पिझारो बंधु : दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील इंका साम्राज्य जिंकणारे व तेथे स्पॅनिश वसाहत स्थापन करणारे हे चार बंधू म्हणजे फ्रांथीस्को, गाँथालो, एर्नान्दो व ह्वान.यांच्यापैकी फ्रांथीस्को हा सर्वांत अधिक प्रसिद्ध आहे. पिझारो कुटुंब स्पेनमधील त्रूहीयो या गावचे. कॅप्टन गाँथालो हे या चार भावंडाचे वडील.
फ्रांथीस्को : (१४७५ ?- २६ जून १५४१). जन्म त्रूहीयो येथे. त्याचे काहीच शिक्षण झाले नव्हते. गुरे राखण्याचे काम तो करीत असे. पुढे तो सैन्यात शिरला. इटलीतील लढाईहून परत आल्यावर १५०९ मध्ये तो आलाँसो दे ऑहेदा यांच्याबरोबर कोलंबीयाच्या सफरीवर गेला, नंतर व्हास्को नून्येस दे बॅल्बोआने पॅसिफिकचे समन्वेषण केले तेव्हा तो त्याच्याबरोबर होता (१५१३). द. अमेरिकेच्या पश्चिमेकडील ९० द.अक्षवृत्तापर्यंत समुद्रकिनारा त्याने शाधून काढला. पुढे १५१९ मध्ये तो पनामामध्ये स्थायिक झाला. पेरूच्या इंका साम्राज्याची वर्णने ऐकून त्याने द्येगो दे आल्माग्रो याच्यासह पेरूला जाण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला (१५२४). मात्र दुसर्या खेपेस (१५२६-२८) तो पेरूच्या किनार्यावर पोहोचला व तेथून सोने, काही इंडियन मदतनीस घेऊन प्रथम पनामाला व नंतर स्पेनला परतला. स्पेनच्या राजाने त्याच्या कार्याचा गौरव करून शोधलेल्या प्रदेशावर त्याची गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. तथापि त्याने काही अटी घातल्या. त्या फ्रांथीस्कोला मान्य झाल्या नाहीत. चार्ल्स राजाकडून पेरू जिंकण्याची सनद व पैसा घेऊन भावांसह तो पुन्हा पेरूस आला (१५३१). यावेळी त्याच्याबरोबर २०० सैनिक, थोडा दारूगोळा व काही घोडे होते. फ्रांथीस्को आणि आल्माग्रो या दोघांनी मिळून बहुतेक पेरू देश पादाक्रांत केला. फ्रांथीस्कोने इंकाच्या राजाचा वध करून त्याचे साम्राज्य जिंकले व अगणित संपत्ती लुटली आणि लीमा या नवीन राजधानीची स्थापना केली (१५३५). यावेळी राजाने आल्माग्रोला चिली जिंकण्यासाठी पाठविले होते.१५३६ मध्ये फ्रांथीस्कोने नेमलेल्या इंकाच्या नाममात्र राजाने कूस्को येथे (जुनी राजधानी) उठाव केला. त्याचा आल्माग्रोने बोड केला (१५३७) आणि स्वतंत्र सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केला. फ्रांथीस्को व आल्माग्रो यांमध्ये जिंकलेल्या प्रदेशाबद्दल तंटा उद्भवला व यादवी युद्धास तोंड फुटले. त्या वेळी फ्रांथीस्कोच्या एर्नान्दो या सावत्र भावाने या यादवी युद्धात आल्माग्रोचा पराभव करून त्याला फाशी दिले (१५३८). तेव्हा आल्माग्रोचे सैनिक व अनुयायी चिडले आणि त्यांनी फ्रांथीस्कोचा लीमामध्ये खून केला.
एर्नान्दो : (१४७५ ? – १५७८). हा फ्रांथीस्कोबरोबरच पेरूमध्ये गेला आणि त्याच्या सर्व मोहिमांत त्याने मदत केली. फ्रांथीस्कोने पेरू जिंकल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचा काही भाग घेऊन तो १५३४ मध्ये स्पेनला परत गेला. तेथून परत आल्यानंतर त्याने १५३६ मध्ये इंकांच्या कूस्को या जुन्या राजधानीतील उठावास तोंड दिले व उठाव मोडून काढला. यावेळी आल्माग्रोने त्यास कैद केले आणी स्कूस्कोत आपली सत्ता स्थापन केली. पुढे त्याची तुरूगातून सुटका झाली तेव्हा त्याने सैन्य जमवून आल्माग्रोबरोबर युद्ध केले. युद्धात आल्माग्रोचा पराभव झाला. त्याला पकडून त्याने फाशी दिले. हे कृत्य न्याय्य आहे, हे पटवून देण्यासाठी तो स्पेनला गेला. तेथे चार्ल्सने त्यास कैद करून तुरूंगात डांबले (१५४०-६०). तुरूंगातून सुटल्यानंतरचे उर्वरित आयुष्य त्याने स्वत:चा जमीनजुुमला पाहण्यात घालविले.
गाँथालो : (१५०२ ? – १० एप्रिल १५४८). गाँथालोने फ्रांथीस्कोच्या पेरूवरील स्वारीत सैन्याचे नेतृत्व केले. त्याने एर्नान्दोला स्कूस्कोच्या उठावात मदत केली. पुढे आल्माग्रोच्या यादवी युद्धातही तो फ्रांथीस्को व एर्नान्दो यांच्या बाजूने लढला. त्याच्या शोर्याबद्दल फ्रांथीस्कोने त्यास कीटोचा गव्हर्नर नेमले. पण त्याच्या धाडशी स्वभावास हे रूचेना. म्हणून त्याने १५४० मध्ये पूर्व एक्वादोरच्या जंगलातून नापो नदी ते अमेझॉन अशी धाडशी सफर काढली. वाटेत त्याच्या काही सहकार्यानी त्यास सोडले तथापि काही थोड्या लोकांसह तो लीमास पोहोचला (१५४२). या वेळी त्यास फ्रांथीस्कोचा खून झाल्याचे समजले.त्याचे पद आपणास मिळावे म्हणून त्याने खटपट सुरू केली. या वेळी ब्लास्को नून्येस व्हेला या स्पॅनिश व्हाइसरॉयने स्पेनच्या राजाने केलेले नवीन कायदे बळजबरीने लादण्यास सुरूवात केली. त्यामुळे लोकमत प्रक्षुब्ध होऊन उठाव झाले. या संधीचा त्याने फायदा घेतला व या उठावाचे नेतृत्व आपणाकडे घेतले. त्यात व्हाइसरॉय मारला गेला. त्यानंतर पेद्रो दे ला गास्का हा नवीन व्हाइसरॉय झाला. त्यालाही त्याने सुरूवातीस जेरीस आणले, परंतु या व्हाइसरॉयने आपल्या पूर्वसूरीचे धोरण बदलून स्थानिक लोकांना अनेक सवलती दिल्या. जुने जबर कायदे रद्द केले व गुन्हेगारांना क्षमा केली. त्यामुळे साहजिकच गाँथालोचे अनुयायी फुटले आणि त्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी नवीन व्हाइसरॉयने कडक धोरण स्वीकारले. पुढे गाँथालोला पकडण्यासाठी येऊन त्यास फाशी देण्यात आले.
ह्वान : (१५०५ ? – १५३६). फ्रांथीस्कोचा सर्वांत धाकटा भाऊ. त्याच्याबरोबरच तो पेरूस गेला. हा कूस्कोच्या बचावाच्या वेळी बंडात मारला गेला.
या चारही भावांनी पेरूमध्ये स्पेनचे साम्राज्य स्थापून ते सुस्थिर करण्याची कामगिरी केली. पॅसिफिक महासागरात व दक्षिण अमेरिकेच्या किनार्यावरील इतर अनेक नव्या प्रदेशांचा शोध लावला. अनेक वेळा त्यांचे सहकारी त्यांना मध्येच सेडून गेले.
या चारी भावांच्या कामगिरीविषयी त्यांचा चुलतभाऊ पेद्रो (१५१४-७१) याने तपशीलवार माहिती लिहून ठेवली आहे. ती पुढे रिलेशन ऑफ द डिस्कव्हरीज अंड काँक्केस्ट ऑफ द किंगडम्स ऑफ पेरू या इंग्रजी शीर्षकाने प्रसिद्ध झाली (१९२१).
संदर्भ : 1.Birney, Hoffman, Brothers of Doom : The Story of the Pizarros of Peru, New York, 1942.
2.Hemming, John, Conquest of the Incas, Chicago, 1970.
3.Parry, J.H.The Spanish Seaborne Empire, London, 1966.
शाह, र.रू.
“