पीकॉक, टॉमसलव्ह : (१८ ऑक्टोबर १७८५ – २३ जानेवारी १८६६). इंग्रज कादंबरीकार आणि कवी. वेमथ येथे जन्म. खाजगी रीत्या त्याचे थोडेफार शिक्षण झाले. तथापि ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचा स्वप्रयत्नाने त्याने अभ्यास केला. १८९९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत त्याने धरली आणि १८५६ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्याचा लौकिक होता.
आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ त्याने कवितालेखनाने केला. पॅल्मायरा (१८०६), द जीनीयस ऑफ टेम्स (१८१०) आणि द फिलॉसफी ऑफ मेलॅन्कली (१८१२) हे त्याचे उल्लेखनीय काव्यसंग्रह. तथापि आज तो मुख्यतः त्याच्या उपरोधप्रचुर कादंबऱ्यासाठी ओळखला जातो. ह्या कादंबऱ्यांतून त्याने अधूनमधून घातलेल्या गीतांतून त्याच्यातील कवी विशेष प्रभावीपणे प्रकट झालेला आहे. आपल्या कादंबऱ्यांतून पीकॉकने तत्कालीन बौध्दिक वातावरणावर टीका केलेली आहे. हेडलाँग हॉल (१८१६), मेलिन कोर्ट (१८१७) आणि नाइटमेअर अँबी (१८१८) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. कादंबरीलेखनात संविधानक व व्यक्तिरेखन ह्या घटकांना पीकॉकने फारसे महत्त्व दिले नाही. संवाद मात्र नाट्यात्म आणि चुरचुरीत करण्याचा कटाक्ष ठेवला. खेड्यातील एखाद्या घरात काही पाहुणे मंडळी जमली आहेत टेबलाभोवती बसून खाणे, पिणे, गाणे आणि विविध विषयांवरील चर्चा चालली आहे, अशी पार्श्वभूमी त्याच्या बहुतेक कादबंऱ्यांत आढळते. व्यक्तींची संभाषणे हे त्याच्या उपरोधाचे महत्त्वपूर्ण माध्यम. हेडलाँग हॉलमध्ये प्रसहन-विडंबनांच्या तंत्राचे काहीशा अति-उत्साहाने केलेले मिश्रण दिसून येते. मेलिन कोर्ट ह्या कादंबरीत त्याने वर्ड्स्वर्थ, कोलरिज व साउदी ह्या तीन स्वच्छंदतावादी कवींवर हल्ला चढवला. नाइटमेअर अँबीमध्ये कोलरिजबरोबर बायरनवरही टीका आहे. पीकॉक हा स्वच्छंदतावाद्यांचा विरोधक नव्हता त्यांच्या भूमिकेतील अतिरेकीपणावर त्याचा रोख होता. क्रॉचिट कासल (१८३१) आणि ग्रिल ग्रेंज (१८६०) ह्या त्याच्या अन्य दोन उपरोधप्रचुर कादंबऱ्या मेड मेरिअन (१८२२) आणि मिसफॉर्च्युन्स ऑफ एल्फिन (१८२९) ह्या त्याच्या कादंबऱ्या मात्र काहीशा वेगळ्या आहेत. त्या दोहोंतील निवेदनपध्दती स्वच्छंदतावादी वळणाची आहे तथापि त्या निवेदनपध्दतीच्या आडून विडंबनाचाच हेतू सिध्दीस नेला आहे. मेड मेरिअनमध्ये रॉबिनहूडच्या कथेवर आधारलेल्या मध्ययुगीन रोमान्सचे विडंबन असून मिसफॉर्च्युन्स… मध्ये राजा आर्थरविषयीच्या आख्यायिकांना लक्ष्य केले आहे. पीकॉक हा शेलीचा निकटचा मित्र होता. ‘द फोर एजीस ऑफ पोएट्री’ ह्या पीकॉकच्या लहानशा निबंधामुळे शेलीला ‘डिफेन्स ऑफ पोएट्री’ हा प्रसिध्द निबंध लिहावा लागला होता. ज्ञानविवेकाच्या युगात कवितेची उपयुक्तता संपली आहे आणि फक्त अंधश्रध्दाळू मनांनाच तिचे आवाहन पोहोचते, असा युक्तिवाद पीकॉकने केला होता. लोअर हॅलिफर्ड येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.