पॉप्लर : फुलझाडांपैकी (आवृतीबीज, द्विदलिकित) काही वृक्ष ह्या इंग्रजी नावाने ओळखले जात असून त्यांचा अंर्तभाव ⇨सॅलिकेसी कुलातील (वालुंज कुलातील) पॉप्युलस वंशात केला जातो. या वंशात एकुण सु. ३५-४० जाती व अनेक नैसर्गिक संकरज असुन त्यांचा मुख्यत: समशीतोष्ण कटीबंधात आहे. भारतात सु.दहा जाती असुन त्या पंजाब, वायव्य हिमालय व काश्मिर ते भूतानपर्यंत आढळतात. तिबेट, सिंध, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया व इजिप्त या प्रदेशातही काहीजाती आहेत.⇨ॲस्पेन,⇨बहान,⇨वाळुंज इ. ह्या सॅलिकेसी कुलातील जातींची आणि पॉप्युलस वंशातील जातींची लक्षणे यांत बरेच साम्य आढळते. पॉप्लर वृक्ष अल्पायुषी पण जलद वाढणारे आहेत. ह्या वृक्षांची साल कडु असुन कळ्यांवर (कोरक) संरक्षक खवले असतात व त्यातुन रेझिनसारखा स्त्रवणारा पदार्थ काही जातीत असतो. त्यांना साधी, लांब देठाची, एकाआड एक व रुंद पाने असतात त्यांच्या पात्यात तळापासुन ३-५ शिरा निघतात त्यांची कडा दातेरी व उपपर्णे अरुंद व पातळ असतात. त्यांना लहान, एकलिंगी आणि विभक्त झाडांवर लोंबत्या फुलोर्यात (नतकणिशात) फुले येतात [⟶पुष्पबंध]. फुलांतील परिदलांएवजी पेल्यासारखे बिंब असून केसरदले ४-४० व सुटी किंजदले दोन व जुळलेली आणि किंजपुट ऊध्वस्त[⟶ फुल]⇨परागण वार्याने घडून येते. फळ (बोंड) तडकून २-४ शकले होतात. बिया लहान, अनेक व त्यांवर केसांचा झुबका असतो ‘कॉटनवुड’ हे इंग्रजी नाव काहींनी दिले आहे, कारण असंख्य बियांवरील ह्या पांढर्या केसांचा मोठा समूह कापसासारखा दिसतो.
हे वृक्ष पानझडी असले, तरी रस्त्याच्या दुतर्फा व मैदानांच्या कडेने किंवा बागेतून लावलेले आढळतात. यांच्या सावलीत ⇨ हेमलॉक,⇨ ओक (बंज, बान, बीच) व ⇨ बीच यांच्या बिया रूजून वाढणे सोयीचे अससते. सोसाट्याच्या वार्यापासून इतरांना यांचे संरक्षण मिळते. यांतील अनेकांचे नरम लाकूड विविध प्रकारे उपयुक्त असते. कागद निर्मितीसाठी लगदा, औषधे व रेझीन (पॉप्यूलस बल्समिफेरा = बाल्सम पॉप्लर किंवा पॉ. टाकामाहका) काही जातींपासून मिळतात. तिलौंजा (पॉ. सिलिएटा) या हिमालयीन वृक्षाचे लाकूड कागदनिर्मितीकरता चांगले असते. साल पौष्टीक, उत्तेजक आणि रक्तशुध्दिकारक असते पाने शेळ्यांना खाऊ घालतात. सफेद (पॉ. अल्बा, पॉ. नायञा) बहान (पॉ. युफ्रॅटिका) व पारव (पॉ. लॉरिफोलिया) हेही हिमालयीन वृक्ष उपयुक्त आहेत. काळा पॉप्लर (पॉ. नायञा) हा वृक्ष सु. ३० मी. उंच असून त्याचा एक प्रकार इटॅलिका (लॉंबर्डी पॉप्लर) हा फार पूर्वीपासून पंजाब, काश्मीर व इराण येथे आढळतो अद्याप तो तेथे रस्त्यांच्या दुतर्फा व बागांतून लावलेला आढळतो तो तेथूनच बहुधा द. यूरोपात नेला गेला असून लॉंबर्डीतील नद्यांच्या प्रदेशात त्याचा बराच उपयोग केला आहे. अठराव्या शतकाच्या सुरूवातीस तो ग्रेट ब्रिटनमध्ये नेला गेलेला असून पुढे काही वर्षानंतर त्याचा अमेरिकेत प्रवेश झाला. त्याचा अनेक उभट फांद्या व ञिकोणी आकार यांमुळे तो शोभेचा वृक्ष बनला आहे.
पूर्व क्रिटेशस कल्पातील (सु. १४ ते १२ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) खडकांत पॉप्लरच्या पानांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळले आहेत. त्यावरून हा फुलझाडांचा वंश फार प्राचीन आहे, हे उघड दिसते [⟶ पुरावनस्पतीविज्ञान].
कानेटकर, मो. रा. परांडेकर, शं. आ
“