पिंड्रा : (पांढरी, पेंडारी, पनेला हिं. पिंडार, पिंडालू क. कारे, पांड्री गु. गांगेडा कौरिया सं. गंगती, पिंडालू इं. ग्रे एमेटिक नट लॅ. रँडिया अलिगिनोजा कुल-रूबिएसी). या लहान (४.५-६ मी. उंच) पानझडी वृक्षाचा प्रसार उत्तरेखेरीज भारताच्या इतर भागांत व महाराष्ट्रातील पडीत भात-खाचरांत व पानझडी जंगलात सामान्यपणे आढळतो शिवाय तो श्रीलंकेत व ब्रह्मदेशातही आढळतो उपहिमालयाच्या पट्ट्यात यमुनेपासून पूर्वेस व बंगालमध्येही तुरळकपणे आढळतो. याची सर्वसाधारणपणे लक्षणे त्याच्याच कुल-वंशातील ⇨गेळ्याप्रमाणे आहेत. साल तांबुस भुरी व पातळ खवल्यांनी सोलून जाणारी काटे आखूड व सरळ. पाने साधी, समोरासमोर, गेळ्यापेक्षा मोठी पण साधारण तशीच उपपर्ण त्रिकोणी फेब्रुवारीत पाने गळतात व व नवी पालवी एप्रिलात येते. फुले एकाकी (एकेकटी), पांढरी किंवा मलईच्या रंगाची, सुवासिक, मोठी व ती मे-जूनमध्ये येतात. मृदूफळे लंबगोल, पिवळी व त्यावर संवर्ताचा दीर्घस्थायी अवशेष असतो. ती डिसेंबर-फेब्रुवारीत येतात. बिया अनेक, चपट्या आणि गुळगुळात असतात. पाने शिजवून खातात ती हरिणे व गुरे यांना चारा म्हणून देतात. कच्ची फळे निखार्यावर भाजून (बिया व मधला भाग टाकून) आमांशावर व अतिसारावर देतात ते स्तंभक (आकुंचन करणारे) असते. फळे भाजून किंवा शिजवून खातात. मूळ तूपात उकळून आमांश आणि अतिसारावर देतात. ते मूत्रल (लघवी साफ करणारे), शीतक (थंडावा देणारे) व पौष्टीक असते. लाकूड पांढरट करडे, घट्ट व कठीण असून कोरीव कामासाठी वापरतात. रंग गर्द करण्याकरिता फळ वापरतात. कच्चे फळ मत्स्यविष आहे.
पहा : गेळा रूविएसी.
जमदाडे, ज. वि.
“