पावापुरी : बिहार राज्याच्या पाटणा जिल्ह्यातील श्वेतांबर व दिगंबर या जैन संप्रदायांचे पवित्र क्षेत्र. प्राचीन नाव अपापपुरी. हे पाटण्याच्या आग्नेयीस सु. ९३ किमी. पाटणा-रांची रस्त्यावर समुद्रसपाटीपासून ६५ मी. उंचीवर वसले आहे. वर्धमान महावीर यांचे येथे निर्वाण झाले. येथे समवसरणमंदिर, ग्राममंदिर व जलमंदिर ही तीन प्रसिद्ध जैन मंदिरे आहेत. छोट्या पूलमार्गाने सरोवरातील शुभ्र संगमरवरी जलमंदिरात जाता येते. याच मंदिरात महावीरांच्या पादुका, तसेच गौतम व सुधर्म या त्यांच्या शिष्यांची पदचिन्हे आहेत. यांशिवाय येथे गुर्ग स्थानमंदिर, गौनमंदिर, नयामंदिर, दानशाळा व चार जैन धर्मशाळा आहेत. महावीराच्या निर्वाणदिनी येथे जैनांची महायात्रा भरते. पावापुरीजवळ बिहार शरीफ, नालंदा व राजगीर ही पर्यटनकेंद्रे आहेत.

जलमंदिर : महावीरांचे निर्वाणस्थान, पावापुरी.

 

पवार, चं. ता.