या हॉर्मोनाचे नरामध्ये काय कार्य असावे याविषयी निश्चित माहिती नाही.
याखेरीज अधिवृक्कात(मूत्रपिंदाच्या भागावर असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीत) तयार होणाऱ्या हॉर्मोनांमुळे पौरुषत्व व्यक्त होते. वरवर पाहता अवटू ग्रंथीचा (गळ्याच्या खालच्या बाजूस असलेल्या अंतस्रावी ग्रंथीचा) रेतोत्पादनाशी घनिष्ट संबंध नसावा. तथापि या ग्रंथीच्या अंतःस्रावातील थायरोप्रथिन हा घटक आहारातून मेंढ्यांना दिल्यास उन्हाळ्यात त्यांच्या रेतोत्पादनात वाढ होते, असे दिसून आले आहे.
शुक्राणू : प्रजोत्पादन तंत्राचे मुख्य कार्य रेतोत्पादन हे आहे व रेतातील घटक शुक्राणू होत. शुक्राणूंचे जनन वृषणामध्ये कसे होत, हे वर आलेच आहे. शुक्राणू ही शरीरातील विशेषाकृत कोशिका असून तिचे विभाजन अगर वाढ होत नाही. तिचा आकार ⇨मैकेरासारखा असतो व स्थूलमानाने तिचे शीर्ष, ग्रीवा व पुच्छ (शेपटी) असे तीन भाग असतात. सामान्यतः सर्व पशूंतील शुक्राणूंची रचना बव्हंशी सारखीच असते व त्यांचे उत्पादनही विपुल असते.घोड्यामध्ये एका स्खलनामध्ये ६ ते ८ कोटी शुक्रणू असावेत असा अंदाज आहे. शीर्षाचा बहूतेक भाग केंद्रकाने (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाने) व्यापलेला असून केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात. रासायनिक दृष्ट्या गुणसूत्रातील बहुतेक भाग डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल [→ न्यूक्लिइक अम्ले] असतो. संततीचा आनुवांशिक पिंडधर्म निश्चित करण्याचे कार्य या अम्लाने बनलेल्या जीनांच्या[→ जीन] द्वारे होते आणि त्यांच्या रचनेवर हे कार्य अवलंबून असते. युग्मनजाचे लिंग निश्चित करणारी विशिष्ट गुणसूत्रे शुक्राणूतच असतात. अंडाणूच्या संयोग नरधारक किंवा मादीधारक शुक्राणूंशी होतो यावर संततीचे लिंग अवलंबून राहते. पुच्छ हा शुक्राणूचा सर्वांत लांब भाग असतो व त्याच्या हालचालीमुळे शुक्राणू पुढे सरकू शकतो. रेतामध्ये अनेक शुक्राणूंच्या पुच्छांच्या हालचालीमुळे लाटा उत्पन्न होतात. पुच्छांचे मध्यांग, मुख्यांग व अंत्यांग असे तीन भाग असतात. मध्यांग हा पुच्छाचा जाडसर भाग असतो व शुक्राणूंच्या हालचालीस लागणारी शक्ति उत्पादन करण्याचे हे स्थान असते. मध्यांभोवती मळसूत्राप्रमाणे सूत्रकणिका(कोशिकेच्या द्रवामध्ये असणाऱ्या व तिच्या जैव कार्यामध्ये भाग घेणाऱ्या तंतूसारखा काया) गुंडाळलेल्या असतात. रेतातील फ्रक्टोजाचे विघटन करणारे रस याच ठिकाणी असतात.[→ शुक्राणू].
वळूची प्रजोत्पादनातील कार्यक्षमता : वळकडून केवळ प्रजोत्पादनाचे कार्य अपेक्षित असल्याने पुरेशा प्रमाणात कार्यक्षम आणि आविकृत(निरोगी) शुक्राणूंचे उत्पादन करून मादीच्या प्रजोत्पादन मार्गात सुपूर्त करणे हे त्याचे अत्यावश्यक कार्य असते. यासाठी प्रजोत्पादन तंत्रातील इंद्रिये निकोप असणे जरूरी असते. निकोप वळूच्या मुष्काची त्वचा सैल व तकतकीत असते. त्यावर सूज, जखम, गुल्म किंवा त्वचारोग असत नाही. त्याच्या दोन्ही वृषणाचे आकार समान असतात व ते मुष्कात स्वैरपणे हालतात. चिरकारी वृषणशोध (वृषणावरील जुनाट दाहयुक्त सूज) झाला असता वृषण मऊ होतात, ते आवरणाला चिकटतात व त्यांचे आकारमान लहान होते. असे वृषण असलेला तसेच अधिवृषणाची अववृध्दी झालेला (पोषणाअभावी अगर अन्य कारणाने खुरटलेला) वळू अकार्यक्षम असतो. निकोप वळूचे शिश्न आवरणाला न चिकटलेले, लांब व उत्थापनशील असते. त्याची कामेच्छा ,जोम व शिश्नाची उत्थापनक्षमता अजमावण्यासाठी माजावरील गाय प्रत्यक्ष दाखवून परीक्षा करतात. प्रजोत्पादनातील वळूचे कर्तृत्व त्याच्या रेताची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने परीक्षा करून तसेच विविध कसोट्या लावूनच ठरवितात. यामुळे रेतातील शुक्राणूंची चलनक्षमता, विकृत शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची शरीराबाहेर जिवंत राहण्याची क्षमता इ. प्रजोत्पादनाशी निकटचा संबंध असलेल्या बाबींची माहिती मिळते. प्रजननक्षम सांडाच्या रेतात ७० टक्क्यांहून अधिक चल शुक्राणू आढळतात, तसेच विकृत शुक्राणूंची संख्या १५ टक्क्यांहून अधिक असत नाही तर एकंदर शुक्राणूंची संख्या दर मिलि.मध्ये ८० ते १२० कोटी इतकी असते. जनावरांच्या जातीनुसार ही संख्या निरनिरळी असते. मिथिलीन ब्ल्यू चाचणीत ६ ते ८ मिनिटांपेक्षा कमी वेळात त्याचा रंग बदलताे.( → वीर्यसेचन, कृत्रिम).
प्रजोत्पादनातील वळूच्या अकार्यक्षमतेच्या संदर्भात लागरलव्ह या स्वीडिश शास्त्रज्ञांनी कामप्रेरणा, अपुंस्त्व व असफलता या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
कामप्रेरणा : कामप्रेरणा बव्हंशी आनुवंशिक असावी. कामप्रेरणेच्या आनुवंशिक अभावात हॉर्मोनांची अपुऱ्या उत्पादनाचा तसेच त्या हॉर्मोनांच्या प्रभावाच्या शरीरावर होणाऱ्या प्रतिक्रियेचाही विचार आवश्यक आहे. आहाराचा कामप्रेरणेशी निकटचा संबंध आहे. वाजवीहून अधिक आहार अपुऱ्या आहाराचा एकूण कामप्रेरणा, शुक्राणूंचे उत्पादन व त्यांची चलनक्षमता यांवर फारसा परिणाम होत नसला, तरी यौवनारंभास उशीर होतो. प्रथिने, अ जीवनसत्त्व आणि खनिजांपैकी लोह, ताम्र, कोबाल्ट व फॉस्फरस यांच्या सामूहिक न्यूनतेमुळे वळू खंंगून दुबळे होतात व त्यांची कामप्रेरणा कमी होते. शिश्नास दुखापत झाल्यास वा शिश्नाग्रशोध, शिश्नमणिच्छदशोध इ. विकारांमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे वळू तात्पुरता मैथुनोत्सुक राहत नाही. गीर व सिंधी जातीच्या वळूंमध्ये शिश्नमणिच्छद लोंबते असल्यामुळे त्याचा भ्रंश होऊन किंवा वारंवार होणाऱ्या दाहामुळे त्यात पडदे तयार झाल्याने उत्थान झालेले शिश्न बाहेर पडु शकत नाही. यामुळेही कामप्रेरणेवर विपरित परिणाम होतो.
अपुंस्त्व : कामप्रेरणेच्या अभावामुळे अपौरुषत्व येत नाही पण प्रतिक्षेपी क्रियेतील(शरीराच्या एका भागात उत्पन्न झालेल्या चेतनेमुळे इतरत्र होणाऱ्या प्रतिक्रियेतील) विकृतीमुळे मैथुनक्रिया करण्यास वळू असमर्थ होतो. शरीरक्रियात्मक दोषामुळे (शरीरतील क्रिया व कार्य यांतील दोषामुळे) विशेषतः प्रजोत्पादन तंत्रातील दोषामुळे, अपौरुषत्व असंभवनीय असते. अशा वळूंच्या रेतात काही दोष आढळत नाही. पशूंमध्ये मैथुनक्रिया मागील पायांवर उभे राहून होत असल्यामुळे मागील पायांचे सांधे, स्नायू, अस्थी किंवा अस्थिबंध यांतील विकृतीमुळे मैथुनक्रियेबाबत शरीरिक असमर्थता निर्माण होते पण ती तदनुषंगिक असते.
असफलता : प्रजोत्पादनातील अकार्यक्षमतेतील ही बाब गुंतागुंतीची आहे. कामप्रेरणा पुरेशी असून मैथूनक्रियाही पूर्ण करता येत असली, तरी फलित (फळलेल्या) गायीमध्ये गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. अशा वेळी रेताची परिक्षा करणे इष्ट असते. रेतामध्येही काही दोष आढळला नाही, तर विशिष्ट रोगामुळे ही असफलता येत असावी.
रेतातील दोष : रेताचे PH मूल्य[→पीएच मुल्य] विशिष्ट मर्यादेत असेल, तरच शुक्राणू कार्यक्षम राहु शकतात. वृषण ऱ्हास झाला असता रेत वाजवीहून अधिक क्षारधर्मी असते. वीर्यस्खलन अपूर्ण झाल्यास त्यांत ग्रंथींंच्या स्रावाचे प्रमाण अधिक होऊन रेताची घनता घटते, म्हणजेच त्यांत शुक्राणूंचे प्रमाण कमी होते. अशा वेळी असफलता येणे शक्य असते. वृषणाची रुद्ध वृद्धी (वृषण अल्पविकसित असणे), वृषण ऱ्हास इ. विकारांत शुक्राणूंची चलनक्षमता कमी होऊन असफलता संभवनीय असते. चल शुक्राणूंचे प्रमाण २५ ते ३० टक्क्याहून कमी झाल्यास माद्या गाभण राहण्याचे प्रमाण घटते. याउलट हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्यास त्या प्रमाणात सफलता वाढते, असे मात्र नाही. पूमिश्रित रेतातील शुक्राणूंची चलन क्षमता कमी असते.
यांशिवाय शुक्राणूंच्या रचनेत त्यांची निर्मिती होत असतानाच काही दोष राहतात. लघुशीर्ष, द्विशीर्ष, लंबशीर्ष हे शुक्राणूंच्या शीर्षामधील दोष चपटी ग्रीवा, वक्र गर्वा ह्या ग्रीवेमधील विकृती व अविकसित पुच्छ, अपुच्छ हे पुच्छामधील दोष इ. विकृत शुक्राणूंच्या उत्पादनामुळेही असफलता येऊ शकते. या विकृत शुक्राणूंचे रेतातील प्रमाण १५ ते २० टक्क्यांहून कमी असेल, तर वळूच्या प्रजोत्पादनक्षमतेत घट होत नाही.
वळूचे रेत निर्दोष रेत असूूनही असफलता असल्यास तो व्हिब्रिओसिस, ट्रिकोमोनियासिस, ब्रूसेलोसिस या सांसर्गिक रोगांनी ग्रस्त असण्याचा संभव असतो [→ गाय].
वृषणाची रुद्ध वृद्धी, वृषण ऱ्हास, वृषणाची अपपुष्टी, जलमुष्क (मुष्कपर्युदरात द्रव साचणे) किंवा वृषणावरील अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) अथवा जखमा या प्रजोत्पादन तंत्रातील इंद्रियांच्या विकारांमध्ये कमीअधिक प्रमाणात प्रजोत्पादनक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. वृषणाची रुद्ध वृद्धी हा दोष सांड, मेंढा, बोकड व डुक्कर या पशूंमध्ये आढळून आला आहे व ही आनुवंशिक विकृती आहे.
संदर्भ : 1. Rice, V. R. Andrews, F. N. Warwick, E. J. Langates, J. E. Breeding and Improvement of Farm Animals, Tokyo, 1975. 2. Sisson, S. Grossman, J. D.The Anatomy of Domestic Animals, Tokyo, 1967.
साने, चिं. रा.
“