पीकिंग : चीन प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या उपनंगरांसह ८४,८७,००० (१९७५ अंदाज). चीनच्या ईशान्य भागातील होपे प्रांतात वसलेल्या या शहराची इतिहासकाळात अनेक स्थित्यंतरे झाली. पीकिंग म्हणजे ‘उत्तरेकडची राजधानी’. चीनच्या जलोढव्याप्त मैदानाच्या उत्तर सीमेवर चीनच्या प्रचंड भिंतीच्या दक्षिणेला केवळ ६० किमी. वर असलेले हे शहर ग्रँड कालव्याच्या उत्तर टोकाजवळ आहे. ईशान्यकडील मँचुरिया व वायव्येकडील मंगोलिया प्रजासत्ताक यांकडून येणारे रस्ते येथे केंद्रित होतात आणि त्यामुळे या शहराला लष्करी दृष्ट्या आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. विमान वाहतुकीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांशी पीकिंगचे व्यवहार चालतात. त्याशिवाय ते रेल्वे वाहतुकीचे केंद्र आहे. येथे चार दिशांकडून लोहमार्ग एकत्र येतात. या लोहमार्गांमुळे पीकिंग हे देशातील दूरदूरच्या भागांशी व जवळच्या भागांशी महामार्गांनी जोडले गेले आहे. या शहरात प्राचीनता व अर्वाचीनता यांचा सुंदर संगम झाला आहे.

पर्वतीय प्रदेश व मैदान यांच्या सांध्यावर वसल्यामुळे पीकिंगच्या हवामानावर ऋतुमानानुसार त्या दोन्ही स्थलवैशिष्ट्यांचा परिणाम झालेला आढळतो. हिवाळ्यात खंडांतर्गत भाग थंड झाल्यामुळे तेथील जड, थंड हवा उतारावरून खाली वाहत जाऊन मैदानात उतरते. याच काळात धुळीची वादळे मंगोलियन वाळवंटातून पिवळट करड्या रंगाची ‘लोएस’ मृदा या प्रदेशात आणतात. अंतर्भागातून आलेल्या थंड हवेमुळे तापमान एकदम उतरते ( – १९ से. ). याउलट उन्हाळ्यात खंडांतर्गत भाग तापल्यामुळे तापमान वाढत जाते (४२ से.). वाऱ्याची दिशा समुद्राकडून जमिनीकडे असल्यामुळे पाऊस मुख्यत: याच काळात पडतो. परंतु एकूण पर्जन्यमान कमीच (वार्षिक सरासरी ६३·५ सेंमी.).

पीकिंग शहराची गेल्या पाव शतकात खूपच वाढ झाली आहे. महानगरपालिकेचे क्षेत्र १७,८०० चौ. किमी. असून शहराची लोकसंख्या ४८,००,००० (१९७०) आहे. पीकिंग चीनची शासकीय राजधानी असल्यामुळे चीनच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात त्याला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

संसदभवन, पीकिंग

या भागात फार पूर्वीपासून लोकवस्ती होती, याला सबळ पुरावा उपलब्ध आहे. शहराच्या परिसरात ‘पीकिंग मानवा’चे अवशेष सापडलेले आहेत. ख्रि. पू. ११२२ – २२१ या काळात पीकिंगनजीकच ची येथे जौ घराण्याच्या जहागिरीची राजधानी होती. ख्रि. पू. २२१ – २०६ या काळात च्यीन घराण्याच्या बादशहाने हे शहर उद्ध्वस्त केले. त्यानंतर मात्र इ. स. २२० पर्यंत हान घराण्याची राजधानी येथेच होती. त्या काळात तिचे नाव प्रथम येन व नंतर युजौ असे होते. त्यानंतर पुष्कळ काळपर्यंत विशेष अशा राजकीय घडामोडी घडल्या नाहीत. ९२६ मध्ये मँचुरियातील द शंग या खितान जमातीच्या सम्राटाने या भागावर स्वारी करून या शहराचे नानकिंगमध्ये (नान-दक्षिणेकडील किंग-राजधानी) रूपांतर केले. तार्तर घराण्याचा उदय झाल्यानंतर पुढील शंभर-सव्वाशे वर्षांच्या काळात हे शहर आलटून पालटून तार्तर व चिनी यांचे राहिले. य़ा काळात पीकिंगचे प्रथम येनचिंग व नंतर जुंगडू असे नामकरण झाले. यानंतर १२१५ मध्ये चंगीझखानाने या शहराचा विध्वंस केला. मात्र त्याच्याच घराण्यातील कूब्लाईखान ऊर्फ शिर्त्सू याने शहराचे पुनरुज्जीवन केले आणि शहराला ‘तातू’ (थोर राजधानी) असे नाव दिले. या युआन घराण्याकडे हा भाग १२६० ते १३६८ या काळात होता. १३६८ ते १६४४ या काळात हे शहर प्रांतिक राजधानी बनले व तिचे नाव ‘पेपिंग फू’ (उत्तरेकडील शांततेचे शहर) असे ठेवण्यात आले. मिंग घराण्यातील तिसऱ्या सम्राटाने (युंगल) राजधानी पुन्हा या शहरी आणली. याच काळात सध्याच्या पीकिंगचा पाया घातला गेला. १६४४ – १९११ या काळात च्यिंग घराण्याची राजधानी तीच राहिली पण नाव मात्र ‘पीकिंग’ असे पडले. १८६० व १९०० साली पीकिंगमध्ये क्षुल्लक कारणांवरून परदेशी लोकांनी बाके प्रसंग आणले होते. त्यांतून शिरसलामत सुटका झाली. तरी नंतरच्या करारात चीनला अनेक गोष्टी नाइलाजाने स्वीकाराव्या लागल्या. १९११ – २८ या काळात चिनी प्रजासत्ताकाची पीकिंग हीच राजधानी राहिली. १९२८ ते ऑक्टोबर १९४९ या काळात राष्ट्रीय सरकारने नानकिंग ही आपली राजधानी केली. त्या काळात पीकिंगला पेपिंग हे नाव पड़ले. मध्यंतरी १९३७ – ४५ या काळात हे शहर जपानच्या ताब्यात होते. ऑक्टोबर १९४९ पासून पुन्हा पीकिंग चिनी प्रजासत्ताकाची राजधानी बनले. अशा तऱ्हेने पीकिंग शहराने बरेच भलेबुरे प्रसंग पचविले असल्यामुळे चीनच्या जीवनात या शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधुनिक पीकिंगच्या वाढीस गेल्या काही दशकांतील आर्थिक व राजकीय धोरणे कारणीभूत आहेत.

राजवैभवाने नटलेल्या, सौंदर्यस्थळांनी बहरलेल्या व आल्हाददायक हवा असलेल्या पीकिंगला ‘पूर्वेकडील पॅरिस’ असेदेखील म्हणतात. खरोखरच चिनी संस्कृतीचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे.

बेहाय उद्यानातील नऊ ड्रॅगन-शिल्पांची भिंत, पीकिंग.

मूलत: पीकिंगचे उत्तर व दक्षिण शहर असे दोन भाग असून दोहोंभोवती पूर्वी तट होते. उभय शहरांच्या तटांचा बराच भाग अजूनही अस्तित्वात आहे. उत्तर भागाला तार्तर शहर व दक्षिण भागाला चिनी शहर म्हणतात. उत्तर भाग कूब्लाईखानकालीन असून दक्षिण भाग मिंगवंशीय जिआ जिंग सम्राटाने वसविला. उत्तर भागात लाल रंगाच्या तटाने वेष्टिलेला ‘इंपीरिअल सिटी’ नावाचा चौकोनी भाग आहे. त्याच्याही आत खंदकाने वेढलेला व चुन्याच्या तटबंदीचा मार्ग असून त्याला ‘फॉरबिडन सिटी’ असे म्हणतात. त्यात अनेक सम्मिताकार प्रासाद आहेत. प्रत्येक प्रासादाच्या दर्शनी भागात राजसिंहासन असलेले भव्य दिवाणखाने, आतल्या बाजूस खलबतखाने व राजकुटुंबियांची निवासस्थाने असत. या प्रासादांचे वस्तूसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. या वस्तूसंग्रहालयात चीनच्या इतिहासाचे यथार्थ दर्शन घडते. इंपीरिअल सिटीमध्ये सरकारी नोकरांची निवासस्थाने असत. फॉरबिडन सिटीच्या दक्षिणेकडील लिगेशन चौकात परदेशी वकिलांची राहण्याची सोय आहे. शहराच्या एकंदर रचनेमध्ये फारच समरूपता दिसून येते. उत्तर-दक्षिण दिशेत शहराच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती असे समरूपण झालेले विशेषत्वाने आढळते. शहराच्या भिंती, प्रवेशव्दारे, धार्मिक इमारती, दैनिक बाजार इ. गोष्टी या अक्षाच्या दोन्ही बाजूंना पध्दतशीरपणे वसविल्या गेल्या आहेत. प्रशासकीय कचेऱ्या व सार्वजनिक क्रीडांगणे इ. गोष्टी दक्षिणोत्तर अक्षाच्या आसपास आहेत. अशा रचनेमुळेच पीकिंगला पुष्कळदा रुंद रस्त्यांचे आणि भव्य चौकांचे शहर म्हणतात. राजप्रासादांच्या दक्षिणेकडे कामगार सांस्कृतिक केंद्राची भव्य इमारत आहे व पूर्व बाजूला उत्तर शहराच्या आग्नेय भागात जुना दूतावास असून, त्यात परदेशी वकिलाती होत्या. हल्ली त्या भागात भव्य विश्रांतिगृहे, नाट्यगृहे, बोलपटगृहे व मोठमोठी दुकाने आहेत. उत्तर शहराच्या ईशान्य भागात अनेक प्रख्यात ऐतिहासिक इमारती आहेत. त्यांपैकी लामाचे देऊळ व कन्फ्युशसचे देऊळ ही ख्यातनाम आहेत. उत्तर शहराच्या उत्तरेकडील टोकाला लागूनच सहा कृत्रिम सरोवरे असून त्यांत शहराबाहेरील खंदकातून पाणी सोडले जाते. त्यांपैकी बेहाय सरोवराच्या काठावर उद्याने असून सरोवराच्या नैऋत्य काठावर राष्ट्रीय ग्रंथालय आहे. ग्रंथालयामध्ये दर्जेदार चिनी साहित्याचा अमोल ठेवा आहे. या तलावाच्या पूर्वेला कोल हिल पार्कच्या पलीकडे पीकिंग विद्यापीठाचे आवार आहे. चिनी शहराच्या दक्षिण भागातील टेंपल ऑफ हेवन, टेंपल ऑफ ॲग्रिकल्चर इ. प्रेक्षणीय आहेत.


अलीकडील काळात पीकिंगचे औद्योगिक महत्त्व वाढले आहे. शहरातील उद्योगधंद्यांची वाढ मात्र मूळ शहराच्या भिंतीबाहेर झाली आहे. पश्चिमेला शजिंग‌्शान या उपनगरातील पोलाद कारखाना, नैर्ऋत्येकडून फंग‌्ताय भागातील पूलबांधणी साहित्याचा कारखाना, चांगशिन तिएन भागातील आगगाड्यांची एंजिने बांधण्याचा कारखाना, कापड गिरण्या, कृत्रिम धागा निर्मितीउद्योग, मोटारी व ट्रॅक्टर कारखाने हे मुख्य होत.

औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येतील वाढ यांमुळे अनेक सेवा उपलब्ध करणे आवश्यक झाले व अशा सेवा शहरामध्ये निघाल्या. अर्थातच अशा सेवा सार्वजनिक क्षेत्रातच आहेत. निरनिराळी हॉटेले व इतर निवासस्थाने यांची वाढ होत आहे.

पीकिंगच्या विशिष्ट रचनेमुळे पाश्चिमात्य शहरांत आढळणाऱ्या व्यापारी विभागांप्रमाणे येथे एकत्र व सलग असा विभाग दिसत नाही. राजप्रासांदांच्या नैर्ऋत्य व आग्नेय दिशांना मध्यवर्ती ठिकाणी अशा रस्त्यांच्या छेदनबिंदूवर पीकिंगचे परंपरागत बाजार होते. आजदेखील या भागाजवळच तुंगतान आणि शीतान या भागांत मुख्य खरेदी केंद्रे आहेत. १९४९ नंतर मात्र अधिक सोयींची आवश्यकता वाटल्याने जवळच अनेकमजली विभागीय वस्तुभांडारे अस्तित्वात आली. त्यांमध्ये विविध प्रकारचा माल उपलब्ध असतो. यांच्या शाखा इतर ठिकाणीदेखील आढळतात. ‘इंटरनॅशनल फ्रेन्ड्स सर्व्हिस सेंटर’ विशेषत: परदेशी पाहुण्यांच्या सेवेसाठी असून त्यात उत्तम दर्जाच्या विविध वस्तू उपलब्ध होतात. या अत्याधुनिक व्यापारी केंद्राखेरीज स्थानिक गरजा भागविणारे परंपरागत बाजार निरनिरळ्या भागांत अजूनही तग धरून आहेत.

पीकिंग येथे स्वतंत्र महानगरपालिका असून तिच्यामार्फत शहराचा कारभार चालतो. सोयीसाठी पालिकाक्षेत्राचे आठ केंद्रस्थ विभाग असून नऊ परिघस्थ ग्रामीण भाग त्यांना जोडण्यात आले आहेत. महापालिकेचा कारभार पीपल्स काँग्रेसमार्फत चालतो. हीमध्ये सर्व थरांतून निवडून आलेले ५६४ प्रतिनिधी असतात.  प्रत्यक्ष कारभार काँग्रेसने निवडलेल्या पीपल्स कौन्सिलमार्फत चालतो. त्यातूनच महापौर व उपमहापौर निवडले जातात. प्रत्यक्ष प्रत्यक्ष कार्यामध्ये श्रमविभागणी व ठराविक मर्यादेपर्यंत सत्ताविकेंद्रीकरण आढळते.

पीकिंग शहराला पीकिंग वॉटर कंपनीव्दारा पाणीपुरवठा केला जातो. आरोग्यरक्षण महापालिकेच्या क्षेत्रातच येते. परंपरागत व पाश्चिमात्य असे दोन्ही प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्याची सोय पीकिंगमध्ये आहे. सार्वजनिक आरोग्यरक्षणासाठी महापालिकेबरोबरच रहिवासी संघ झटत असतात.

शिक्षणाची जबाबदारी महापालिकेवरच आहे. बाल व शिशुवर्ग, सहा वर्षांचे प्राथमिक शिक्षण, सहा वर्षांचे माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर उच्च शिक्षण असते. शिक्षणाचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न १९४९ नंतर झाला, परंतु त्यातील अडचणी लवकरच ध्यानात येऊन शालेय शिक्षणात खाजगी संस्थांनादेखील भाग घेता येऊ लागल्यामुळे दहा लाखांहून अधिक मुले शाळांमध्ये जातात. शाळांची टंचाई मात्र खूपच भासते. यावर उपाय म्हणून अनेक पुरातन राजवाड्यांतून शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या राजवाड्यांचे वैभव अतुलनीय असले, तरी शाळांच्या दृष्टीने त्यांची अंतर्गत रचना फारशी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट दिसते. १९४९ नंतर पीकिंगचे महत्त्व उच्च शिक्षणाचे केंद्र या दृष्टीने खूपच वाढले. १९७० च्या सुमारास शहरात विसांवर उच्च शिक्षणकेंद्रे होती. शहराच्या वायव्य भागात शास्त्रीय व शैक्षणिक विभाग असून त्यात पीकिंग विद्यापीठ, जिंग्ह‌्वा विद्यापीठ, पीपल्स युनिव्हर्सिटी ऑफ चायना, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनॅलिटीज, पीकिंग नॉर्मल कॉलेज, पीकिंग मेडिकल कॉलेज यांसारख्या नानाविध संस्था आहेत. यांशिवाय पीकिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्टील अँड आयर्न, इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिकल एंजिनिअरिंग, पेट्रोलियम इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजिकल प्रॉस्पेक्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या संशोधन संस्था याच भागात आहेत. चायनीज अकॅडेमी ऑफ सायन्सेस ही सर्वांत मोठी संशोधन संस्थादेखील याच भागात आहे. या तांत्रिक संस्थांखेरीज इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, अरेबिक, रशियन, जपानी इ. परकीय भाषांचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत व त्यांमध्ये त्या त्या भाषेतील तज्ञांची शिक्षक म्हणून नेमणूक होते. यांशिवाय इंपीरिअल पॅलेस म्यूझीयम, म्यूझीयम ऑफ चायनीज रेव्होलूशन, ग्रहगोल मंडळ, पीकिंग ग्रंथालय इ. अनेक गोष्टी शैक्षणिक जीवनात मोलाची भर घालतात.

पीकिंग हे वर्तमानपत्रे, नियतकालिके व पुस्तके यांचे महत्त्वाचे प्रसिध्दी केंद्र आहे. प्रकाशन व्यवस्था बव्हंशी सरकारीच आहे. ‘न्यू चायना न्यूज एजन्सी’ ही प्रमुख वृत्तसंस्था आहे. देशभर खप असणारी सु. २५० नियतकालिके पीकिंगहून प्रसिध्द होतात. परदेशी भाषांतून प्रसिध्द होणारी पीपल्स चायना, चायना पिक्टोरियल, चायना रिकन्स्ट्रक्टस, चायनीज लिटरेचर, विमेन ऑफ चायना येथेच निघतात. वीसांहून अधिक राष्ट्रीय वर्तमानपत्रे येथेच प्रकाशित होतात. रेन‌्मिन रिबाओ किंवा पीपल्स डेली हे कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र येथूनच निघते. या वृत्तपत्रातच पक्षांतर्गत व परराष्ट्रविषयक धोरणांचे प्रतिबिंब दृष्टीस पडते. इतर गौण पक्षांनी काढलेले क्वांग- मिंग रिबाओ हे राजकीय, सांस्कृतिक व इतर अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते. ताकंग बाओ विशेषेकरून व्यापार, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भर देते. यांशिवाय वर्कर्स डेली, चायना यूथ न्यूज, चायनीज चिल्ड्रेन यांसारखी अनेक पत्रके पीकिंगहून प्रसिध्द होतात. शहरात एकूण चाळिंसावर प्रकाशन संस्था असून ‘पीपल्स पब्लिशिंग हाऊस’ ही सर्वांत मोठी आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाशनसंस्था खास असे क्षेत्र हाताळताना दिसते. ‘फॉरिन लँग्विजिस प्रेस’ चीनचा व तेथील लोकांचा बाह्य जगाला परिचय करून देण्यास मदत करते. पीकिंगमधील सेंट्रल चायनीज ब्रॉडकास्टींग स्टेशन हे महत्त्वाचे नभोवाणी केंद्र आहे. रेल्वे स्थानक, सार्वजनिक खाणावळी, बागा, क्रीडांगणे यांसारख्या ठिकाणी सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्रे आहेत. १९५९ पासून दूरचित्रवाणी केंद्रदेखील पीकिंगमध्ये स्थापण्यात आले आहे. मात्र दूरचित्रवाणी संच बव्हंशी सार्वजनिक उपयोगासाठी असतात. पीकिंग टेलिव्हीजन कॉलेज ही संस्था भौतिकी, रसायन, गणित व इतर विषयांचे शिक्षण देते.

पीकिंग ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून उद्यानांकरिताही प्रसिध्द आहे. जुंगशान पार्क, बेहाय पार्क, कोल हिल पार्क, समर पॅलेस व पीकिंग झोऑलॉजिकल गार्डन्स यांसारखी अनेक उद्याने लोकप्रिय आहेत.

पीकिंगमधील कामगार व्यायामशाळेमध्ये शारीरिक व्यायामासाठी संपूर्ण सोयी उपलब्ध असून तेथे सु. १५,००० लोकांसाठी सोय आहे. येथे मोकळ्या मैदानातील अनेक खेळ खेळले जातात. पीकिंग कामगारक्रीडागृहात फुटबॉल व इतर अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.

पर्यटकांच्या संख्येत १९४९ नंतर क्रमाक्रमाने वाढ होत आहे. ‘चायना इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स सर्व्हिस’ ही सरकारी संस्था परदेशी पर्यटकांकडे लक्ष पुरविते. हवाई, लोहमार्ग इत्यादींसाठी आरक्षण करणे, निवाससोयी उपलब्ध करणे, खाण्याची व्यवस्था पाहणे, मार्गदर्शन व्यवस्था करणे इ. अनेक आवश्यक सेवा या संस्थेमार्फत उपलब्ध होतात. शहरातील रस्ते रुंद व सुस्थितीत असून ट्रॉली बस हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. यांशिवाय शहराच्या सभोवती धावणारा लोहमार्ग कित्येक उतारूंची वाहतूक करतो. थोडक्या अंतरासाठी माणसांनी ओढावयाच्या रिक्षा, सायकली आणि घोडागाड्या इ. साधनांचा उपयोग होतो. पीकिंगसारख्या राजधानीच्या शहरी आढळणाऱ्या मानवचलित रिक्षा श्रमशक्तिचे माहात्म्यच स्पष्ट करतात.

फडके, वि. शं.