पीतांबरदास : (अठरावे शतक). प्रसिध्द ओडिया कवी. त्याचा जन्म ओरिसात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या जन्म मृत्यूविषयीची किंवा अन्य चरित्रपर अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ओरिसामधील पौराणिक साहित्य करणाऱ्या कवींपैकी पीतांबरदास हा प्रसिध्द कवी आहे. त्याच्या समकालीन कवींप्रमाणेच तो संस्कृत पंडित होता. नृसिंहपुराण हा एकमेव ग्रंथ त्याने लिहिला असला, तरी त्यामुळेच तो अजरामर झाला. १७६१ मध्ये हा ग्रंथ लिहिण्यास त्याने सुरुवात केली, असे ह्या ग्रंथातील अंतर्गत पुराव्यावरून दिसते. नृसिंहपुराण ही त्याची सर्वस्वी स्वतंत्र रचना म्हणावी लागेल. कुठल्याही संस्कृत ग्रंथाचा तो अनुवाद नाही. संस्कृत भाषेत या ग्रंथासारखा ग्रंथ आढळत नाही. हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्याला जगन्नाथपुरी येथील लक्ष्मीचे मंदिर पाहून मिळाली असावी. नृसिंहपुराण सात भागांत विभागले आहे. त्यामध्ये नृसिंह व शेष या अनुक्रमे विष्णू व अनंत यांच्या अवतारांची कथा आहे. पृथ्वी व स्वर्ग यांना भयभीत करून सोडणाऱ्या मुरा व दारुण या दोन दैत्यांना नृसिंह व शेष यांनी ठार केल्याची कथा त्यात वर्णिली आहे.
काल्पनिक कथेबरोबरच संस्कृत पुराणे, सारळादासांचे महाभारत, जगमोहनरचित रामायण इ. ग्रंथांतील कथांचाही त्याने कौशल्याने उपयोग करून घेतला. भाषा, व्यक्तिचित्रण, शैली या सर्व दृष्टींनी नृसिंहपुराण सरस असून ओरिसातील घराघरांत ते आवडीने वाचले जाते व त्याची पूजाही केली जाते.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) ब्रह्मे, माधुरी (म.)