पिचस्टोन : ही नैसर्गीक काच म्हणजे काचमय सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेला) अग्निज खडक आहे. याचे भंजन शंखाभ वा ढलपीप्रमाणे, चमक रेझीन व डांबरासारखी मंद आणि वयन (पोत) मुक्ताश्माप्रमाणे (सकेंद्री वक्र भेगा असलेले) असते. हा विविधरंगी पट्टेदार वा एकसारख्या रंगाचा असतो. याचा रंग उदी, करडा, तांबडा, हिरवा वा काळा असतो. पिचस्टोन बहुधा लहान भित्तींच्या रूपात वा मोठ्या भित्तींच्या सीमेलगतच्या भागात आढळतो. यात आढळणारे लाटेच्या आकाराचे पट्टे व स्फटिकांच्या ओळी हे त्यात प्रवाही क्रिया झाल्याचे पुरावे होत. प्रवाहाने निर्माण झालेल्या यातील रेषा वा थर भित्तीच्या सीमेजवळ अधिक स्पष्ट असतात व सीमेला समांतरही असतात.
रायोलाइटी पिचस्टोनाचे रासायनिक संघटन ⇨ज्वालाकाचेप्रमाणेच असते परंतु त्याची चमक मंद तर ज्वालाकाचेची काचेसारखी असते. पिचस्टोन ज्वालाकाचेप्रमाणेच कडांशी दुधी काचेसारखा पारभासी असतो मात्र यात सूक्ष्म भ्रूण स्फटिक (क्रिस्टलाइट) ज्वालाकाचेपेक्षा बरेच जास्त असतात व त्यांमुळेच पिचस्टोनाची चमक मंद होत असावी. पिचस्टोन अस्थिर असतो व त्याच्यात बदल होऊन अगदी सूक्ष्म स्फटिकांचा पुंजका तयार होतो. हा पुंजका विकाचीभूत )काचेतून पुन्हा स्फटिकीरूपात जाण्याची क्रिया झालेल्या) ज्वालाकाचेसारखा दिसतो.
सर्व काचमय खडकांचा विचार केल्यास पिचस्टोनात सर्वांत जास्त पाणी (वजनी प्रमाणात ४-१० %) असते. श्यान (दाट) लाव्हा अथवा शिलारस जलदपणे थेड होऊन पिचस्टोन बनलेला असतो. काही शिलारस वा लाव्हे थंड होऊन अंशत: काचमय व अंशत: स्फटिकमय झालेले असतात. स्फटिकीभूत होत असणार्या भागातून बाहेर घालवून दिलेले पाणी काचमय भागात अडकून किंवा शोषले जाऊनही पिचस्टोन तयार होत असावा.
अरन (स्कॉटलंड)व मायसन येथे पिचस्टोनाचे चांगले नमुने आढळतात. भारतात गुजरातमधील पावागढजवळील ज्वालामुखी खडकांत पिचस्टोन आढळतो. दिसायला हा डांबराप्रमाणे असल्याने डांबरी खडक अर्थाच्या मूळ जर्मन शब्दाचे भाषांतर करून ए.जी.व्हेर्नर (१७५०-१८१७) यांनी १७८० साली याला पिचस्टोन हे नाव दिले.
ठाकूर, अ.ना.
“