पॉटी : रशियाच्या जॉर्जिया प्रजासत्ताकतील एक शहर व बंदर. लोकसंख्या ४६,००० (१९७०). हे बट्यूमच्या उत्तरेस सु. ५६ किमी. रीऑनी नदीमुखाशी, काळ्या समुद्रावर वसले आहे. येथे प्रथम ग्रीकांनी वसाहत स्थापन केली होती, त्या वेळी हे ‘फेसीस’ म्हणून ओळखले जात होते. तुर्कांनी १५७८ मध्ये हा भाग जिंकला व तेथे त्यांनी एक किल्ला बांधला परंतु तो लवकरच उदध्वस्त झाला. रशियनांनी हे प्रथम १८१२ मध्ये नंतर १८२९ मध्ये जिंकले. हे दमट, उपोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेशात असून उत्तरेकडील व पूर्वेकडील थंड वाऱ्यांना कॉकेशस पर्वतामुळे येथे येण्यास प्रतिबंध होतो काळ्या समुद्रामुळे येथील हवामान सौम्य व दमट बनले आहे. वार्षिक सरासरी वृष्टी सु. १०१.६ सेंमी. याच्या आसमंतात चहा, नारिंगे, लिंबे व कापूर यांचे उत्पादन होते. १८८० मध्ये हे ट्रान्स-कॉकेशस लोहमार्गास जोडल्याने व येथे कृत्रिम बंदराची निर्मिती केल्याने याचा विकास झाला. येथे जहाजदुरुस्ती, मासे, डबाबंदी, लाकडावरील नक्षीकाम, विद्युत् साहित्य, प्रशीतक, द्रवीय यंत्रे, गाळबोट बांधणी, मत्स्यप्रक्रिया इ. उद्योग चालतात. येथून मँगॅनीज, लाकूड, मद्य यांची निर्यात तर कोळसा, साखर व धान्य यांची आयात केली जाते.
लिमये, दि.ह.