पिधान : चंद्रबिंबाने एखादा तारा किंवा ग्रह झाकून टाकला वा चंद्रबिंब एखाद्या ताऱ्यावरून अगर ग्रहावरून गेले म्हणजे थोडा वेळ तो तारा किंवा ग्रह दिसेनासे होतो, या आविष्काराला पिधान असे म्हणतात मुख्यत: या अर्थानेच ही संज्ञा वापरतात. तथापि एखादा खस्थ पदार्थ दुसऱ्या खस्थ पदार्थाने झाकला जाणे, अशीही पिधानाची व्यापक व्याख्या केली जाते. बऱ्याच ताऱ्यांचे तेज चंद्राच्या भासमान तेजाच्या मानाने बरेच कमीअसल्याने चंद्र त्यांच्या निकट येण्यापूर्वीच चंद्राच्या तेजात प्रत्यक्ष पिधानापूर्वीच ते दिसेनासे होतात. चंद्रकक्षा अयनवृत्ताशी (सूर्याच्या भासमान मार्गाशी) ५०१८’ कोन करीत असल्याने अयनवृत्ताच्या दोन्ही बाजूंस चंद्रबिंबाचा व्यास व इतर परिणाम लक्षात घेता एकूण १२० रुंदीच्या पट्टयात असणाऱ्या ताऱ्यांचेच पिधान होते; परंतु एवढ्याशा अवकाशात सुद्धा हजारो लहानमोठे तारे असल्याने चंद्र दररोज सरासरी पाच-सहा ताऱ्यांचे पिधान करतो. कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, मघा, चित्रा, अनुराधा (उत्तरेकडील तारा) व जेष्ठा या मोठ्या ताऱ्यांचे तसेच ग्रहांचे पिधान नुसत्या डोळ्यांनी सुद्धा प्रेक्षणीय दिसते. पिधान म्हणजे एक प्रकारचे ग्रहणच असते. पृथ्वीवरील एका ठिकाणी दिसणारे पिधान अन्यत्र दिसेलच असे नाही. रॉयल वाअमेरिकन इफेमेरिसमध्ये (ग्रह पंचांगात म्हणजे विविध दिवशी असलेल्या खस्थ पदार्थांच्या स्थिती नियमित अनुक्रमाने ज्या कोष्टकात दिलेल्या असतात त्या कोष्टकात) विशेषत: अमेरिकन इफेमेरिसमध्ये ७.५ प्रतीपर्यंतच्या [→प्रत] सर्व ताऱ्याच्या पिधानांची माहिती दिलेली असते. पिधान केव्हा होईल व कोठे दिसेल यांसंबंधीचे सूत्र एफ्. डब्लू. बेसेल (१७८४-१८४६) यांनी शोधून काढले आहे.
पिधान होताना तारा चंद्रबिंबाच्या पूर्वकडेला एकदम नाहीसा होतो व थोड्या वेळाने पश्चिमकडेला एकदमच बाहेर पडतो. पिधान अर्धा ते पाऊण तास चालू असते. शुद्ध पक्षात पिधानाच्या सुरुवातीस व वद्य पक्षात पिधानाच्या शेवटी तारा चंद्राच्या अंधारी म्हणजे अर्धवट प्रकाशित बाजूकडे असतो. त्यामुळे दृश्य चंद्रबिंब येण्याच्याआधीच पिधान सुरू होते किंवा दृश्य चंद्रबिंब संपल्यानंतर थोड्या वेळाने तारा एकदम दिसू लागतो. तारे किंवा ग्रह बिंदूरूप असल्याने तारा एकदम नाहीसा होतो किंवा एकदम दिसू लागतो. ज्येष्ठा तारा ०”·०४ कोनीय व्यासाचा असल्याने त्याला अंतर्धान पावण्यास ०·०८ सेकंद इतकाच अल्पकाळ लागला.
पिधानांच्या निरीक्षणामुळे अनेक प्रकारच्या संशोधनास मदत होते. पृथ्वीवरच्या ठिकाणाचे अचूक रेखांश काढणे, तसेच चंद्राचे अचूकस्थान, त्याच्या कक्षेची माहिती, त्याचा व्यास, अंतर व गती यांची माहिती सूक्ष्मपणे कळण्यास पिधानांची मदत होते. यांवरून एका शतकात चांद्रगतीत वाढ झाल्याचे, तर पृथ्वीच्या गतीत घट झाल्याचे आढळते आहे. त्यामुळे दिवस किंचित लांबला, असे कळूनआले. ताऱ्याचे क्षणात नाहीसे होणे अगर दिसू लागणे यावरून चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे, हे निश्चित झाले. डर्क ब्रौवर या अमेरिकन शास्त्रज्ञांनी १० वर्षांत ५,१०० पिधाने अभ्यासून सूर्याचा पराशय (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्याने सूर्याच्या भगोलावरील स्थानामध्ये होणारा भासमान बदल) ८”·७९४ ± ०”·००३३ येथ पर्यंत अचूकपणे पडताळून पाहिला. खग्रास चंद्रग्रहणाच्यावेळी अंधूक ताऱ्यांचे पिधान दूरदर्शकातून अभ्यासणे हे अतिशय उपयुक्त असते.
ग्रह सुद्धा ताऱ्यांची पिधाने करतात. कारण ग्रह हे तितकेसे बिंदुरूप नाहीत. गुरूसारखे मोठे ग्रहआपल्या उपग्रहांचे पिधान करतात. तसेच त्यांचे मोठे उपग्रह लहान उपग्रहांचे पिधान करतात.
नेने, य. रा.