पितर : मृत्यू पावल्यानंतर परलोकात गेलेल आणि तेथे वास करणारे पूर्वज म्हणजे पितर. सर्व मृतांना मरणोत्तर जीवन असते, अशी समजूत जगातील सर्वच धर्मांत व समाजात प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे अशा पितरांचे स्मरण, पूजन करणे हे मानवधर्माचे एक मूलभूत व प्रमुख असे अंग बनले. हिंदू धर्मातील ऋणत्रयाच्या कल्पनेतही एक ऋण म्हणून पितृऋणाचा अंतर्भाव हे. हिंदू कल्पनेनुसार पितर म्हणजे मृत पिता, पितामह आणि प्रपितामह त्याचप्रमाणे मृत माता, पितामही, प्रपितामही, मातामह, प्रमातामह, मातामही, प्रमातामही तसेच अन्य जवळचे मृत स्त्रीपुरूषसंबंधी. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात करावयाच्या महालय श्राद्धाच्याही संदर्भात वरील पित्याच्या आणि मातेच्या बाजूचे मृत आणि अन्य मृत कुटुंबीय, असा ‘पितर’ शब्दाचा अर्थ आहे [ ⟶ श्राद्धविधि]. पहिला मृत मानव यम हा आद्य पितर आणि सर्व पितरांचा राजा असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. यम अंतरिक्षात वास करतो अंतरिक्षातील देवतांच्या स्थानाच्या वर यमलोक असून तोच पितृलोक होय. मृत पितरांचा वास याच लोकात असतो. जीवात्म्याला मरणोत्तर सूक्ष्म भौतिक देह प्राप्त होतो. श्राद्धात दिलेल्या अन्नामुळे या देहाचे पोषण होते आणि त्याला उच्चलोक प्राप्त होतो. वैदिक वाङ्‌मयात पितरांचे सोमवंत, बर्हिषद व अग्निष्वात्त असे तीन प्रकार कल्पिले. स्मृतींत व पुराणांत पितरांचे अनेक वर्ग कल्पिले आहेत. भारतीय तत्वज्ञानात कर्मसिद्धांताची स्थापना होण्यापूर्वीची ही पितर किंवा पितृलोक संकल्पना असावी. मनुष्य मेल्यावर कृत कर्मानुसारने स्वर्गात वा नरकात वा विविध योनींत जाते स्वर्गवास वा नरकवास संपल्यावर किंवा मृत्यू झाल्याबरोबर लगेच दुसर्‍या उच्‍च वा नीच योनीत कर्मानुसार जन्म घेतो, असे कर्मसिद्धांत सांगतो. पितृलोकाची संकल्पनासुद्धा या कर्मसिद्धांताशी नंतर जुळवून घेण्यात आली. पितृलोकप्राप्ती करू न देणारे कर्म म्हणजे ज्ञानरहित यज्ञकर्म होय. ज्ञानपूर्वक यज्ञ केल्यास देवलोकप्राप्ती होते जीवात्मा देव बनतो. पापसंचय मोठा असल्यास नरकलोकाची प्राप्ती होते. म्हणजे तात्पर्य असे, की सर्वच मृत माणसे पितृलोकात जात नाहीत.

प्राचीन रोमन धर्मात ‘पितर’ सदृश ‘मेनीझ’ ही कल्पना होती. मृतांच्या आत्म्यांना अनुलक्षून ‘मेनीझ’ (चांगल्या देवता) ही संज्ञा आहे. सर्वसाधारणपणे हे मृतात्मे ‘दयाळू’ असल्याचे जरी रोमन लोक समजत, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांची पीडा होऊ नये म्हणून त्यांना संतुष्ट राखण्यासाठी त्यांच्या थडग्यांवर खाद्यपेयादी पदार्थ अर्पण करून त्यांची पूजा करीत.

पहा : मरणोत्तरस्थितिविज्ञान पितृपूजा.

काशीकर, चिं. ग.