पावित्र्यनिंदा : (ब्लॅस्फिमी). पवित्र ईश्वराची अथवा त्याला प्रिय आहेत अशा समजुतीमुळे पवित्र मानलेल्या व्यक्ती, वस्तू, तत्त्व, धर्मग्रंथ इत्यादींची निंदा करणे किंवा ईश्वराचे अस्तित्व नाकारणे, ही पावित्र्यनिंदा होय. पावित्र्यनिंदेमुळे देवाचा कोप होऊन संपूर्ण जमातीवर संकट कोसळते, अशी लोकांची समजूत होती. म्हणूनच ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्या धर्मांत पावित्र्यनिंदा हे घोर पाप मानून त्याला कठोर शिक्षा व प्रायश्चित्ते सांगितलेली आढळतात. प्राचीन देव न मानता नवे देव मानावेत असा उपदेश केल्यामुळे सॉक्रेटीसला मृत्युदंड दिला गेला, हे प्रसिद्धच आहे. सत्यनिष्ठेसाठी असे बंड पुकारून शासन भोगणारे लोक अनेक धर्मांत होऊन गेले आहेत. परंपरागत श्रद्धा आणि विचारस्वातंत्र्याची ओढ यांच्यातील हा संघर्ष प्राचीन काळापासून चालू आहे. शिक्षा देणाऱ्याच्या मनात कधी देवाधर्माविषयीची प्रामाणिक श्रद्धा असते, तर कधी व्यक्तिगत स्वार्थ असतो. त्याचप्रमाणे पावित्र्यनिंदा करणारी व्यक्ती कधी सत्यशोधक असते, तर कधी अनीतिमान व बेजबाबदारही असू शकते.
देव, वेद, भक्त, गुरू, पतिव्रता, यती, व्रत, पूजा, मंत्र, गंगा, तुळस इत्यादींची निंदा करणारी व्यक्ती अधोगतीला जाते व तिथे सर्पदंश, मलमूत्रभक्षण इ यातना भोगाव्या लागतात, अशी हिंदू धर्मांची समजूत ओ. वेदनिंदकाबरोबर संभाषण करू नये, त्याचे स्मरणही करू नये, त्याला बहिष्कृत करावे, त्याला स्पर्श झाला तर सचैल स्नान करावे, गुरूची निंदा चालली असेल तर कान झाकून घ्यावे वा तेथून दुसरीकडे जावे, गुरुजनांची निंदा हा त्यांचा अशास्त्र वध होय, गायत्री मंत्राचे पावित्र्य जपावे इ. विचार हिंदूच्या धर्मशास्त्रात व्यक्त केले आहेत. चार्वाकादी बुद्धिवाद्यांची मात्र देव, वेद इत्यादींचे पूज्यत्व व प्रामाण्य यांना जबरदस्त आव्हान दिले होते.ईश्वराच्या नावाची निंदा करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी दगडांनी ठेचून मारावे, असा विचार बायबलच्या ‘जुन्या करारा’त मांडलेला आहे. ज्यू लोकांना ईश्वरनिंदा ऐकण्यासही मनाई होती.
ईश्वरनिंदा ऐकल्यास आपले कपडे फाडून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी, असे मत रूढ होते. पावित्र्यनिंदा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध साक्ष देणाऱ्या व्यक्तींना मूळ अनादरयुक्त शब्दांचा पुनरुच्चार शक्य तो टाळावा लागे. अपराध्याला मृत्युदंड तर मिळेच पण स्वर्गालाही मुकावे लागे. हा अपराध व्यभिचार, मानवाची हत्या, मूर्तिपूजा इ. अपराधांइतकाच गंभीर मानला जाई. मध्ययुगात हे पाप करणाराला बहिष्कृत केले जाई. पुढे ज्यू लोकांचे राज्य नष्ट झाल्यावर मृत्युदंड रद्द झाला व बहिष्कारही कमी झाला. त्यामुळे पावित्र्यनिंदेचे प्रमाण वाढले.
निंदेमुळे ईश्वर जखमी होतो, असे ख्रिस्ती लोक मानत. मध्ययुगात या पापाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार चर्चला होता. नवव्या ग्रेगरीच्या निर्णयानुसार ईश्वर, संत व पवित्रकुमारी मेरी यांची निंदा करणाऱ्या व्यक्तीला बिशप सात रविवारी चर्चच्या दारात प्रायश्तित्त घ्यावयास लावत असे. प्रायश्चित्त घेतले नाही, तर तो बहिष्कृत केला जाई, त्याला शिक्षा भोगावी लागे आणि ख्रिस्ती पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारांना मुकावे लागे. अपराधी जर सरदार असेल, तर त्याला दंड होई आणि तो जर सर्वसामान्य माणूस असेल, तर त्याला पोत्यात घालून पाण्यात बुडविले जाई. सेंट लुईस याने पाप्याच्या कपाळावर डाग द्यावेत आणि जर त्याने ते पाप पुन्हा केले, तर त्याची जीभ व ओठ यांत भोक पाडावे, असे म्हटले आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटी सगळ्यात जास्त कडक शिक्षा दिल्या जात ही भावना रुजून शिक्षांचे प्रमाण कमी झाले. इंग्लंडच्या सध्याच्या कायद्यात पावित्र्यनिंदा हे पाप असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यामुळे समाजातील कायदा, सुव्यवस्था व शांतता यांना धोका निर्माण झाला, तरच शिक्षा दिली जाते. फ्रान्स व अमेरिकेतही असेच धोरण आहे. जर्मनीत असभ्य भाषेत व जाहीर रीत्या पावित्र्यनिंदा झाल्यास एक ते दोन दिवसांची शिक्षा दिली जाते.
इस्लाममध्ये अल्ला, त्याची नावे व विशेषणे, कायदे, आज्ञा व निषेध यांचा तिरस्कार म्हणजे पावित्र्यनिंदा होय. अल्ला सर्वज्ञ, अविनाशी व एकमेव आहे हे नाकारले किंवा मुहंमद, इतर प्रेषित व अल्लाचे दूत यांची निंदा केली, तर तीही पावित्र्यनिंदा होते. श्रद्धा नसूनही इस्लाममध्ये राहणाऱ्या झिम्मींना इतर मुस्लिमांदेखत पावित्र्यनिंदा करण्यास मनाई आहे. अशा अपराध्याला न्यायाधीशांनी सांगितलेले प्रायश्चित्त घ्यावे लागे व त्याला चाबकाचे फटकेही मारले जात.
संदर्भ : 1. Coleman, Petr, Obscenity, Blasphemy, Sedition, San Francisco, Calif, 1963. 2. Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. 2, New York, 1958. 3. Nokes, G.D.A. History of the Crime of Blasphemy, 1928.
साळुंखे, आ.ह.