पिल्ललमर्रि पिनवीरभद्र : (सु. १४२५ – सु. १४९०). प्रसिध्द तेलुगू कवी व विद्वान. त्याचा जन्म तेलंगणातील पिल्ललमर्री नावाच्या गावी झाला. मातापिता नागांबा व गादायमात्य. पिनवीरना असेही त्याचे नाव रूढ आहे. हा आधी नेल्लोर जिल्ह्यातील सोमराजुपल्ल येथे आणि नंतर विजयानगरचा राजा सालुव नरसिंहरायाच्या दरबारात कवी म्हणून होता.
याच्या काळापावेतो महाकाव्ये आणि पुराणे तेलुगूत अवतरली होती. संस्कृत नाटकांकडे लक्ष वळलेला हा पहिला तेलुगू कवी होय. कालिदासाच्या शाकुंतलाचा तेलुगू काव्यानुवाद करून त्याने आपल्या प्रतिभेची साक्ष पटविली.
जैमिनी-भारतमु आणि शकुंतला-परिणयमु हे त्याचे दोनच ग्रंथ आज उपलब्ध आहेत. अवतारदर्पणमु, नारदीयमु, मानसोल्लासमु आणि माघमाहात्म्यमु हे ग्रंथही त्याने लिहिले असे म्हणतात पण ते उपलब्ध नाहीत. आंध्र साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या एका उदाहरणग्रंथावरून पुरुषार्थसुधानिधि नावाचा आणखी एक ग्रंथही त्याने लिहिला होता, असे अनुमान करता येते.
जैमिनी-भारतमु हे आठ आश्वासांचे प्रबंधकाव्य (महाकाव्य) आहे. त्यात पांडवांनी केलेल्या अश्वमेधाची कथा आली आहे. मूळ जैमिनीकृत संस्कृत भारतात केलेले अश्वमेधाचे वर्णन आणि त्याची कथा यांत पिनवीरभद्राने पुष्कळच बदल केला. जैमिनी–भारतमु हे काव्य त्याने १४८५ ते ९० च्या दरम्यान रचले असावे, असे अभ्यासक मानतात. त्याची शैली स्वतंत्र असून भाषाही प्रौढ पण स्वाभाविक आहे. त्यामुळे काव्याच्या रमणीयतेस मुळीच बाध आलेला नाही. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हे काव्य आंध्र प्रदेशात मोठ्या आवडीने वाचले जात असे. त्यात मार्गपध्दतीच्या वैशिष्ट्यांबरोबरच लोकसाहित्याचे गुणही प्रकर्षाने आढळतात. हे काव्य त्याने एका रात्रीत रचले, असे सूचित करणारी एक आख्यायिका आहे. ‘वाणी माझी राणी’ हे त्याचे उद्गारही प्रसिध्द आहेत. त्याला ब्रह्मदेवावतार मानतात. या सर्व गोष्टींवरून त्याची प्रतिभा असामान्य आणि भाषाप्रभुत्व असाधारण होते, असा निष्कर्ष काढता येतो. त्याने आपले हे काव्य त्याचा आश्रयदाता विजयानगरचा राजा सालुव नरसिंहराय यास अर्पण केले आहे. याच श्रेष्ठ कवित्वशक्तीचा प्रत्यय त्याच्या शकुंतला-परिणयमु या काव्यातही येतो. त्यात चार आश्वास आहेत. त्यातील कथानक महाभारत आणि कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम् या नाटकावर आधारलेले आहे तथापि काही ठिकाणी त्याने वेगळे नाट्यमय प्रसंग चित्रित करून आपल्या काव्याचे सौदर्यंही वाढवले आहे. कालिदासाच्या नाटकाची छाया त्यात अनेक ठिकाणी दिसते. त्याचा हा प्रयत्न विद्वद्जनांना विशेषच आवडला. पिनवीरभद्राची शैली नंतरच्या काळातील अनेक प्रबंधकर्त्या कवींनी आदर्श मानून तिचे अनुकरण केले.
टिळक, व्यं. द.