पा ल्कु रि कि सो म ना थ : (सु. १२८५ -सु.१३२३). प्रख्यात तेलुगू वीरशैव कवी. या श्रेष्ठ कवीने केलेली ग्रंथरचना विपुल, मौलिक आणि लोकप्रिय असूनही त्याच्या चरित्राविषयी मात्र फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. वरंगळचा काकतीय राजा प्रतापरुद्र दुसरा (कार. १२९१-१३२०) याच्या कारकीर्दीत तो होऊन गेला, असे बहुतेक अभ्यासक मानतात. प्रतापरुद्र स्वतः शैवमतानुयायी होता तथापि तो वैषणवांबाबतही सहिष्णू होता. त्याने कलासाहित्यास उत्तेजन दिले. त्याच्या दरबारातील कविमंडळात अनेक संस्कृत व तेलुगू कवी होते.
वीरशैव पंथात बसवेश्वर आणि मल्लिकार्जुन पंडिताराध्य यांच्यानंतर गुरुपीठाचा मान सोमनाथास देतात आणि त्याला भृंगीचा अवतार मानतात. त्याच्याविषयीच्या अत्यादरामुळे मुलांचे ‘सोमना’ हे नाव ठेवले जाऊ लागले. त्याचा बसवपुराण हा ग्रंथ आंध्र प्रदेशात शतकानुशतके नित्यपठनात आहे.
तो प्रतिभावंत कवी आणि व्युत्पन्न संस्कृत पंडित होता तसेच तेलुगू व कन्नड भाषांवरही त्याचे प्रभुत्व होते. तत्त्वज्ञानपर आणि धार्मिक ग्रंथांप्रमाणेच अनेक साहित्यपर आणि साहित्यशास्त्रीय ग्रंथ त्याने वाचले होते. एवढी विद्वत्ता असूनही त्याने आपले वाङ्मय मुख्यतः बहुजनसमाजासाठी प्रासादिक अशा तेलुगू भाषेतच रचले. त्यामुळे त्याच्या वैरशैव मताचा प्रचार आंध्रात सर्वसामान्य माणसापर्यंत झपाट्याने होऊन वीरशैव मतास प्रतिष्ठाही प्राप्त झाली.
रुद्रभाष्यम् इ. संस्कृत ग्रंथ आणि पंडिताराध्यचरित्रमु, चेन्नमुलू सीसमुलु, वृषाधिपशतकमु, अनुभवसारमु, बसवोदाहरणमु, बसवपुराण आणि बसवरगड हे तेलुगू ग्रंथ त्याने लिहिले.
नन्नेचोडप्रणीत देशी शैलीचा त्याने प्रभावी पुरस्कार केला. त्याने जनभाषेची उपयुक्तता आणि लोकप्रियता ओळखली. लोहार, शेतकरी, कुंभार इ. जनसमूहांच्या व्यावहारिक भाषेला ग्रंथभाषेची योग्यता त्याने प्राप्त करून दिली. यासाठी रूढ साहित्यभाषेत बाजूस सारण्याचे यशस्वी साहस त्याने केले. त्यामुळे सहस्रवधी देशी शब्द साहित्यमान्यता पावले आणि तेलुगूचे भाषावैभव वाढले. द्विपदासारख्या देशी छंदात महाकाव्यही रचले जाऊ शकते, हे त्याने सिद्ध केले.
कथांची निवड, मोठ्या घटनेतील तथ्य प्रभावीपणे सांगण्याची हातोटी, रसानुकूल भाषेचा प्रयोग यांमुळे त्याच्या ग्रंथांतील अनेक स्थळांना मोठेच साहित्यमूल्य प्राप्त झाले आहे. बसवपुराण आणि पंडिताराध्यचरित्रमु हे त्याचे ग्रंथ इतिहासकथापर वाटतात. त्याने नायक प्रत्यक्ष शिवरूपच रंगविले आहेत. वृषाधिपशतकमु हे तेलुगूतील पहिले वैशिष्ट्यपूर्ण असे ‘शतक’ प्रकारातील काव्य आणि बसवोदाहरणमु ही चमत्कृतिपूर्ण रचना सोमनाथाच्या योग्यतेचे आणखी दोन पुरावे होत.
त्याच्या पंडिताराध्यचरित्रमूचे तमिळ, कन्नड व संस्कृत अनुवाद झाले. बसवोदाहरणमु या काव्याने अनुवाद तीन कवींनी भिन्नभिन्न वृत्तांत केले. यावरून त्याच्या रचनेचे धार्मिक मूल्य आणि साहित्यदृष्ट्या थोरवी यांची चांगली कल्पना येते. नंतरच्या कवींवरही त्यचा खूपच प्रभाव पडला व त्यांनी त्याच्या काव्याची थोरवी मान्य करून त्याचे गुणगानही केले. अर्थातच तत्कालीन समाजाचे धार्मिक व साहित्यविषयक दृष्टिकोण बदलण्याचे पुष्कळसे श्रेय सोमनाथाकडे निर्विवादपणे जाते. वीरशैव पंथात आणि तेलुगू साहित्यात त्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
टिळक, व्यं. द.