स्टर्क्युलिएसी : ह्या द्विदलिकित (आवृतबीज) वनस्पतींच्या कुलाचा अंतर्भाव माल्व्हेल्स या श्रेणीत केला असून माल्व्हेसी, टिलिएसी, बाँबॅकेसी व एलिओकार्पेसी इ. कुलेही त्याच श्रेणीत आहेत. ह्या कुलाचे युफोर्बिएसी कुलाशी अनेक लक्षणात साम्य असून या दोन्हीत आप्तभाव आहे असे कित्येक मानतात. या कुलात ४८ गोत्रे व ६०० जाती (विलिसच्या मते) असून त्या बहतेक उष्ण कटिबंधात आढळतात (रेंडेलच्या मते ६८ गोत्रे व ७०० जाती) भारतात दक्षिणेत, पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीतील जंगलात आढळतात. या वनस्पती ओषधी, क्षुपे, वृक्ष क्वचित वेली असून त्यांच्या शरीरावर तारकाकृती केस व आत श्लेष्म-कोश व सूत्रल ऊती असतात. पाने – एकांतरित, सोपपर्ण, साधी किंवा खंडित असते. फुलोरा – साधी किंवा संयुक्त वल्लरी, परिमंजरी, इ. क्वचित फूल एकटेच फूल – नियमित, अवकिंज, बहधा द्विलिंगी संदले ५ धारास्पर्शी व जुळलेली (युक्त) प्रदले ५ सुटी (मुक्त), क्वचित नसतातच (स्टर्क्युलिआ गोत्रात) कधी एकसंघ केसरदलाशी चिकटलेली केसरदलांची दोन मंडले बाहेरचे केस, शल्क किंवा वंध्य स्वरूपात अथवा नसतेच आतल्या मंडलात सुटी किंवा अनेक पण एकसंघ परागकोशात दोन परागकोटर किंजदले ५, बहधा जुळून ऊर्ध्वस्थ किंजपुट बनतो तो क्वचित किंजधरावर आधारलेली बीजके अनेक किंजपुटात बहुधा ५ कप्पे फळ बोंड किंवा न तडकणारे, मांसल किंवा कठीण बी सपुष्क, कधी त्यावर लहान गाठ (बीजोपांग) असते. परागसिंचन-कीटकाद्वारे व फल-बीज-विकीरण पक्षी किंवा मनुष्याच्या मध्यस्थीने. कोको कोला, डलतकंबख (औषधी), मेथुरी, मुरुडशेंग (औषधी), सुंद्री, सुंद्री-चांद, मुचकुंद, चाफा, कनक, रुद्राक्षी, भोला, नवा, कौशी, गोलदारू, गोलदार, कंडोल व सारडा इ. उपयुक्त झाडे या कुलातील आहेत. याला कोणी मुचकुंदादिकुल म्हणतात.

पराडकर, सिंधू अ.