पीअरी, रॉबर्ट एड्विन : (६ मे १८५६ – २० फेब्रुवारी १९२०). उत्तर ध्रुवाचा अमेरिकन संशोधक. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील क्रेसन गावी जन्म. १८७७ मध्ये त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. याच विषयातील अमेरिकन नौदलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने १८८१ मध्ये नौदलात प्रवेश केला. १८८४-८५ मध्ये निकाराग्वातील कालव्यांचे सर्वेक्षण करण्याच्या कामगिरीवर तो होता. १८८६ मध्ये त्याने ग्रीनलंडच्या डिस्को उपसागर या पश्चिमेकडील भागाची पाहणी केली. १८९१ मध्ये त्याने उत्तर ध्रुवाच्या समन्वेषणाकरिता निघणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व पतकरले. ग्रीनलंडचे समन्वेषण करून त्याने ते बेट असल्याचे सिध्द केले, तसेच तेथील महत्त्वाची माहिती गोळा करून प्रसिध्द केली. ग्रीनलंडच्या उत्तर भागाचे त्यानेच प्रथम समन्वेषण केल्याने त्या भागास ‘पीअरी लँड’ असे म्हटले जाते. १८९३–९५ मध्ये त्याने पुन्हा ग्रीनलंडचे समन्वेषण केले. यानंतर त्याने उत्तर ध्रुव जिकंण्याच्या उद्देशाने मोहिमा काढल्या. १८९८ ते १९०२ मधील त्याच्या मोहिमेत तो ८४० १७’ उत्तर अक्षवृत्तापर्यंत गेला. १९०६ च्या मोहिमेत त्याने ८७० १६’ उत्तर अक्षवृत्तापर्यंत मजल मारली व शेवटी १९०९ मधील मोहिमेत ६ एप्रिल रोजी मॅथ्यू हेन्सन आणि चार एस्किमोंसह तो उत्तर ध्रुवावर पोहोचला. १८९१ मधील त्याच्या मोहिमेत त्याच्या बोटीवर सर्जन असलेला डॉ. फ्रेडरिक कुक याने आपण पीअरीच्या आधी उत्तर ध्रुव गाठल्याचा दावा केला. परंतु नंतरच्या पुराव्यावरून पीअरीलाच प्रथम उत्तर ध्रुव गाठल्याचा मान देण्यात आला. विशेष कामगिरीबद्दल त्याला १९११ मध्ये रिअर अँड्मीरल हा हुद्दा देण्यात आला त्याच वर्षी तो नौदलातून निवृत्त झाला. नॉर्थवर्ड ओव्हर द ग्रेट आइस (१८९८), निअरेस्ट द पोल (१९०७), द नॉर्थ पोल (१९१०) व सीक्रिटस ऑफ पोलर ट्रॅव्हल (१९१७) हे त्याचे प्रकाशित ग्रंथ होत. तो वॉशिंग्टन येथे मरण पावला.
संदर्भ : Weems, J. E. Peary : The Explorer and the Man, New York, 1967.
शाह, र. रू.
“