पिसोरा : स्तनी वर्गाच्या (सस्तन प्राण्यांच्या वर्गाच्या) समखुरी (खुरांची संख्या सम असलेल्या प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला) गणातील रुमिनॅन्शिया या उपगणातील ट्रॅग्युलिडी कुलातील प्राणी. या कुलात हायमॉस्कस आणि ट्रॅग्युलस हे दोनच वंश आहेत. हायमॉस्कस वंशात हायमॉस्कस क्वॅटिकस ही एकच जाती असून ती मध्य पश्चिम आफ्रिकेत आढळते. ट्रॅग्युलस वंशात तीन जाती असून त्या दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळतात. ट्रॅ. मेमिना ही भारत आणि श्रीलंका यांत व ट्रॅ. नपू आणि ट्रॅ. जावानिकस या दोन जाती सुमात्रा व बोर्निओमध्ये आढळतात.

पिसोरा (ट्रॅग्युलस मेमिना )

भारतातील जातीला पिसोरा म्हणतात. पिसोरा दक्षिण भारतातील दाट जंगलांत सामान्यतः १,८५० मी. उंचीपर्यंत आढळतो. तो नेहमी पाण्याच्या जवळपास राहणारा आहे. दिसायला मृगासारखा असला, तरी तो फार लहान असल्यामुळे इंग्रजी भाषेत त्याला ‘माऊस डियर’ (उंदीर-मृग) म्हणतात. भारतीय पिसोऱ्याच्या शरीराची लांबी ४५–५५ सेंमी. असून खांद्यापाशी उंची २५–३० सेंमी. असते. वजनसर्वसामान्यपणे २–४ किग्रॅ. असते. पाय अतिशय सडपातळ असून मागचा भाग उंच असतो. प्रत्येक पायावर चांगली वाढ झालेली चार बोटे असतात.

शरीरावर आखूड, सारखे आणि दाट केस असतात डोक्यावर आणि खालच्या भागावर ते जास्त आखूड असतात. शरीराचा रंग हिरवट तपकिरी असून त्यावर सूक्ष‌्म पिवळे ठिपके असतात. बाजूंवर फिक्कट पिवळ्या अथवा पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांच्या ओळी अथवा पट्टे असतात. खालची बाजू पांढरी असते. गळ्यावर तीन पांढरे पट्टे असतात. हा लहान, बुजऱ्या स्वभावाचा आणि संरक्षक रंग असलेला प्राणी असल्यामुळे सहज दिसून येत नाही. यांना शिंगे नसतात. इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे वरच्या जबड्यात सुळे असतात वरच्या जबड्यातील सुळ्यांची चांगली वाढ झालेली असते आणि नरांमध्ये ते बरेच मोठे असून बाहेर आलेले असतात. इतर मृगांप्रमाणेच हे रवंथ करणारे असले, तरी यांचे जठर रवंथ करणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणे चार कोष्ठांचे बनलेले नसून त्यात तीनच कोष्ठ असतात.

खडकाळ व गवताने झाकलेल्या डोंगरांच्या बाजू किंवा दाट जंगल यात हा प्राणी नेहमी आसरा घेतो. खडकातील कपारी अथवा मोठाले दगडधोंडे यांत तो लपून बसतो. उजाडण्याच्या सुमारास किंवा तिन्हीसांजेच्या वेळी हा भक्ष्य मिळविण्याकरिता बाहेर पडतो परंतु फार दूर मोकळ्या जागी जाण्याचे तो धाडस करीत नाही. धोक्याचा यत्किंचितही संशय आला, तर तो लपून बसतो. गवत, झुडपांचा पाला, कोवळी रोपे, गळून पडलेली रानफळे हे या प्राण्यांचे भक्ष्य होय.

यांचा समागम वर्षातून केव्हाही होतो जास्त अनूकूल काळ जून आणि जुलै हे महिने होत. १२० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादी एखाद्या कोनाकोपऱ्यात अथवा ख़डकाच्या कपारीत विते. तिला सामान्यतः दोन पिल्ले होतात व त्यांना ती बहुधा विण्याच्या जागीच लपवून ठेवते. मादीला चार स्तन असतात. समागमाचा काळ सोडून इतर वेळी नर एकटाच असतो.

कित्येक हिंस्र पशू आणि साप यांना मारून खातात. त्याचप्रमाणे स्थानिक लोक यांची शिकार करून त्यांचे मांस खातात. हा प्राणी अतिशय गरीब असून लवकर माणसाळतो. काही लोक हा प्राणी पाळतात.

कानिटकर, बा. मो.